माझी संस्मरणीय भटकंती : ज्याची त्याची वारी.....
साधारणपणे मे महिन्याच्या शेवटच्या आठवडयात पुण्याच्या वर्तमानपत्रात ‘पालखीच्या व्यवस्थेसंदर्भात कलेक्टर कार्यालयात उद्या बैठक’ अशा स्वरूपाची बातमी येते आणि मग पाठोपाठ ‘पालखी मार्गाची दुरावस्था’ वगैरे मथळ्यांखाली पालखी मार्गाच्या बाजूला पडलेला राडारोडा, रस्त्यावरील खड्डे वगैरे छायाचित्र येतात. स्थिर, संथ तळ्याच्या पाण्यात कोणीतरी गमतीने दगड टाकावा, आणि त्याचे तरंग तळ्याच्या काठापर्यंत हळूहळू पसरत जावे, तसा ‘पालखी’ हा विषय पुण्यात आणि परिसरात पसरत जातो. जसा जसा देहू किंवा आळंदीहून पालखीच्या प्रस्थानाचा दिवस जवळ येऊ लागतो, तसा त्या संदर्भातील बातम्यांना आणि चर्चेलाही रंग चढतो.