काव्यलेखन

श्वास

Submitted by सागर कोकणे on 12 November, 2018 - 13:24

चालताना शीळ मी घालीत गेलो
सोसलेले घाव मी जाळीत गेलो

शोधली माझ्यात मी माझीच ओळख
पूर्वजांचे नाव मी टाळीत गेलो

काळ होता लागला मागे कधीचा
जीवनाशी वेळ मी पाळीत गेलो

वृत्त मी सांभाळता गझलेस लिहिता
नेमकेसे शब्द मी चाळीत गेलो

तृप्त होता जीवनाचे विष पिऊनी
तू दिलेले श्वास मी गाळीत गेलो

-काव्य सागर

शब्दखुणा: 

गंध भाकरीचा….

Submitted by Asu on 12 November, 2018 - 09:26

खरपूस भाकरीचा दरवळणारा गंध म्हणजे गरीबाला आनंदकंद ! सुखवस्तू माणसालाही तो जगण्याचे भान देतो.
गंध भाकरीचा….

मन जेव्हा उदास होते
मना काही ना भावते
जगणे वाटे फेकून द्यावे
दर्दभरे मग गाणे गावे

नेतील पाय तिथे फिरावे
कशास वाटे व्यर्थ जगावे
डोळे मिटुनि स्तब्ध रहावे
गाव सोडुनि बाहेर यावे

झोपड्यांची गरीब वस्ती
हाडांचीच माणसे नुसती
चिमणी एक मिणमिणती
अंधाराची सर्वत्र गस्ती

डोकावून मी जेव्हा पाही
चुलाण पेटून प्रकाश देई
माय माऊली थापे भाकरी
खरपूस भाजी तव्यावरी

शब्दखुणा: 

मी कलंदर

Submitted by निशिकांत on 12 November, 2018 - 00:57

मी कलंदर आसवांची रात्र करतो साजरी
सांजवेळी सुरकुत्यांशी खेळतो अंताक्षरी

खूप कष्टाने कमवली पोट भरण्या भाकरी
जन्म सारा फक्त केली मी भुकेची चाकरी

घे परिक्षा, देत जा तू यातना नानापरी
मी कधी म्हणणार नाही पाव रे तू श्रीहरी

रंगली रंगात माझ्या मस्त माझी बावरी
लक्तरामध्येच सजली; नेसली ना भरजरी

देत आली गारवा ती वाळवंटी चालता
व्यक्त करण्या ॠण सखीचे रोज लिहितो डायरी

एक दूज्यावीन जगणे कल्पना करवेचना
शक्यतो दोघास देवा एकदम नेरे वरी

मी वसंताचे, फुलांचे गीत रचले ना कधी
लेखणीतुन फक्त झरते वेदनांची शायरी

भाऊबीज

Submitted by Asu on 8 November, 2018 - 22:43

पाटील परिवारातर्फे सर्व आप्तेष्ट आणि रसिकांना भाऊबीजेच्या हार्दिक शुभेच्छा !

भाऊबीज

कार्तिक शुक्ल द्वितियेला
सण भाऊबीजेचा आला
बहीण ओवाळी बंधूराजाला
टिळा लाविते पंचप्राणाला

आठवता परदेशी बंधू राजाला
बहीण पूजिते बंधु चंदू रायाला
धन्य ही संस्कृती नसे तुलनेला
निसर्गाशी जोडी भाऊबीजेला

यम द्वितीयेचा सण आगळा
भावा बहिणीचा प्रेम सोहळा
पवित्र नात्याचा उत्सव सजला
जणू जीवनी नंदादीप पेटला

शब्दखुणा: 

भाऊबीज

Submitted by राजेंद्र देवी on 8 November, 2018 - 21:15

भाऊबीज

भाऊ माझा ढगाएव्हढा
जरी सावळा मायेचा ओलावा
बहीण माझी गोरी कण्हेरी
चकाकते विदुयलतेपरी

भाऊ माझा चंद्रासम
बहीण नाजूक चांदणी
ओवाळते भाऊरायास
विशाल या नभांगणी

एकाच मातीची आम्ही बीजे
रुजली जरी वेगवेगळी
अजोड ही प्रीत रुजे
बहिणीची माया आगळी

राजेंद्र देवी

भाऊबीज

Submitted by राजेंद्र देवी on 8 November, 2018 - 21:14

भाऊबीज

भाऊ माझा ढगाएव्हढा
जरी सावळा मायेचा ओलावा
बहीण माझी गोरी कण्हेरी
चकाकते विदुयलतेपरी

भाऊ माझा चंद्रासम
बहीण नाजूक चांदणी
ओवाळते भाऊरायास
विशाल या नभांगणी

एकाच मातीची आम्ही बीजे
रुजली जरी वेगवेगळी
अजोड ही प्रीत रुजे
बहिणीची माया आगळी

राजेंद्र देवी

शब्दखुणा: 

घेऊन वेदना एक उराशी हसतो आहे

Submitted by द्वैत on 8 November, 2018 - 05:44

घेऊन वेदना एक उराशी हसतो आहे
जसा उमगशील तसा तुला मी दिसतो आहे

मी उगाच घेतो आयुष्याला गांभीर्याने
कळले मला का पुन्हा पुन्हा मी फसतो आहे

कशी बहरली अशी अवेळी झाडे सारी
कोण अनोळखी बागेमध्ये बसतो आहे

असा एरव्ही माणूस आहे प्रेमळ प्राणी
पण अधे मध्ये हा संशय किडा डसतो आहे

जाळून आलेत वस्ती त्यांना लगेच कळवा
नदीकिनारी गाव नवा एक वसतो आहे

द्वैत

मन

Submitted by सुप्रिया जाधव. on 8 November, 2018 - 03:33

मन !
थेंब पावसाचा
नको नको तिथे पडे
त्याचे गणगोत सारे
नाही कुण्णाशी वाकडे

मन !
पातं गवताच
जसा वारा तसं डोले
पायदळी तुडवलं
पुन्हा उमेदीनं खडे

मन !
वारा सोसाट्याचा
दाही दिशेला हुंदडे
नाही घर-दार त्याला
गोते खाई चोहीकडे

मन !
माती ओलसर
जाती जागोजागी तडे
तुडविता हो चिखल
घडविता देव घडे

सुप्रिया

घालमेल

Submitted by सुप्रिया जाधव. on 8 November, 2018 - 03:30

किर्र काळोखी अवस
खोल मनामधे दाटे
गोतावळ्यात राहून
एकांताची भीती वाटे

तुझ्याविना जगायचा
आव आणते-आणते
आठवांची रेल-चेल
डाव हाणून पाडते

वरकरणी पहाता
वाटे सारे आलबेल
श्वासो-श्वास जाणतो रे
अंतरीची घालमेल

वाट चुकली सकाळ
रोज दार ठोठावते
तुझ्या नावाने चहाचं
रोज आधण टाकते

सरावलेल शरीर
सारी कामं उरकते
सांज ढळता-ढळता
तन-मन निखळते

तुझ्या स्मृतींचा सखया
उभ्या रातीला जागर
ओळ सुचवून जाते
रीती झालेली घागर

सुप्रिया

नको ती आखणी केली

Submitted by निशिकांत on 7 November, 2018 - 23:58

फुका दुर्लक्षिले दु:खास अन् हेटाळणी केली
सुखाशी नाळ जोडाया नको ती आखणी केली

किती होते प्रवाही प्रेम निस्पृह आपुले सखये!
अपेक्षा ना कुणा होती, न कोणी मागणी केली

नकोसा जाहला गजरा तुला, हा दोषही माझा
वसंताची तुझ्या मी भोवताली पेरणी केली

न झाली वाढ माझी नीट मी गर्दीत असताना
पिकाला रक्षिण्यासाठी तनाची काढणी केली

कुणाला त्रास ना देता, जगावे ठरवुनी जगलो
नगण्यांच्या तरी कळपात माझी नोंदणी केली

मनाला काळजी, मेल्यावरी नर्कात जाण्याची
म्हणूनी आजच्या नगदी सुखांची कापणी केली

Pages

Subscribe to RSS - काव्यलेखन