ब्लाऊस पिस

Posted
5 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
5 वर्ष ago
Time to
read
1’

आमच्याकडे विदर्भात खास करुन अकोल्यात आणि आजूबाजूच्या गावात कुणाच्या भेटीला एखादी स्त्रि गेली असेल आणि ती जर जवळची असेल तर तिला ब्लाऊज पीस देतात. आमच्याघरी जेंव्हा कपाट नव्हते तेंव्हा आई वेगवेगळ्या रंगाचे ब्लाऊज पीस एखाद्या कापडी पिशवीत नाहीतर पेटीत बोचकून ठेवून द्यायची. बर्‍याचदा तेच ब्लाऊज पीस आई इतर कुणाला द्यायची. दुकानदाराकडे जर तुम्ही डझनानी ब्लाऊज पीस विकत घ्यावयास गेलात तर ते आधी विचारत कुणाला द्यायला वगैरे असेल तर दुसरे पीस दाखवतो. ही दुसरी पीसे म्हणजे कमी किमतीची, सुती, आणि ६०-६५ सेंटीमीटरची असत. आमच्याघरातील सगळ्याच स्त्रिया म्हणजे आई, मावशी, आत्या, माझ्या पाच बहिणी कधी एकट्या जात नसत बाहेर बाजारात. माझी बहिण मला न्यायची. तीन चाकी रिक्षात बसायला मिळायचे म्हणून मी अगदी हरखून जायचो तिच्यासोबत बाहेर फिरायला. पुढे मग असे होऊन गेले की तिची आणि माझी एक जोडगोडी जमून गेली. पण रिक्षा ठरवताना ती इतकी घिसपिट करायची की सगळा मुड ऑफ व्हायचा. हीच गत चपला घ्यायला जाताना, साड्या घ्यायला जाताना, आणि ब्लाऊज पीस घ्यायला जाताना देखील व्हायची. तिची रंगसंगती पुर्वी खूप छान होती. पण नंतर नंतर असे झाले की एकाएकी तिच्या रंगसंगतीत फरक पडला. तिची रंगसंगतीची सगळी हुशारी माझ्यामधे तिने पास केली. हल्ली मी तिला भुतकाळात शिरुन इतके नाव ठेवते पण तिचे लक्षच नसते. आमच्याकडे मी भारतात गेल्यानंतर वर्षभर पुरतील इतके कपडे मला घरच्यांसाठी घेऊन ठेवावे लागतात. शेजारी राहणारे जोशी काका काकू पुर्वी अरे यशवंत आला का .. मग जा आमच्यासाठी दोन टॉवेल, दोन नऊवार, दोन उपरणे, एक डझन ब्लाऊज पीस, अर्धा डझन खण, दोन बंड्या, दोन धोतराच्या जोड्या हे सर्व आण. आणि पैसे घ्यावे लागतील. असे बजावून सांगत. जोशी काका वयाचा ९३ वर्षी निघून गेलेत. जाताना त्यांच्या अंगावर मी विकत आणलेले नवेकोर कपडे होते. मला तेंव्हा इतके भरुन आले होते की अगदी हे वाक्य लिहिताना देखील डोळ्यातून अश्रू ओघळतात. फोनवरुन त्यांची बातमी घ्यायला गेलो आण त्यांची भाची म्हणाली बघ तुला आता बाजारात जायची गरज भासणार नाही. पण, तू आणलेले कापड ते सोबत घेऊन गेले. मला ऐकवलेच नाही हे वाक्य.

माझी आत्या आणि आई ह्यांच्यामधे एक तेढ होती. पण ती तेढ कधीच खूप लांबली नाही. दोघीजणी एकमेकींच थोडफार करायच्यात. आईला एक पीस ती द्यायची तर आई तिला कधी चोळी बांगडी केल्याबिगर पाठवायची नाही. आमच्याकडे किती वेगवेगळी पाहूणे येत असत आणि अनोळखी मावश्यांची तर कधी कमतरता भासत नसे. मी सर्वात लहान म्हणून मला सतत ह्या मावशांचे प्रेम मिळत असे. अर्थात जाताना पैसे, येताना शेवचिवडा. त्यावेळी ते खूप मौल्यवान वाटे. आता जंक फुड म्हणून चार हात लांबच बरे!!!!

हा लेख मला मुद्दाम खूप लांबवायचा नाही. पण काल रात्री जुने मित्र पण आता मैत्री नसलेले मित्र भेटलेत. मला का कुणास ठाऊक ब्लाऊज पीसची ही वर्‍हाडी परंपरा आठवली. एखादे नाते टिकवून ठेवायला ह्या परंपरा खरच मदत करत असाव्यात. आमच्याकडे ब्लाऊस पीस उघडून पाहिले की जर त्यावर कुंकवाचे हातबोट असेल तर बहिणी म्हणायच्या हे काय जुनेच तर दिले. आणि हे काय फक्त ६५ सेमीचे पीस. पण त्यावर आईचे एकच उत्तर असे. दिले ना. ते महत्त्वाचे. आमच्या ऑफीसमधे बर्‍याच तमिळ तेलुगु मुली होत्या. भारतातून परत येताना वा ईंडोनेशियाला फिरायला गेलो तर मी तेथून त्यांच्यासाठी कापडच विकत आणायचो. वेगवेगळ्या देशातून गावातून शहरातून त्या त्या भागातली कापडाची दुनिया बघायला मला फार आवडते. त्यामुळे कुठेही फिरायला गेलो की मला जास्त दिवस लागतात कारण माझ्यासाठी खास पर्यटक स्थळे कधीच पर्यटन स्थळे नसतात. मला हवी असते, तिथली भाषा, तिथली घरे, तिथली झाडेझुडपे, तिथले गरीब, तिथल्या झिजलेल्या गल्ल्या आणि खूप काही. माझ्या कलीग्सना माझी ही भेट वेगळीच वाटायची. आणि त्यामुळे मी जरा इतरांपेक्षा वेगळाच व्हायचो. आज खूप दिवसानंतर मला अनुचा फोन आला तर ती म्हणाले अरे देखो कलही मैने एक कुर्ता सिलवाया तुनमे दिये हुये बाटिक का!!! त्यावर मी उत्तरलो... चलो इस बहाने आपको हमारी याद तो आयी!!!!!!!!

- बी

विषय: 
प्रकार: 

छान लिहितोस बी Happy

तू लिहिलेली ललितं वाचताना शाळकरी बनून पाठ्यपुस्तक समोर धरले आहे असे वाटत राहते. अतिशय चांगल्या अर्थाने लिहिले आहे मी हे.

अगो, धन्यवाद. तू नेहमीच माझ्याशी छान बोलते असा कायम अनुभव आहे माझा.

शैलजा, धन्यवाद. हो अगदी जुन्या आठवणी आहेत ह्या.

खरच मनापासुन उतरलय अस वाटत.. पुर्वीच्या पिढिला या प्रथेच अजुनही फार कौतुक आहे, मी सुधा भारतभेटित गेल्यावर काही ठिकाणाहुन ब्लाउज पिस देवुन ओटि भरुनच पाठवण करतात.. मी ते वापरणार नाही याची मला आणि कदाचित त्या.नाही खात्रि असतेच पण
मी कधी नकार देत नाही .. त्याचा उपयोग मी देवाला वस्त्र, आसन म्हणुन करते..
माझी आई शिवण क्लास घ्यायची तेव्हा तिच्याकडे अगदी गरिब बायका सुधा येत त्यान्च्याकडे खुपदा कटि.न्ग शिकायला कापड ही नसे ... त्या.न्ना आई ब्लाउज पिस घरातुन असेच कपडा क.न्टिन्ग साठि देत असे.

हम्म. परत एक भारताबाहेर रहाणार्‍यांचा कुंथुन कुंथुन काढलेल्या जुन्या आठवणींचा उमाळा.

बी, अगदी समरसून लिहिलं आहेस. पोलक्याचं कापड द्यायची पद्धत बहुतेक सगळीकडेच होती. आमच्याकडेही आई पोलक्याच्या कापडांची चळत बाळगून असायची. पुर्वी साड्यांमध्येही ब्लाउझ पीस घालून दिला जायचा. आता एकतर साडीसोबतच असतो किंवा रुमाल घालून देतात.

---
तू लिहिलेली ललितं वाचताना शाळकरी बनून पाठ्यपुस्तक समोर धरले आहे असे वाटत राहते. अतिशय चांगल्या अर्थाने लिहिले आहे मी हे.>>> +१

परत एक भारताबाहेर रहाणार्‍यांचा कुंथुन कुंथुन काढलेल्या जुन्या आठवणींचा उमाळा. >>> बी ची बाजू घेण्यासाठी म्हणत नाहिये, पण मला वाटतं तो जिथे जातो तिथलं बरंच काही मनात साठवून ठेवत असावा.

खरंतर, आपल्याही मनातल्या आठवणींना स्थळकाळाची बंधनं नसतातच. परदेशी जा अथवा नका जाऊ, तुमचं मन हा एक असा प्रदेश असतो की जो तुमच्या सोबतच प्रवास करत असतो. आणि त्या प्रदेशातली गल्ल्या बोळं म्हणजे आपल्याला समजायला लागल्यापासून ह्या क्षणापर्यंत मनावर कोरल्या गेलेल्या स्टोरेज फाईल्स. त्या फाईल्स उघडून पाहणं म्हणजे नेहमीच "उगाळणं" असतं असं नव्हे.

तुमचं मन हा एक असा प्रदेश असतो की जो तुमच्या सोबतच प्रवास करत असतो. आणि त्या प्रदेशातली गल्ल्या बोळं म्हणजे आपल्याला समजायला लागल्यापासून ह्या क्षणापर्यंत मनावर कोरल्या गेलेल्या स्टोरेज फाईल्स<<<

सहमत! एक उर्दू शेर आठवला.

गाहे गाहे इसे पढा कीजे
दिलसे बेहतर कोई किताब नही

========

बी,

लेखाच्या विषयाची निवड आवडली. (बहुधा 'खण' असेही म्हणत असावेत). माझी आई असे खण जमवून ठेवायची, ऐनवेळी कोणालातरी द्यायला वगैरे! पूर्ण लेख वाचला नाही, थोडा भाग वाचला. छान लिहिलेले दिसते आहे.

मस्त लिहीलयं. घरी आलेल्या स्त्रीला खण / कापड देणे हा त्या स्त्रीचा बहुमान समजला जात असे जुन्या काळात.

विदर्भातच नाही. खण आणि मग नंतर ब्लाऊज पीस देण्याची पद्धत सगळीकडेच असावी.
आईकडे असायची चळत. बेसिक शिवणकाम शिकले तेव्हा आईकडची ती ब्लाऊज पिसेसची चळत संपवून टाकली होती.
कोकणात गावी वगैरे गेले की मलाही मिळतात असे पीस.

विदर्भातच नाही. खण आणि मग नंतर ब्लाऊज पीस देण्याची पद्धत सगळीकडेच असावी.......असावी नव्हे. सगळीकडेच पद्धत आहेच.
बी, साधेसे अकृत्रिम लिखाण आवडले

छान ललित.
आमच्या घरी पण पुर्वी असायचे, पण आता साड्या नेसणार्‍या मुलीच कमी झाल्याने अन्य भेटी दिल्या जातात.
आता मुंबईत एकाच रंगाच्या सर्व शेड्स एकत्र ठेवलेली दुकाने दिसतात. पुर्वी तशी नसायची. मग साडीला मॅचिंग ब्लाऊजपीस शोधणे ( मूळात कुठला रंग मॅच होतोय तेच ठरवणे ) यातच सगळा वेळ जायचा.

साडी बरोबर ब्लाऊज पीस दिल्याशिवाय ती भेट पूर्ण होत नाही. तो नसेल तर निदान पैसे तरी दिले जातातच.
कोल्हापूर भागात पुर्वी खणाची प्रथा होती. अंबाबाईच्या देवळाजवळ त्रिकोणी घड्या केलेले खण मिळत. मध्यंतरी
ते परत लोकप्रिय झाले होते.

छान लिहिलं आहेस बी!

आमच्याकडे आई, मावश्या, काकवांकडे कपाटात नाहीतर पेटीत असा ब्लाऊज पीसेसचा (आलेल्या व विकत घेतलेल्या) स्टॉक हमखास आढळतो. त्यांच्या किंवा त्यांच्याहून जुन्या पिढीतल्या पाहुण्या आल्या की त्यांना निरोप देताना त्या ब्लाऊज पीस सकट देतात. आम्ही किंवा आमच्यापेक्षा लहान पिढी ब्लाऊजपीसला न्याय देणार नाही हे माहित असल्यामुळे आम्हाला बटवे, पर्सेस, स्टोल्स, पिशव्या वगैरे दिल्या जातात. अतिथीला रिकाम्या हाताने पाठवायचे नाही असे काहीसे धोरण व प्रेमाची आठवण हे प्रयोजन त्यामागे असावे.

अकु +१ नीरजा +१
आमच्या कडे पण असायची चळत . कोणीही बाई आली कि हमखास हळद कुंकू लावून दिल जायचं Happy
आज काल अगदी लग्नामध्ये सुद्धा साड्या नेसणार्या कमी बायका/मुली उरल्यामुळे साड्या सुद्धा दिल्या जात नाहीत तर ब्लाउज पीस ची काय कथा ? मस्त जुन्या आठवणींना उजाळा Happy
अश्विनी के .खूप सुरेख प्रतिसाद Happy

आवडलं. घरी आलेल्या बायकांना हळदकुंकु लावून ब्लाऊजपीस द्यायची पद्धत सगळीकडेच आहे बी. मोठ्या शहरांतूनही.

सुरेख लेख बी! अशा आठवणींचा स्मृतीगंध कायम दरवळत असतो मनात.
ही पद्धत बहुधा साऊथ इंडियन लोकांमधेही असावी. कारण माझ्या इथल्या साऊथच्या मैत्रिणीसुद्धा निरोप देताना खणाचा ब्लाऊजपीस, हळदीकुंकवाच्या पुड्या आणि सुपारी, विड्याचे पान सोबत देतात.

बी, तुझे लेख वाचले की मनानं विदर्भात जाऊन आल्यासारखं वाटतं नेहमीच.

Pages