दुपार
गणपतीपुळ्यामध्ये दर्शन घेऊन परत निघाले. येताना आपल्या जुन्या कॉलेजवरून जाता यावं आणि जरा वेगळा रस्ता म्हणून माझ्या घराला जवळ पडणारा निवळीचा हायवे न पकडता चाफ़्याकडून शिरगांवला जाणारा रस्ता पकडला. मे महिन्यातली दुपारची टळटळीत वेळ. खरंतर मे महिना म्हणजे आमच्या गावाकडे पूर्वी आंबे काजू फ़णसाचा आणि त्याचबरोबर चाकरमान्यांच्या पाहुणचाराचा महिना. पण हल्ली हाच महिना “टूरीस्ट सीझन” असतो. कुठून कुठून लोकं “कोकण फ़िरायला” म्हणून येतात. इथल्या समुद्राची, निसर्गाची आणि माशांची अप्रूपाने स्तुती करतात. स्थानिक बापडे त्यांची निव्वळ मजा बघत असतात. त्यांना या कशाचं काहीही कौतुक नसतंच.