मी लिहिले चार शब्द जे भावले माझ्या मनी
शाप द्या वा थाप द्या त्या भावनांचा मी ऋणी
मी सुखाचा ही ऋणी अन् मी दु:खाचा ही ऋणी
तेच धन मग मिरवितो मी चार शब्दांचा धनी
धन्यवाद हे ईश्र्वरा तू कूस माझी उजविली
भावना प्रसवून झालो पुरूष जन्मी माऊली
थोर हे उपकार देवा लाज मजला तू दिली
हाव मजला थोरली पण बुद्धी नाही चोरिली
काय वय ह्या लेखणीचे, काय आमुची मगदुरी
खेळ-खेळा वयात वदले, श्री माऊली ज्ञानेश्वरी
-रोहन
भावार्थ दिपिका महात्म्य
ज्ञानेश्वरी ग्रंथ । केवळ महान ।
स्वये नारायण । कृपा करी ।।
ओवी नव्हे साच । परी हे दर्पण ।
दाखवाया जाण । आत्मराज ।।
ऐसी थोर कृति । ज्ञानदेवी केली ।
भाविकांसी भली । उद्धराया ।।
तया ग्रंथांतरी । रिघावे सज्जनी ।
मृदुभाव मनी । धरोनिया ।।
त्याही वरी भेटे । अंतरंग ज्ञाता ।
तरी येत हाता । पूर्ण सार ।।
भावार्थ दिपिका । ग्रंथराज थोर ।
लाभतो साचार । पूर्वपुण्ये ।।
जरी कृपालेश । माऊलीचा मिळे ।
तरीच आकळे । भावार्थासी ।।
ज्ञानदेव थोर
ज्ञानदेव थोर । योगीयांचा राणा ।
भावे देवराणा । मूर्त केला ।।
ज्ञानदेवीतूनी । करिसी उघड ।
ब्रह्मविद्या गूढ । सकळिका ।।
वर्णियेला हरी । निर्गुण अनंत ।
जरी शब्दातीत । सांगे श्रुती ।।
शब्द अमृताचे । ठेवोनिया फुडे ।
ब्रह्मचि रोकडे । रुप केले ।।
भाषा मराठीची । गुढी उभविली ।
गगनीही भली । सामावेना ।।
यथार्थ गौरव । माऊली नामाने ।
भाविक प्रेमाने । हाकारिती ।।
जन्मोजन्मी ठाव । देई चरणांशी ।
तेचि सुखराशी । शशांकासी ।।
रूप जाहले अरुप
रंगे सावळा सोहळा
जिवा लगे निज ओढ
भेटी श्रीरंग कानडा
कर ठेऊनिय कटी
मुख शाश्वत सुन्दर
दाटू येई माया खोल
भरे समाधानी उर
निराकार चैतन्याशी
जुळे नाते निराकार
आसावल्या दिठी दिसे
विठू माऊली साकार
लय जुळता सख्याशी
कोण मी कोण सावळा
विश्व सारेच माऊली
जीव आनंद सोहळा
जीव आनंद सोहळा
धन्य माय ज्ञानदेवी
नित्य चैतन्य वहाते
ज्ञानदेवी ओवीतूनी
नाद कैवल्याचा गोड
घुमे शब्दाशब्दातूनी
फुले मोगरीचा मळा
ज्ञानदेवी ओवीतूनी
परिमळ प्रतिभेचा
आसमंत सुखावूनी
समईची शांत ज्योत
तेवतसे ओवीतूनी
फिटे अंधार जुनाट
मन प्रकाशी न्हाऊनी
ज्ञानदेवी ओवीओवी
अमृताच्या धारावाणी
लाभे तापल्या जीवाला
अवचित संजीवनी
ज्ञानदेवी माय माझी
कशी कृपावंत भली
तिच्या कुशीत रिघता
तृप्तताही विसावली....
कार्तिक वद्य त्रयोदशी, माऊली संजीवन समाधी सोहळा
माऊलीचरणकमली समर्पित...
ज्ञानदेवी साच । माऊलीच मूर्त । देतसे अमृत । साधकासी ।।
शांत मनोहर । देखणे नितळ । कोवळी विमळ । शब्द रत्ने ।।
निववी साधका । शब्दचि कौतुके । भाव अलौकिके । ठसविती ।।
ओवी ओवीतून । ज्ञान योग कर्म । दावितसे वर्म । ज्ञानदेवी ।।
सद्गुरुंच्या मुखे । अाकळे यथार्थ । मुख्य तो भावार्थ । ठाई पडे ।।
एकचित्त भावे । पठण मनन । ह्रदयी स्मरण । नित्य होता ।।
देतसे अाशिष । माऊली विशेष । साधका निःशेष । सप्रेमाने ।।
समाधान मुख्य । भक्तिभाव खूण । माऊली संपूर्ण । कृपा करी ।।
संतांचे उपकार
भक्तासाठी देव | होतसे प्रगट | येरा तो अदृष्ट | आकळेना ||
भाव ऐसा थोर | देवापायी नित्य | जीवभाव सत्य | लुप्त होई ||
आठविता चित्ती | एकमात्र हरि | लौकिक विसरी | पूर्णपणे ||
वेड लागे देवा | भक्ताचेच पूर्ण | सांडिले निर्गुण | अरुपत्व ||
ठाकतसे उभा | भक्ताचे ह्रदयी | निर्गुण सामायी | सगुणत्वे ||
आकळावे वाटे | कोणासी श्रीहरि | अभंग उच्चारी | सप्रेमाने ||
ज्ञानेश्वरी गाथा | मनन - चिंतन | स्वये नारायण | दृष्य होई ||
तू माझी माऊली .....
हे ज्ञानदेवा, हे ज्ञानराजा,
तुमचे -माझे नाते तरी काय आहे बरे नेमके ? का तुमच्या नावाने, आठवाने ह्रदयात कालवते, डोळ्यात आसवं दाटून येतात ? एक मराठी भाषिक म्हणून ? का तुमच्या ज्ञानदेवीने वेड लावलेला कोणी एक सामान्य रसिक म्हणून ? का तुमच्या तत्वज्ञानाची भूल पडलेला कोणी एक अभ्यासक म्हणून ? का अजून काही ??
तुम्ही खरे तर योगीयांचे योगी, ज्ञानीयांचे देव, प्रत्यक्ष श्रीविष्णूंचा अवतार...