माझ्या UAE मधल्या १०-१२ वर्षांच्या प्रवासात मी अनेक लोकांना भेटलो आणि त्यांच्याशी अनेक विषयांवर बोललो.काही अनुभव अतिशय वाईट होते , पण 'जे जे उत्तम उदात्त उज्ज्वल ' ते ते घेऊन अनुभवाची शिदोरी अधिकाधिक समृद्ध करणं या एकाच ध्येयाने मी आजवर पुढे जात आलो आहे.
प्रत्येक पुरुषाच्या आयुष्यात एक असा दिवस येतो जेव्हा त्याची चौकशी आणि उलटतपासणी एकदम होते! आणि साहजिकच तो दिवस त्याला स्वच्छ आठवतो. म्हणूनच ह्या गोष्टीची सुरुवात 'तो दिवस मला स्वच्छ आठवतो' ह्याच वाक्याने करतो आहे. अनेक मुलीकडल्यांच्या - पोलिस स्टेशनच्या पायऱ्या चढाव्या तशा - पायऱ्या चढून आणि तिथे 'चौकशी' शिवाय काहीही हाती न लागून आम्ही ह्या घराचे दार वाजवले. आधी एवढे अनुभव घेतल्यामुळे आमच्या घरच्यांचे चेहरे 'इथे तरी न्याय मिळेल काय' असे झाले होते. मी मात्र 'आता पुढे काय' असे भाव ठेवून होतो.