काव्यलेखन

तृप्ती शोधतो आहे

Submitted by निशिकांत on 31 August, 2018 - 00:56

पंचतारांकित चवीला भोगतो आहे
भाकरी पिठल्यात तृप्ती शोधतो आहे

अंतरी भक्ती नसोनी, रोज जगदंबे,
पोट भरण्या जोगवा मी मागतो आहे

का मनाची व्यर्थ केली स्वच्छता इतकी?
आज जो तो चेहर्‍याला पाहतो आहे

मंदिरी जो कैद आहे देव, त्याला मी
का अजूनी सर्वसाक्षी मानतो आहे?

साजरा फादर्स डे करतोस का पोरा?
दान पिंडाचे मृतात्मा मागतो आहे

वाट नाही पाहिली केंव्हा कुणी ज्याची
त्या भणंगालाच मृत्यू टाळतो आहे

रोजचे घटतेच आहे मुल्य पैशांचे
छापल्या नोटात गांधी हासतो आहे

झालर

Submitted by Asu on 30 August, 2018 - 22:23

झालर

गर्वाची जगण्याला
कॉलर नसावी
जगण्याला असावी
मानाची झालर

रक्ताची नाती
सक्तीची नसावी
नात्यांना असावी
प्रेमाची झालर

दगडमातिची घरं
फक्त नसावी
घराला असावी
मायेची झालर

रंगाचीच फुलावर
उधळण नसावी
फुलाला असावी
रूपाची झालर

ई्श्वरी श्रद्धा
अंध नसावी
श्रद्धेला असावी
ज्ञानाची झालर

शब्दखुणा: 

गुरकावणारा बॉस

Submitted by डॉ.विक्रांत प्र... on 30 August, 2018 - 11:36

काय म्हणतोस मित्रा
बॉस गुरकावला
गुरकावू दे रे
त्यांच्यावरही कुणीतरी आहेच
तो गुरकावला की
हा गुरकावणारच

पण तू मात्र गुरकावू नकोस
कारण गुरकावणे असते
भयाच लक्षण
ताणलेल्या सहनशक्तीचे
तटकन तुटन जाणे
आपणच आपल्या
संवेदनशीलतेवर केलेला आघात
जसा हातोड्याने करावा प्रहार
फुलून आलेल्या फुलावर

ना ना .. त्यांना नाही कळणार
नकोच समजावून सांगू
ते पुन्हा प्रहार करतील
कारण मन बोथट होते
अधिकाराच्या शक्तीने
वर वर जातांना लागलेल्या
ठेचांनी ,व्रणांनी

सूरमयी

Submitted by विजयाग्रज on 30 August, 2018 - 03:26

सूरमयी

अंतरंगी धुनधुने
वेणूची सुरबांसुरी
हलकेच नाद तिचा
मनी भिनवूनी गेलास तू

सावळ्या नभांतुनी
आर्द्रधारा कोवळ्या
कोमलांगी स्वरतुषार
शिडकावूनी गेलास तू

स्वररोमांच मनी
नव संजीवनाचे
संस्कार सुरमयी
झंकारूनी गेलास तू

मन्मनी स्वरसाज
रेंगाळतो पुन्हा
सप्तसुरांच्या बरसातीत
सचिंब भिजवूनी गेलास तू

सुरेल तान
अशी लकेर
लय जीवनात नवी
जागवूनी गेलास तू

विजयाग्रज

जिवन गाने

Submitted by vijaya kelkar on 29 August, 2018 - 11:30

जीवन गाणं

सरिते किती धावतेस गातगात
विचारले दोन्ही तीरांनी तिज सावरत
तारू चालले एक संथ गतीत , सांगत
ने मज मम गावी
ने मज मम गावी
अवखळ, तरी अलगद नेले आपुल्या गावी
नुकतेच उजाडले सोनपावली
रान मोकळे,पाखरं सुगम संगीत गात झेपावली
धावली गोवत्से , पिलांस मायसावली
मधुसेवना भृंग डोलती
राग येत नाही फूलां, उलट भावती
ठेका धरुनी साथ देती
प्रथम नक्षत्रांचे देणं
अंजुलीचे भरणं
विजयानंद हे मग जीवन गाणे
विजया केळकर______

आनंदच वेगळा

Submitted by निशिकांत on 29 August, 2018 - 00:35

साठी बुध्दी माझी
झाली की हो नाठी
कविता लिहिण्यासाठी
गावली कोरी पाटी

गैरवर्तन करतोय
सरळ सोप्या शब्दांशी
शब्दातून खेळतोय
भोगलेल्या अब्दांशी

निवडुंगाचं रान
आठवतय मला
त्यात सुध्दा रमण्याची
अवगत होती कला

आता बागेत गुलाबाचा
काटा पण रुततोय
थोड्याशा दु:खानं
जीव आत कुढतोय

काळ पडला मागे
जीवनमान सुधारले
वेदनांचे भाव कसे
एकदम वधारले

श्रीमंतीच्या हव्यासानं
भावविश्व अंधारलय
भोगवट्याचं भूत
जास्तच उंडारलय

श्रावणशीळ

Submitted by Asu on 28 August, 2018 - 23:55

श्रावणशीळ

शीळ घालितो सुसाट वारा, वेळूच्या बनाबनातून
जणू घुमतो कृष्ण पावा, गोपींच्या मनामनातून

लता वेली गुंग नाचण्या, शीळेच्या मंद तालावर
बासरीचे स्वरतरंग उठती, यमुनेच्या शांत जलावर

नर्तन करती श्रावण सरी, पिसाट वाऱ्याच्या सुरावरी
रानोरानी शीळ घालती, धुंद नर्तकीच्या घुंगरा परी

शीळ ऐकून जणु प्रकटले, इंद्रधनु ते निळ्या अंबरी
मोरपीस जसे खोवले, घननिळ्या कन्हैयाच्या शिरी

शीळेचे असे हे गारुड भारी, अनुभवावे एकदा तरी
आनंदे नित शीळ घालावी,उदास हृदयी प्रीत पेरावी

शब्दखुणा: 

गझल - माणूस समजणाऱ्यांना

Submitted by बेफ़िकीर on 28 August, 2018 - 11:31

गझल - माणूस समजणाऱ्यांना
==========

आहात जवळ माझ्या हे, कळले असणारच त्यांना
मी दूर किती आलो हे, सांगा माझ्या घरच्यांना

वय कधीच झाले तुमचे, मुलगाही पन्नाशीचा
कॉम्प्लेक्स नका देऊ ना, शिकवा माझ्या वडिलांना

जो मला भेटतो त्याचे, मी मन सांभाळत बसतो
जगलो तर माझा पत्ता, कळवा मन मेलेल्यांना

वाहतुक पुण्याची करते, माझ्या हृदयाची कॉपी
येण्याची संधी आहे, पण बंदी जाणाऱ्यांना

उघड्या खांद्यांच्या पोरी, बघतो मी रस्तोरस्ती
दाखवणे जमते ते जग, दाखवते बघणाऱ्यांना

पुन्हा त्याच गावात आलो

Submitted by स्वच्छंदी महेश on 27 August, 2018 - 03:15

पुन्हा त्याच गावात आलो
- स्वच्छंदी/महेश मोरे

तुझी भेट घ्याया लिलावात आलो
कळालेच नाही न् प्रेमात आलो

जणू काय जादूच स्वप्नात झाली
दिला हात हाती न् ह्रदयात आलो

जुना फाटका कोपरा पेपराचा
तुला भेटलो चारचौघात आलो

भ्रमंती जगाची जरी खूप केली
फिरूनी पुन्हा त्याच गावात आलो

असा जिंदगीचा लळा लागला की
पुन्हा श्वास घेऊन देहात आलो

शब्दखुणा: 

Pages

Subscribe to RSS - काव्यलेखन