जर्द पिवळी दुपार
जर्द पिवळी दुपार
दार ठोठावत येते
आत आत कोंडलेले
झळीनेच धुमसते
घोर फुफाटा धुळीचा
अणु रेणू तापलेला
मृगजळाच्या काठाशी
निवडुंग फोफावला
गारव्याची शीळ निळी
विजनातून घुमते
तिथे पोचायचे कसे?
बेडी पायात काचते
जर्द पिवळी दुपार
दार ठोठावत येते
आत आत कोंडलेले
झळीनेच धुमसते
घोर फुफाटा धुळीचा
अणु रेणू तापलेला
मृगजळाच्या काठाशी
निवडुंग फोफावला
गारव्याची शीळ निळी
विजनातून घुमते
तिथे पोचायचे कसे?
बेडी पायात काचते
ही धरा जरा ओलेती असती... रुजले असते.
वा सडून जाते, कुजते... पण हे असले नसते!
मी असते म्हणजे माझे दान माझ्या पदरी
मी असते म्हणजे माझा श्वास माझ्या उदरी
तुमचा श्वास मिसळला असता... जगले असते.
ही धरा जरा ओलेती असती... रुजले असते.
माझ्या असण्याची मुळे भटकली दहा दिशांना
अधांतरी बिलगून राहिली आभासांना
अंतरंग मातीचे कळते... निजले असते.
ही धरा जरा ओलेती असती... रुजले असते.
लकाकली चैत्र गुढी
केलं ऊन्हानं हो न्हानं
थंडाव्याला शिरी धरी
कडू लिंबाचं वं पान
आक्रसली जलाशये
माती उन्हानं तापली
लाही, लाही, जीव, जीव
करी सावली आपली
ऊन झळा बोलबाला
जीव जीव हो कावला
आम्र वृक्ष डहाळीत
गाणं कोकीळ गायला
अंग अंग शहारले
पान पान मोहरले
वृक्षवृक्षी हर्ष दाटे
कुणी वसंता हो केले?
फुलं, फळांची परडी
आला ऋतुराज दारा
जेव्हा माणसाच्या अंगी
खा-या घामाच्या हो धारा
खा-या घामाच्या हो धारा
© दत्तात्रय साळुंके
१४-४-२५
गाणे आधी सुचले की
तू आधी भेटलीस
आठवत नाही
पण मग अधून मधून
गुणगुणत राहिलो गाणे
आणि तूही भेटत राहीलीस
अधून मधून
असते निरंतर सुरु
टिकटिक, धडधड
आणि बरंच काही
आणि आपण मात्र
जगत असतो
हे असंच अधून मधून
- द्वैत
सोसूनि उन्हाचा चटका जळले तनु माझे
शीतल हवांचा शोध न लागे, दु:ख हे साचे
अंतास आता आरंभ गवसे, मंत्र हा काळा
प्रवास नव्याचा मार्ग खुला, चित्त हे उजळा
परतीत गेले मेघ उमटती, आशा हरपली
वर्षाव होता, संहाराची सीमा गाठली
वाटेवरीती अंधार होता, एकटी झाली
मार्तंड आला, तेजाने दिशा उजळली
सुखसुविधा या येऊनि बसती दारामाजी
स्वप्नांमध्ये फक्त दिसे हे, खरे काही नाही
सुवर्णयुग फसवेपणाने हुलकावणी देते
इच्छा बिचारी, कैद होऊनि थांबुनी बसते
हसतात फार लोक दुःख लपवण्यासाठी
हुंदका दाबला होता रडू रोखण्यासाठी
निजलेल्या मनाचा विचार कोण करेल
भांडतात लोक अरे! उत्तरे पुसण्यासाठी
रे! मिळवतात काय माणसे आयुष्यभर
टाकतात लाकडे मढ्यावर जळण्यासाठी
रस्ता , घर , जमीन, जंगल, पैसा, पाणी
धडपड चालू आहे पुढे कमवण्यासाठी
जिंदगी अशी असते एकटी मरण्यासाठी
नाते शेवटी असते कधीमधी भेटण्यासाठी
किती वागा गोड गे! किती बोला चांगलेच
बोट नेमके तेथेच येते पोटासाठी दारासाठी
हिशोब माझा गतकाळाचा हा! जुनाट आहे
नोंद थोडकी तेथेच आहे चंद्र, चांदण्यासाठी
आरश्या अंतरी आरसा पाहिजे
काळजाचा सुध्दा कवडसा पाहिजे
बघ तुझ्या भोवती फक्त रांगेल ती
एक पापा तिला गोडसा पाहिजे
लाट येईल ती उसळुनी भेटण्या
बस किनाऱ्यावरी भरवसा पाहिजे
दोन डोळ्यां सवे पंचइंद्रे दिली
काय अजुनी तुला माणसा पाहिजे
येत जा भेटण्या माळुनी तारका
साज शृंगारही छानसा पाहिजे
बोलतो वागतो बघ तुझ्या सारखा
मी असा तुज नको मग कसा पाहिजे
विश्वशांती हवी जर जगा तारण्या
शाक्य बुध्दा परी वारसा पाहिजे
जीजी
सजण
तुझे डोळे पावसाळी
जलद जलद
तुझ्या गालावर ओली
हळद हळद
रीतभात पुजलेली
इथे युगे युगे
काठ सुटताना नको
पाहू मागे मागे
आता फेर धरतील
श्रावण श्रावण
शोधशील सजणात
सजण सजण
काही स्वप्नं डोळ्यात राहिली,
काही ओठांवरच विरून गेली,
कधी नशिबाची साथ सुटली,
कधी वेळेनं दगा दिला.
पण वाटचाल सुरू आहे अजून,
थोडं थांबून थोडं चालून,
कारण स्वप्नं तुटली तरीही,
हौस उराशी आहे बाळगून!
कधी मनाच्या कोपऱ्यात
एकटेपणा सापडतो,
ओळखीच्या गर्दीतही
आपलंसं कुणी नसतं...
लोक येतात, जातात,
आठवणींचे घाव देतात,
आपण मात्र हसत राहूनही
आतून तुटत जातो...
वेळ बदलते,
माणसंही बदलतात,
फक्त आठवणींचे चरे
हृदयावर तसेच राहतात...
त्या आठवणींच्या सावल्यांत
मन हरवून जातं,
कधी आनंदाच्या क्षणांतही
डोळ्यांत पाणी दाटतं...
भूतकाळातली अपूर्ण स्वप्नं
डोळ्यांसमोर तरळतात,
आणि मन पुन्हा पुन्हा
जुन्या वळणांवरून फिरत राहातं...