बहुधा
उत्कटता शब्दांची संगत सोडत आहे बहुधा
नाते अपुल्या दोघांमधले बदलत आहे बहुधा
: mahesh more (स्वच्छंदी)
येणाऱ्या जाणाऱ्या रस्त्यावर घुटमळतो आहे
पाय तुझ्या गावाचा रस्ता शोधत आहे बहुधा
टप्प्यामध्ये आला तो तर कळेल त्याला विस्तव
तो माझ्या जगण्यास कोळसा समजत आहे बहुधा
एकेका शेराने उचकी वाढत आहे माझी
ती माझ्या गझलेचे पुस्तक वाचत आहे बहुधा
काल जिथे मी होतो पोहत तिथे आजही आहे
प्रवाहात मी उर्ध्व दिशेने पोहत आहे बहुधा
टिळा लावला पंगतीस अन् बोट सुगंधी झाले
कुणीतरी देहाचे चंदन झिजवत आहे बहुधा