काव्यलेखन

मन का थरथरले?

Submitted by निशिकांत on 29 October, 2018 - 01:11

मन का थरथरले?---

गुलाब, चाफा, जुई, मोगरा
अंगणात नव्हतेच बहरले
फेसबुकावर तुला पाहता
गंधाळुन मन का थरथरले?

मोहरलो मी आज अचानक
नाव तुझे अन् फोटो दिसता
भूतकाळच्या झंझावाती
फिरू लागलो बघता बघता
तुझ्या हासर्‍या शिडकाव्याने
बीज आठवांचे अंकुरले
फेसबुकावर तुला पाहता
गंधाळुन मन का थरथरले?

करून चिमणीच्या दाताने
अर्धा अर्धा पेरू वाटुन
घालमेल अंतरात होते
खातानाचा प्रसंग आठवुन
चिनगारीवरच्या राखेला
आज कशाला तू फुंकरले?
फेसबुकावर तुला पाहता
गंधाळुन मन का थरथरले?

मी मला

Submitted by एस.जी. on 28 October, 2018 - 23:56

गुंतलो मोहात मी मग मोकळा झालोच नाही
गवसले सारे तराणे मी मला दिसलोच नाही

उत्तरे मी फक्त झालो अन् खुलासे देत गेलो
काळजाला छेदणारा प्रश्न मी झालोच नाही

चांदण्यांचा ह्या तुझ्या मी व्देष केला सांग केव्हा
कमनशीबी मीच आहे मी तुला कळलोच नाही

भेदभावाला न थारा या व्यथांच्या पंगतीला
वाटणी माझी मिळाली मी असा चुकलोच नाही

सोडले तव नाव अंती सोडले तव गाव अंती
गुंतल्या पाशास पण मी सोडवू शकलोच नाही

शब्दखुणा: 

गुपित माझे

Submitted by द्वैत on 28 October, 2018 - 04:29

आरशाला ठाऊक कैसे गुपित माझे
मला न माझे ठाऊक ऐसे गुपित माझे

नावं ठेविली होती तिजला गुलाब जाई
फुलांप्रमाणे नाजूक ऐसे गुपित माझे

कटिंग सिगारेट हाती आणि मुखात शिव्या
कट्ट्यांवर सापडते ऐसे गुपित माझे

अवतीभवती असून सारे कुणीच नाही
कुणास मी सांगावे ऐसे गुपित माझे

मला कधी ना कमी मिळाली एकही पोळी
कसे आईला कळते ऐसे गुपित माझे

मला न होतो आता त्याचा त्रास कधीही
तरी कुणाला छळते ऐसे गुपित माझे

पुढे मिळाला कधी मला एक जन्म नवा जर
तुलाच पहिले सांगेन ऐसे गुपित माझे

देवपण

Submitted by अन्वय on 26 October, 2018 - 06:30

पूर्ण जर होतास तू तर विश्व हे रचिलेस का ?
तुझ्या अंतरी तेज होऊन वसले, सावलीचे दान त्यांस दिधलेस का ?
सूर्याच्या तेजासाठी का असतो अंधाराचा फिकटपणा
प्रार्थनेवाचून त्यांच्या देवपण सिद्ध केलेस का ?

जीवन माझे सजले आहे

Submitted by निशिकांत on 26 October, 2018 - 05:32

नक्षत्राचे लेणे लेउन जीवन माझे सजले आहे
कैक धुमारे, पर्णफुटीने अंगण माझे नटले आहे

रडलो, हसलो, जगलो, मेलो खुशीखुशीने, सांग जीवना !
असेच का अन् तसेच का? हे तुला कधी का पुसले आहे?

फलप्राप्तीची जरी अपेक्षा मनात नाही, तरी मंदिरी
देवासाठी नैवेद्याचे ताट पुढे मी धरले आहे

हिरव्या रोमांचांनी सजली श्रावणमासी तरी परंतू
ग्रिष्मझळांचे दु:ख धरेच्या खोल अंतरी लपले आहे

माझे ओझे मीच पेलतो भार नसे मी कधी कुणाला
मरण्याआधी माझ्यासाठी आज कफन मी शिवले आहे

भांडणातही संवादाला संधी द्यावी खरे परंतू
ज्योत भेटली अंधाराला असे कधी का दिसले आहे?

कातर क्षण

Submitted by भागवत on 26 October, 2018 - 02:58

ओथंबलेले क्षण का स्मरतात
स्मृती उगाचच गर्दी करतात
जुन्या आठवणी कुरतडतात
हळुवार क्षणी मात्र डोकावतात

आठवणी आल्या चोर पावलांनी
हृदयाचा ठोका चुकला क्षणांनी
दगा दिला डोळ्यातील आसवांनी
दूर तरी बांधलो प्रेमाच्या नात्यांनी

हाक दिली हृदयस्थ भावनांना
प्रतिसाद नाही आला शब्दांना
विझावतो आतल्या तीव्र उद्रेकांना
साद घालतो आपल्याच लोकांना

शब्दखुणा: 

अव्यक्त अद्वैत

Submitted by Asu on 25 October, 2018 - 23:08

अव्यक्त अद्वैत

तुझ्या हसण्याने नभात चंद्र धुंद होतो
तुझ्या नसण्याने वनात वारा कुंद होतो

मनाच्या अंधारात दुःखांध भास होतो
दुखऱ्या क्षणाला चांदण्यांचा छंद होतो

सहवास चांदण्यांचा वा नको मोगऱ्याचा
मिटून मीच माझिया हृदयात बंद होतो

हसणे रुसणे तुझे, आकाश आठवणींचे
डोळे मिटून नभाच्या मिठीत बंद होतो

ओळख नकोच देउ, घे पांघरून अंधार
माझ्याही डोळ्यात बघ प्रकाश मंद होतो

माझ्या हृदयी तुला आणि तुझ्या हृदयी मला
अद्वैत स्पंदनांचा व्यर्थ आनंद होतो.

शब्दखुणा: 

भीज पाऊस

Submitted by मनस्विता on 25 October, 2018 - 05:50

अश्याच एका शांत दुपारी
होते निरभ्र आकाश
अन् पाहता पाहता आले मळभ दाटून
जुन्या आठवणींचा जणू तळ आला ढवळून

चहू दिशा अंधारल्या
जीव गेला घाबरून
वाटे येईल आता सोसाट्याच्या वारा
जाईल झोडपून आसमंत सारा

पण पाहते तो काय
केवळ होत्या संततधारा
आला होता भीज पाऊस
चिंबवून गेला भोवताल सारा!

नाम महाधन

Submitted by पुरंदरे शशांक on 24 October, 2018 - 23:04

नाम महाधन

नाम महाधन । देवोनिया भक्ता । केले जी कृतार्था । मायबापा ।।

नाम मुखी येता । लाभे महासुख । जीवासी क्षणिक । प्रभू भेटी ।।

ह्रदी ठसावता । नाम तुज कृपे । संसार नाशिजे । पूर्णपणे ।।

नामरुप जीव । होताचि समाधी । विराली उपाधी । जीवत्वाची ।।

तुजकृपे नाम । राहो मज चित्ती । उरेचिना खंती । ऐहिकाची ।।

शब्दखुणा: 

समन्वय

Submitted by दिलिफ on 24 October, 2018 - 08:33

सगळे गोंगाट मनातले क्षणभर मी विसरतो
समन्वय हा विस्मयकारक डोळ्यात मी साठवतो
भाग्य समजतो, विनम्र होतो, निरव या शांततेपुढे
हळूच आलेल्या झुळकेचा आवाज तरी ऐकतो

डोकावतो गवतातून पिवळ्या कभिन्न काळा कातळ
धुंदीत आपल्या धवल पक्षी विराजमान एक त्यावर
नाही बांधलेले जे दृश्य, फक्त रंग रूपाच्या बंधनात
परिभाषा या सौंदर्याची एकच नाही केवळ

विराट या सृष्टीत स्थान मानवाचे नगण्य
विस्मरण नको या सत्याचा नाद हा घुमतो
प्रकर्षाने जाणवतात सीमा मानवी स्वभावाच्या
हव्यासाच्या आधीन गुरफटलेल्या आयुष्याच्या

Pages

Subscribe to RSS - काव्यलेखन