पुन्हा दिसेल का?

Submitted by अर्जुन ..✍️ on 5 September, 2026 - 10:10

रे मना, सांग त्या वाटेवरती,
ती पुन्हा आज दिसेल का?
गोड आठवणींत जपलेली,
भेटीची वेळ पुन्हा येईल का?

लक्ष वेधण्या पुन्हा माझे,
पाहुनी तिला दुर्लक्ष करावे,
त्या व्याकुळ डोळ्यांनी मग,
मनातले सारे सांगावे...

हसून मी मग हळुवारपणे,
तिची अशी मनधरणी करत राहावे,
तिने प्रेमाने रागावून,
हक्काने मग माझ्यावर रुसावे...

शब्दांनी दूर लोटावे अन्,
नजरेने मज जवळ घ्यावे,
या अबोल खेळातही आपण,
आनंदाने रंगून जावे...

तिच्या चेहऱ्यावरचे हसू,
हीच माझी खरी कमाई व्हावी,
तिच्यासाठी झिजतानाही,
आयुष्याला एक दिशा मिळावी...

माझ्यासारखीच एक ओढ,
तिच्याही हृदयात असावी,
मला आपले मानताना,
तिच्याही मनात आस असावी...

दोघांचे सूर जुळावेत अन्,
शब्दांना अर्थ नवे मिळावेत,
शब्दांच्या त्या मैफलीत,
रोज नव्याने बंध जुळावेत...

जाताना ओठांवर तिच्या,
“पुन्हा कधी भेटणार?” असावे,
आणि त्या एका प्रश्नासाठी,
रोज नव्याने मी जगावे...

नात्यांच्याही पलीकडे असणारे,
एक वेगळे बंध असावे,
आयुष्याच्या प्रत्येक वळणावर,
“आपले” म्हणणारे कुणीतरी असावे...

Group content visibility: 
Public - accessible to all site users