काव्यलेखन

अवघड झाले

Submitted by निशिकांत on 14 October, 2020 - 00:35

जगणे थोडे अवघड झाले
खांद्याला ते बोजड झाले

तत्व मुरडणे, हात मिळवणे
रूळ बदलता खडखड झाले

उडण्याची  ना इच्छा उरली
पंख कधी ना फडफड झाले

ज्ञान जगातुन हरवुन गेले
किर्तन, प्रवचन बडबड झाले

श्रीमंतांना काय जगाचे?
जे झाले ते फक्कड झाले

झोपडपट्टी छान म्हणावी
इमले सारे पडझड झाले

मुजरा द्यावा कष्टकर्‍यांना
हात जयांचे खडबड झाले

सभ्यजगी मज लाखो दिसले
संधी मिळता बेरड झाले

रावण, कौरव आज खिदळती
देवांना डोईजड झाले

पडती मुल्यें, ढोंग बघोनी
"निशिकांता"ला धडधड झाले

हवे तसे ना रंग मिळाले

Submitted by निशिकांत on 12 October, 2020 - 01:20

परस्परविरोधी रंगांनी
सुखदु:खाच्या बरबटलेला
हवे तसे ना रंग मिळाले
आयुष्याच्या कॅन्व्हासाला

बाळपण किती रम्य निरागस!
प्रेमाचा वर्षाव होतसे
केंद्रस्थानी मीच मी सदा
कुटुंब मजभोवती फिरतसे
दिवस उडाले भुर्र्कन कसे?
किती विचारू इतिहासाला?
हवे तसे ना रंग मिळाले
आयुष्याच्या कॅन्व्हासाला

तारुण्याच्या उंबरठ्यावर
पुलकित होतो उन्मादाने
अधीरता केवढी मनी ती!
स्वप्न उद्याचे रंगवल्याने
रंग गुलाबी जिकडे तिकडे
मला लागले दिसावयाला
हवे तसे ना रंग मिळाले
आयुष्याच्या कॅन्व्हासाला

सूर लाउनी गुणगुणतो मी

Submitted by निशिकांत on 10 October, 2020 - 00:30

( माझ्या ७६ व्या वाढदिवसा निमित्त लिहिलेली कविता )

केशर लाली क्षितिजावरची
सांज सकाळी अनुभवतो मी
गीत जीवना तुझेच ओठी
सूर लाउनी गणगुणतो मी

हजार असुनी एक त्यातली
मीच निवडली वाट चालण्या
यश माझे अपयशही माझे
नको कुणीही दूषण देण्या
खाचा, खळगे नसे काळजी
पडतो, उठतो, सावरतो मी
गीत जीवना तुझेच ओठी
सूर लाउनी गणगुणतो मी

आपुल्या फुलण्यातुनी

Submitted by निशिकांत on 8 October, 2020 - 11:44

बोलती झाली अबोली
आपुल्या फुलण्यातुनी
गारवा देते मनाला
गोडशा हसण्यातुनी

बारमाही फूल असते
बहरलेले अंगणी
जर कधी सुकलेच तर ते
दाटतो गुदमर मनी
प्रेमही, वेडी अबोली,
व्यक्तते रुसण्यातुनी
गारवा देते मनाला
गोडशा हसण्यातुनी

चाललेले काय असते?
अंतरी ती जाणते
यत्न करता लपवण्याचा
शस्त्रही ती उपसते
डाव हुकुमी खेळते ती
पापण्या ओलाउनी
गारवा देते मनाला
गोडशा हसण्यातुनी

...पाहिले म्यां डोळा

Submitted by अनन्त्_यात्री on 8 October, 2020 - 08:45

पालथ्या मुठीत घुसवलेली iv ची सुई
जीवघेण्या कवितेपेक्षा टोचरी.
अँटिव्हायरलच्या ठिबकसिंचनाचा
गिनीपिगी जीवरोपट्यावर विफल अभिषेक.
बेबंद नाडीठोक्यांपुढे मुक्तछदंही अचंबित.
धपापते विद्रोही तप्तश्वास.
PPE आच्छादितांच्या नि:शब्द कवायतींनी कोंदलेले भवताल.
स्वप्न-जागृतीच्या, शुद्धी-बेशुद्धीच्या
अस्थिर सीमारेषांवर भोवंडणारी
जाणिवानेणिवांची
कण्हणारी कडवट कडवी.
संपतील एकदाची आत्ताच
की,
ध्रुपदत राहतील
व्हेंटिलेटरच्या जागत्या पहार्‍यात
आज
उद्या
परवा?

नुसत्याच चर्चा वादळी

Submitted by निशिकांत on 6 October, 2020 - 10:56

 प्रश्न असुनी एवढे, का लुप्त झाल्या चळवळी
चालती टीव्हीवरी नुसत्याच चर्चा वादळी

लाख ह्रदयीच्या कपारी, एक नाही मोकळी
साफ मी करतोच आहे आठवांच्या अडगळी

शोधता दिसला तुला का भक्त एखादा तरी?
माय अंबे, पोट भरण्या कैक झाले गोंधळी

नेसुनी साडी जरीची, दोन वेण्या घालता
मॉड पोरींना दिसे ती एक काकू वेंधळी

मारणार्‍या शिक्षकांनी घडवली अमुची पिढी
आत ते मउशार, वरचा पोत होता कातळी

ऐकली कोल्हेकुई पण लक्ष ना तिकडे दिले
रूढवाद्यांच्या मते मी क्रांतिकारी, वादळी

का?

Submitted by केतकी धरोड on 5 October, 2020 - 13:59

समजत असूनही,
का उमजत नाही...
कळत असूनही,
का वळत नाही...
उत्तर माहीत असूनही,
का प्रश्न तेच पडतात...
रस्ता चूकीचा माहित असूनही,
का पावले तिकडेच वळतात..?

- केतकी धरोड

हिरे माळून आली सर दुपारी

Submitted by सुप्रिया जाधव. on 4 October, 2020 - 14:42

उन्हावर भाळल्याने भरदुपारी
हिरे माळून आली सर दुपारी

तुझा मेसेज नाही फोन नाही
कसा आलास तू लवकर दुपारी

समस्यांनो पळा, बाहेर खेळा
निजू द्या ना मला क्षणभर दुपारी

मनाचा चाळते अल्बम जरासा
चढत जातो स्मृतींचा ज्वर.. दुपारी

कधी होऊन शेजारीण माझी
मला मी मागते साखर दुपारी

जसा सुट्टीतला दंगा मुलांचा
तशी ही शांतता मनभर दुपारी

उलटते सुरकुत्यांविण रात्र सारी
तरी मी बदलते चादर दुपारी

दुपारी वास्तवाचे ऊन्ह पडते
सुकव आयुष्य दोरीवर दुपारी

सुप्रिया मिलिंद जाधव

Pages

Subscribe to RSS - काव्यलेखन