एकल संध्या
क्षितिजावर एकल संध्या, क्षितिजापासून उदास,
झोळीत नभाच्या पसरे, तपकिरी खिन्न संन्यास -।।धृ।।
मातीचे फिटते देणे, मातीत मिसळता माती,
उत्सवास एकांताच्या, एकटेपणाची भीती,
चालणे नव्याने आता, उरलेला जुना प्रवास... ।।१।।
झोळीत नभाच्या पसरे, तपकिरी खिन्न संन्यास -।।धृ।।
घन निळे-जांभळे गहिरे, सोडून जाताना मागे,
हुंदक्यात उमलून येते, घर होते हळू-हळू जागे,
अंगणातील तुळशीचे, सावकाश मिटले श्वास... ।।२।।
झोळीत नभाच्या पसरे, तपकिरी खिन्न संन्यास -।।धृ।।