मनाचे दार
मी मनाचे दार उघडून, आत नकळत पाहिले
वाचले ते सांगताना, भान नाही राहिले
डोह जरी हा खोल भारी, दडून आत्मे त्यात होते
भासती जरी ओळखीचे, दूर त्यांना ठेवले
काळरात्री गूढ छाया, जवळ येऊ लागल्या
गोठलेले प्राण त्यांचे, तेज पाहून थबकले
दाटता ढग संशयाचे, थांग नाही राहिला
काय खोटे ठरवताना, भय कुणाचे वाटले
एक अश्रू कोरडा मग, ओघळे गालावरी का
दार मिटून घेत असता, खिन्न हसणे ऐकले
पाहिले जे चित्र मनीचे, पाहणे आता नकोसे
नेत्र असूनी आज मी का, अंधकारा जवळ केले