काव्यलेखन

सोबती

Submitted by राजेंद्र देवी on 30 October, 2018 - 12:42

सोबती

एकटाच उभा मी
या सागर किनारी
ऐकत प्रत्येक लाट
मज हाक मारी

होता किती कोलाहल
मग्न होतो भर दुपारी
नाही आता ऐकवत
रात्र ही सुनसान तरी

काय गुन्हा होता आपला
का पुसली गेली रेखाटणे
आज चाललो त्याच वाटेने
सोबतीच गिळला ज्या लाटेने

राजेंद्र देवी

शब्दखुणा: 

ध्यास

Submitted by शिवाजी उमाजी on 30 October, 2018 - 06:30

ध्यास

वेळ तर पळत राही
वेदना छळत राही

जोडण्या बंध जाता
नातलग गळत राही

भोगता दु:ख थोडे
आत तो जळत राही

बांधता एक वाडा
दगड तो ढळत राही

जीव ज्या ध्यास लावी
गोष्ट ती मिळत राही

© शिवाजी सांगळे
संपर्क:९५४५९७६५८९
http://marathikavita.co.in/marathi-song-lyrics/()-31176/new/#new

शब्दखुणा: 

आठवणींची दिवाळी

Submitted by राजेंद्र देवी on 29 October, 2018 - 09:28

आठवणींची दिवाळी

कधी मनात फुलते
आठवणींची फुलबाजी
तर कधी थुई थुई नाचतो
आठवणींचा भुईनळा

अग्निबाणा बरोबर कधी
उंच जाते मन माझे
तर कधी जोरात आपटते
आपट बारा प्रमाणे मन माझे

कधी उडवत बसतो मी
आठवणींच्या टिकल्या
वेडा वाकडा हा पळतो
आठवणींचा भुंगा

उजळल्या पणत्या
आली शुभ दिवाळी
मनात माझ्या फक्त
तुझ्या आठवणींची रांगोळी

राजेंद्र देवी

मनस्वी

Submitted by Asu on 29 October, 2018 - 07:15

'मनस्वी'

'मनस्वी' की तपस्वी
अंक असेल वेगळा
रंगबिरंगी अन् सुगंधी
सर्वां लाविल लळा

मनमोहक मोरपिसावर
पडे प्राजक्ताचा सडा
मुखपृष्ठ पाहुनि याचे
कुणीही होईल वेडा

अंक नव्हे गमतो मजला
हा काव्य फुलांचा मळा
सुगंध घेण्या मन आतुरले
मी झालो खरोखर खुळा

मनस्वीच्या अंकाला
करू मानाचा मुजरा
काव्यरसे रंगून गुंगून
होई दिवाळसण साजरा

शब्दखुणा: 

जरा तडजोड करणारेच रस्ते शोधले असते

Submitted by SADANAND BENDRE on 29 October, 2018 - 02:21

जरा तडजोड करणारेच रस्ते शोधले असते
तुला मी जीवना अन् तू मलाही सोसले असते

पगारी कारकूनाचे मला काळीज असते तर
उमाळे बिनपगारी वेदनांचे खोडले असते

नवी खानेसुमारी भावनांची मांडली असती
किती अस्सल किती खोट्या, बरोबर मोजले असते

असूदे मोगरा किंवा असेना शेण मेजावर
सुखाने कोरडे छापील शेरे ठोकले असते

टपालावर कशाला मारला तू खासगी शिक्का
जगाने वाचण्याआधी मला ते पोचले असते

कशाला पाहिजे तो भिल्ल अन् तो बाणही त्याचा
फुकटच्या टाचणीवर काळजाला खोचले असते

मनाला मारताना फार काही वाटले नसते
कदाचित घास गिळताना जरासे टोचले असते

मन का थरथरले?

Submitted by निशिकांत on 29 October, 2018 - 01:11

मन का थरथरले?---

गुलाब, चाफा, जुई, मोगरा
अंगणात नव्हतेच बहरले
फेसबुकावर तुला पाहता
गंधाळुन मन का थरथरले?

मोहरलो मी आज अचानक
नाव तुझे अन् फोटो दिसता
भूतकाळच्या झंझावाती
फिरू लागलो बघता बघता
तुझ्या हासर्‍या शिडकाव्याने
बीज आठवांचे अंकुरले
फेसबुकावर तुला पाहता
गंधाळुन मन का थरथरले?

करून चिमणीच्या दाताने
अर्धा अर्धा पेरू वाटुन
घालमेल अंतरात होते
खातानाचा प्रसंग आठवुन
चिनगारीवरच्या राखेला
आज कशाला तू फुंकरले?
फेसबुकावर तुला पाहता
गंधाळुन मन का थरथरले?

मी मला

Submitted by एस.जी. on 28 October, 2018 - 23:56

गुंतलो मोहात मी मग मोकळा झालोच नाही
गवसले सारे तराणे मी मला दिसलोच नाही

उत्तरे मी फक्त झालो अन् खुलासे देत गेलो
काळजाला छेदणारा प्रश्न मी झालोच नाही

चांदण्यांचा ह्या तुझ्या मी व्देष केला सांग केव्हा
कमनशीबी मीच आहे मी तुला कळलोच नाही

भेदभावाला न थारा या व्यथांच्या पंगतीला
वाटणी माझी मिळाली मी असा चुकलोच नाही

सोडले तव नाव अंती सोडले तव गाव अंती
गुंतल्या पाशास पण मी सोडवू शकलोच नाही

शब्दखुणा: 

गुपित माझे

Submitted by द्वैत on 28 October, 2018 - 04:29

आरशाला ठाऊक कैसे गुपित माझे
मला न माझे ठाऊक ऐसे गुपित माझे

नावं ठेविली होती तिजला गुलाब जाई
फुलांप्रमाणे नाजूक ऐसे गुपित माझे

कटिंग सिगारेट हाती आणि मुखात शिव्या
कट्ट्यांवर सापडते ऐसे गुपित माझे

अवतीभवती असून सारे कुणीच नाही
कुणास मी सांगावे ऐसे गुपित माझे

मला कधी ना कमी मिळाली एकही पोळी
कसे आईला कळते ऐसे गुपित माझे

मला न होतो आता त्याचा त्रास कधीही
तरी कुणाला छळते ऐसे गुपित माझे

पुढे मिळाला कधी मला एक जन्म नवा जर
तुलाच पहिले सांगेन ऐसे गुपित माझे

देवपण

Submitted by अन्वय on 26 October, 2018 - 06:30

पूर्ण जर होतास तू तर विश्व हे रचिलेस का ?
तुझ्या अंतरी तेज होऊन वसले, सावलीचे दान त्यांस दिधलेस का ?
सूर्याच्या तेजासाठी का असतो अंधाराचा फिकटपणा
प्रार्थनेवाचून त्यांच्या देवपण सिद्ध केलेस का ?

जीवन माझे सजले आहे

Submitted by निशिकांत on 26 October, 2018 - 05:32

नक्षत्राचे लेणे लेउन जीवन माझे सजले आहे
कैक धुमारे, पर्णफुटीने अंगण माझे नटले आहे

रडलो, हसलो, जगलो, मेलो खुशीखुशीने, सांग जीवना !
असेच का अन् तसेच का? हे तुला कधी का पुसले आहे?

फलप्राप्तीची जरी अपेक्षा मनात नाही, तरी मंदिरी
देवासाठी नैवेद्याचे ताट पुढे मी धरले आहे

हिरव्या रोमांचांनी सजली श्रावणमासी तरी परंतू
ग्रिष्मझळांचे दु:ख धरेच्या खोल अंतरी लपले आहे

माझे ओझे मीच पेलतो भार नसे मी कधी कुणाला
मरण्याआधी माझ्यासाठी आज कफन मी शिवले आहे

भांडणातही संवादाला संधी द्यावी खरे परंतू
ज्योत भेटली अंधाराला असे कधी का दिसले आहे?

Pages

Subscribe to RSS - काव्यलेखन