फुलासंगे
फुलासंगे मातीला आले सुगंधीपण
संतासंगे पंढरीत दगडवीट पावन
संतत्वच भारलेले पांडुरंगा पायी
वीट पुंडलिकानं दिली भिरकावून
संत पावलांना मस्तकी धाराया
देवा दारी नामा होई दगड पायरीचा
चरणधुळ संताची लागताच भाळा
झाला पांडुरंग, देहभाव विरे त्याचा
चरण स्पर्श होताच रामरायाचा
जन्म तेजाळावा शापीत अहिलेचा
तसा झाला सजीव एक एक पत्थर
पांडुरंग, पांडुरंग बोलले अंतर
जिथे जिथे लागले हात संतांचे
भाग्य उजळले त्या त्या ठाईचे
भिंतीनाही जर लावलात कान
श्रवणची होईल अवघे अभंगांचे