काव्यलेखन

सदाबहार श्रावण

Submitted by पुरंदरे शशांक on 20 August, 2018 - 00:41

सदाबहार श्रावण

वाट हिरवी सावळी
चाले डौलात श्रावण
धारा लेऊन रेशमी
न्हातो उन्हात साजण

जाई जुई शुभ्र कळ्या
वेली घेती अंगभर
नाजुकसा पारिजात
सडा शिंपितो केशर

धारा रेशमी गळ्यात
सखा गुंफतो श्रावण
मनामनात फुलवी
इंद्रधनुचे तोरण

पालवल्या दशदिशा
थेंब झुलती पानात
दूर शीळ पाखराची
घुमे ओलेत्या रानात

सदाबहार श्रावण
येवो न ये अंगणात
हिरवाई सतेजशी
जपू सदैव मनात...

सांजवेळी उदास नसते मी - तरही

Submitted by सुप्रिया जाधव. on 20 August, 2018 - 00:15

ओळीसाठी 'बेफिकीर' जी ह्यांचे आभार मानून...

आठवांच्या थव्यात रमते मी
(सांजवेळी उदास नसते मी)

बाळ तू तान्हुले जणू माझे
पुरवते हट्ट, शांत बसते मी

तो अवेळीच रोज मावळतो
पश्चिमेचा गुलाल बनते मी

चेहऱ्यावर तुझ्या नजर खिळते
हुंदके परतवून हसते मी

काय सांगू अशी कशी झाले ?
घेत आले सदैव नमते मी

कोपऱ्यातील एक शेकोटी
रात्रभर एकटी धुमसते मी

एक छाती दिसे तुझी निधडी
उंबऱ्या आत राज्य करते मी

तो स्वतःचा तसा कुठे उरतो
आणि माझी कधीच नसते मी !

मी समजते तसाच नव्हता तो
तो समजतो तशीच नव्हते मी

शहरामुळे कदाचित

Submitted by निशिकांत on 20 August, 2018 - 00:07

ओसाड गाव झाले
गजबज असे सदोदित
विझले दिवे घरातिल
शहरांमुळे कदाचित

येतात बालपणचे
खेड्यामधील आठव
पारावरील गप्पा
संभाषणात लाघव
शहरातल्या सुखाने
झालो न मी प्रभावित
विझले दिवे घरातिल
शहरांमुळे कदाचित

सारेच तिथे माझे
मीही पण सार्‍यांचा
तुटवडा तिथे नव्हता
अश्रू पुसणार्‍यांचा
गर्दी असून झालो
शहरी कसा तिर्‍हाइत?
विझले दिवे घरातिल
शहरांमुळे कदाचित

शब्दांजली

Submitted by दत्तात्रय साळुंके on 19 August, 2018 - 03:23

शब्दांजली
परमपूज्य अटलजी ....

हिमालयाची उंची गाठली
टेकडी तरीही आलिंगली
अंतरात करुणेचा निर्झर
दुनिया चिंब चिंब केली

मरण तुम्हाला काय हरविल
वयही त्याचे मात्र क्षणभर
देशभक्तीचा अटल जागर
पुनश्च घडवा भारतभूवर

दृढ निश्चयी कणखर बाणा
परी अंतरी हळवे कवीपण
तुम्हासारखे तुम्हीच होता
वैऱ्यासाठी होते मोठे मन

काल शांततेचा ध्वनी ऐकला
" येइल फिरुनी मी म्हणाला "
गहिवरले गगन, गदगदली धरा
अचल वायु, थिजला सुर्य तारा

शब्दखुणा: 

एक अबोला

Submitted by शब्दशून्य on 18 August, 2018 - 17:47

शब्द आज का असे
अचानक तुझे गोठलेले
या शब्दांनीच तुझे-माझे
प्रेमगीत कधी म्हटलेले ॥१॥

न बोलून माझ्याशी कधी
एकटी राहू शकशील का?
न पाहून जवळ मला
भान स्वतःचे हरवशील का? ॥२॥

कधी येईल आठवण जर
ये माझ्याशी बोलायला
"आठवण माझी येईल का?"
हे तू नको सांगायला ॥३॥

कितीही बोलून झाले तरी
काहीतरी असायचे नेहमी बोलायला
आवाज आज शांत झालाय
राहिलाय फक्त एक अबोला ॥४॥

-'शब्दशून्य'

शब्दखुणा: 

अज्ञाताचा गड चढताना

Submitted by अनन्त्_यात्री on 18 August, 2018 - 12:38

अज्ञाताचा गड चढताना अशी पायरी येते
तर्कबुध्दी थकुनिया त्यावरी विश्रांतीस्तव बसते
उठून गड बेलाग लांघण्या पुन्हा कंबर कसते
अनुमानाची निष्कर्षाची कास पकडुनी चढते

जिथे संपते वाट त्या तिथे असे काही लखलखते
त्या तेजातच अज्ञाताचे नवेच दर्शन घडते

अस्त एका युगाचा

Submitted by ashokkabade67@g... on 17 August, 2018 - 12:17

आज काळाचा हा निर्णय. निर्णय देवाला ही नाही पटला त्याच्या डोळ्यात आली आसवे आणि तो ढसाढसा रडला. आणि आज धरणिवर पाऊस पडला, अटलजी गेले सोडुन आम्हाला्. दुःख विसरून आपले देव स्वागतात रमला.

अटलबिहारी अमर झाले

Submitted by Asu on 16 August, 2018 - 11:35

अटलबिहारी अमर झाले !

भारत मातेच्या मुकुटातला हिरा शेवटला निखळला
अटल युगाचा अंत होता हरएक भारतीय हळहळला

पुष्प कोमेजले आज शेवटले भारतमातेच्या माळेतले
दीपक विझले प्रकाशाचे भारतीयांच्या आज हृदयातले

अश्रूंचा पूर चोहीकडे अन् संसद किंचित गहिवरली
आधार कुणी कुणास द्यावा जनता मनातून बावरली

असंख्य रत्ने प्रसवून झाली भारत मातेची कोख सुनी
उरला ना इथे अटल जैसा नेता जाणता जनी कुणी

सज्जन सुसंस्कृत नेता होता संसदपटू गारुडी वक्ता
माणूस मोठा, नव्हता खोटा कविमनाचा होता भोक्ता

चष्मा

Submitted by Asu on 16 August, 2018 - 07:29

चष्मा

चष्मा तुमचा जुनाट झाला
चष्म्याचा अता नंबर बदला

स्पष्ट ना दिसे काही अचूक
सारे काही अंधुक अंधुक

नंबर कायम रहात नसतो
काळासवे बदलत असतो

ऋतु मागुनि ऋतु बदलती
पिढ्या मागुनि पिढ्या सरती

जुने नको ते, टाकून द्यावे
नवे हवे ते, बदलून घ्यावे

जुन्यानव्याचा संगम नवा
आयुष्यात समतोल हवा

नव्या पिढीला घेऊ संगे
अवघे नाचूया एका रंगे

जेवण घरचे जरी रोज हवे
पिझ्झा बर्गरही विष नव्हे

निसर्ग वळतो, काळ ढळतो
आपण का जुन्या घुटमळतो

शब्दखुणा: 

भारतमाता स्तवन

Submitted by Asu on 16 August, 2018 - 07:26

सगळ्यांना स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा !
भारतमाता स्तवन

हे पवित्र जननी तव मंगल चरणी, टेकवितो मी हा माथा
भाग्यवान आम्ही वंदन करितो, तुजला हे भारत माता ||ध्रु.||

ब्रम्हा सिंधू गंगा गोदा तापी नर्मदा, कावेरी सजल दुहिता
सुजलाम-सुफलाम करती देशा, तव रक्तवाहिन्या माता
पोषण करते सकल जना, संपन्न करती अखिल जगता
हिमगिरी तव मुकुट शोभतो, चरण हिंदू सागर नित धुता

हे पवित्र जननी तव मंगल चरणी, टेकवितो मी हा माथा
भाग्यवान आम्ही वंदन करितो, तुजला हे भारत माता ||ध्रु.||

शब्दखुणा: 

Pages

Subscribe to RSS - काव्यलेखन