काव्यलेखन

आनंदाच्या दुधात ....

Submitted by राजेंद्र देवी on 20 October, 2018 - 13:28

आनंदाच्या दुधात ....

कधी बसून पाहिलेत का
कोवळ्या उन्हात
कधी पळून पाहिलेत का
मोकळ्या रानात

झाडाच्या गार सावलीत
घेतलात का कधी झोका
डोंगराकडे बघून कधी
मारल्यात का हाका

अंगणात टाकून अंथरूण
कधी मोजल्यात का तारका
ढगा आड लपलेला चंद्र
कधी पाहिलात का धुरका

पौर्णिमेच्या दिवशी कधी
केलीत का अंगत पंगत
अर्ध्या चटणी भाकरी बरोबर
कधी केलीत का संगत

पांघरुणात गुरफटून कधी
झेललित का रवी किरणे
सांज सावलीत कधी
ऐकलेत का गाईचे हंबरनणे

अंधाराशी नाते जोडते आहे

Submitted by निशिकांत on 18 October, 2018 - 23:51

(मी फार कमी कविता वृतांची किंवा मात्रांची बंधने झुगारून लिहिल्या आहेत; जेथे यमक असले तरीही लयबध्दता नाही. अशीच एक रचना बदल म्हणून प्रस्तूत.)

एकदा हो किंवा नाही सांगून टाक
ती तुझ्यासाठी कुढते आहे
अश्रूंना लपवून हसतेय खरी
पण अंधाराशी नातं जोडते आहे

ती नाजूक वेल थरथरणारी
जगायला अधाराची गरज आहे
आधार म्हणून कोण हवाय
याची तिला समज आहे
निराश होउन आकांक्षांच्या पर्णफुटीला
स्वतःच ती खुडते आहे
अश्रूंना लपवून हसतेय खरी
पण अंधाराशी नातं जोडते आहे

पापी कशी माणसे?

Submitted by निशिकांत on 17 October, 2018 - 00:48

पापी कशी माणसे?

( शार्दुल विक्रडीत वृत्तात माझी पहिलीच गजल. )

देव्हार्‍यात बसून तो ठरवतो की मी जगावे कसे
कर्ता तोच असेल अन् करविता, पापी कशी माणसे?

धर्मांधात जिहाद आज रुजला, कसली दया दावता?
फाशीवर चढवा लगेच नसता धरतील ते बाळसे

झाला खूप विकास आज पण का उपभोग्य वस्तूच ती?
स्त्रीसाठी जग ना कधी बदलले आहे जसेच्या तसे

होते कौतुक केवढे मुलांचे छोट्या कुटुंबामधे !
भावंडे इतकी मला! न झाले माझे कधी बारसे

का भ्यावे बघुनी विराट लाटा, फसवाच तो चेहरा
डोकाऊन बघा दिसेल शांती ह्रदयी नदीच्या असे

निवारा

Submitted by सयुरी on 16 October, 2018 - 11:39

चालत होते एकटीच
अनोळख्या वाटेवर
तुझ्या येण्याने
नवी वाट गवसली
छंद नव्हते कधी प्रेमाचे
पण सहवासात तुझ्या
साथ उमगली
वाढत गेला लळा
स्वतःचे मग भानही हरपले

तुझ्या हसण्यात माझे दुःख विसरले
तुझ्या रडण्यात माझे सुखही विसरले
आता प्रश्न पडतो,
नक्की होतास तूच की भास हा सारा
माझ्या हसण्यात पण दिसतो आसवांचा मारा

आजही आहे इच्छा मनी तुला पुन्हा मिळवण्याची
आताही रमून तुझ्या आठवणीत
शोधतेय माझं किनारा
कारण तुझ्याच मिठीत आहे माझा सुखद निवारा.

चांगुलपणाचे सोंग तू घेऊ नको

Submitted by द्वैत on 16 October, 2018 - 01:09

चांगुलपणाचे सोंग तू घेऊ नको
तुटणार जे आहे वचन देऊ नको

होतात का अश्रूंची ह्या पुष्पे कधी
इतका तरी निर्बुद्ध तू होऊ नको

सत्य विजयी होत असते शेवटाला
अफवांवरी विश्वास ह्या ठेवू नको

भक्त देवा आड जेथे दानपेटी
असल्या पवित्र मंदिरी जाऊ नको

थंड प्रेतांचे शहर निद्रिस्त आहे
स्फूर्तिदायी गीते तू गाऊ नको

द्वैत

बदलायला नको का?

Submitted by निशिकांत on 15 October, 2018 - 00:37

( तरही गझल. मतल्याचा सानी मिसरा प्रसिध्द गझलकार श्री भूषण कटककर "बेफिकीर" यांचा. )

तिज दार मंदिराचे उघडायला नको का?
काळानुसार आपण बदलायला नको का?

पत्नीमुळेच दरवळ अन् जीवनात हिरवळ
हे गूज लाडकीला सांगायला नको का?

लिहिण्या जहाल वास्तव काव्यातुनी कवींनी
प्राजक्त, प्रेम, तारे वगळायला नको का?

जर भेटले कुणी तर, का मख्ख लिफ्ट मध्ये?
पंख्याकडेच बघता, बोलायला नको का?

बाजार मांडलेला ज्यांनी रुढी, प्रथांचा
त्यांना विवस्त्र करुनी मिरवायला नको का?

जो चेहरेच दावी, लपवीत वास्तवाला
तो आरसा कधी तर भंगायला नको का?

काश्मिरी कळ्यांना

Submitted by Asu on 14 October, 2018 - 23:01

काश्मिरी कळ्यांना

लुटले काश्मिरी कळ्याकळ्यांना
ठाई ठाई बंदुका
निसर्गराजा दुःखी होऊन
रोज देतो हुंदका

बागबगीची कळ्याकळ्यांना
श्वास झाले कुंद का ?
प्रत्येक कळी फुलण्याआधी
आज देते हुंदका

हसणे गाणे कळ्याकळ्यांना
आज झाले बंद का ?
माय रडे लेकीसाठी
गळ्यात येई हुंदका

वारा छेडी कळ्याकळ्यांना
जन्मजात छंद का ?
झाडावरची फुले पाहुनि
देती केवळ हुंदका

एक सांगणे कळ्याकळ्यांना
वाऱ्या दावा दंडुका
रडणे भेकणे सोडा आता
नका देऊ हुंदका

इतिहास

Submitted by झुलेलाल on 14 October, 2018 - 09:55

सूर्याच्या बेंबीत बोट घालून
भाजलेल्या जखमेवर
चांदण्याचा लेप लावून
कंड शमविण्याच्या
वांझोट्या प्रयत्नाला
बंड म्हणायचे झाले तर
भरतील कित्येक पाने,
भविष्यातील इतिहासाची

निघत राहातील एकामागे एक
त्याच्याच नव्या आवृत्त्या
पानावरल्या प्रत्येक अक्षरावर
चढत राहतील सोनेरी मुलामे

लिहून काढावा भविष्यासाठी
कुणी असा एक इतिहास
मुलामा जपायची जबाबदारी
पुढच्या पिढ्यांनी घ्यायला हवी!

जग तसे फार मोसमी आहे

Submitted by बेफ़िकीर on 13 October, 2018 - 12:23

गझल - जग तसे फार मोसमी आहे
==========

जग तसे फार मोसमी आहे
तू जिथे काल, आज मी आहे

होय देहच तुझा असो शत्रू
वृक्ष देहच तुझा शमी आहे

घागरी फुंकतात या श्रद्धा
याइथे रोज अष्टमी आहे

बाग होती तशीच आहे ही
एक फुलपाखरू कमी आहे

मी कशाला तुझे बघू पत्ते
मान्य आहे, तुझी रमी आहे

आज काहीतरी बरे झाले
काय ब्रेकिंग बातमी आहे

मी स्वतःचा नसेनही उरलो
मी तुझा मात्र नेहमी आहे

काय होणार हे कळत नाही
छान, इतकीतरी हमी आहे

फार कोणी बनू न शकल्याने
मी तसा फार संयमी आहे

-'बेफिकीर'!

Pages

Subscribe to RSS - काव्यलेखन