जे सत्य सुंदर सर्वथा.... (एचआयव्ही व आरोग्य जागरूकता सायकल प्रवासाचे अनुभव): २. केडगांव चौफुला ते इंदापूर

Submitted by मार्गी on 2 December, 2018 - 12:16

जे सत्य सुंदर सर्वथा....: २. केडगांव चौफुला ते इंदापूर

जे सत्य सुंदर सर्वथा.... :१. चाकण ते केडगांव चौफुला

१३ नोव्हेंबरची पहाट. आज दुस-या दिवशी केडगांव चौफुल्यावरून निघायचं आहे. चांगला आराम झाल्यामुळे पहाटे फ्रेश वाटतंय. उजाडेपर्यंत तयार होऊन निघालो. इंदापूरपर्यंत आज मस्त हायवे आहे. कालच्या तुलनेत कमी वेळ लागणार. पण सायकल प्रवास अपेक्षेनुसार होत नाहीत! आजही त्याचा अनुभव येणार आहे. निघालो तेव्हा कडक थंडी आहे. ह्या प्रवासात दररोज सुरुवातीला एक- दिड तास मला कडक थंडी लागणार आहे. आणि नंतर दुपारी कडक ऊनही असेल. पहाटेच्या थंडीत हायवेचा आनंद घेत सायकल चालू केली. सूर्योदयाचं छान दृश्य दिसलं.

कुरकुंभजवळ एक छोटा घाट लागला. इथे सायकल अगदी हळू चढतेय. घाट आरामात पार झाला. पण सायकल पंक्चर झाल्याचं जाणवलं. दुस-याच दिवशी तेही सकाळीच पंक्चर शॉकिंग वाटलं. बाजूलाच सर्विस रोड आहे, तिथे सायकल उचलून नेली. पंक्चरचं सर्व सामान माझ्याकडे आहेच. पण मानसिक दृष्टीने पंक्चरसाठी तयार नव्हतो. पण मग लगेचच टायर सुटं केलं. टायर तपासलं तेव्हा अनेक काचेचे छोटे तुकडे सापडले. नक्कीच त्यापैकी एकाने पंक्चर केलं असणार. हळुच ते सगळे काढून टाकले. जवळ स्पेअर ट्युब असल्यामुळे फक्त ट्युब बदलली. पंक्चर झालेली ट्युब इंदापूरला नीट करेन. हे करत असताना काही लोक गोळा झाले. बाजूच्याच पाटस एमआयडीसीमधले कामगार असावेत. त्यांच्याशी ह्या सायकल मोहीमेच्या उद्दिष्टांविषयी बोललो. लवकरच सायकल तयार झाली. पण पंक्चरमध्ये ४५ मिनिटं गेले. निघण्यापूर्वी नवीन टायर का नाही बसवले म्हणून स्वत:वरच थोडं चिडलो. मी नवीन टायर घ्यायला गेलोही होतो, पण साईज मॅच न झाल्यामुळे घेतले नव्हते. असो.

पंक्चरच्या व्यत्ययामुळे थोडं उदास वाटतंय. तसाच जात राहिलो. मध्ये मध्ये टायर तपासतोय. आता आजूबाजूला रमणीय दृश्ये आहेत. सह्याद्रीच्या पर्वतरांगा व उपरांगा आता मागे पडत आहेत आणि पुणे जिल्ह्याच्या टोकाकडे येतोय तसं सर्व लँडस्केप समतल होत जातंय. आजूबाजूच्या नैसर्गिक सौंदर्यामुळे लवकरच मनातला पंक्चरचा ताण निघून गेला. सायकलिंगचा हा फायदा! आजूबाजूचे नजारे बदलत राहतात व त्यामुळे मनात एकच भाव सतत राहात नाही. विचार करतोय की, ज्या प्रकारे एचआयव्ही प्रीव्हेंटीबल आहे, टाळता येऊ शकतो, तसं पंक्चर टाळता येऊ शकतं का? पूर्ण जागरूकता असेल तर एचआयव्ही शंभर टक्के प्रीव्हेंटीबल आहे. पण पंक्चर फिफ्टी- फिफ्टी आहे! पन्नास टक्के तर प्रीव्हेंटीबल आहे, बाकी नशीबावर अवलंबून आहे. आपण फक्त टायरमध्ये योग्य ते प्रेशर ठेवून ते तपासत राहू शकतो. काही बारीक दगड किंवा काचेचे तुकडे लागले तर ते काढू शकतो.

हळु हळु दृश्य बदलत जात आहेत. त्यातच रस्ता अगदी शानदार आहे. इथून पुढे मस्त जलाशय आहेत. त्यामुळे थोडा उतारही आहे. भिगवणच्या जवळून जाताना मस्त जलाशय दिसले! इथे पक्षी अभयारण्य असल्यामुळे रस्त्यावरूनही बरेच पक्षी दिसले. जसा मी पंढरपूरच्या दिशेने जातोय, तसे अनेक वारकरी दिसत आहेत. इंदापूर जवळ येत गेलं तसं सगळा सपाट परिसर मिळतोय. पण आता ऊनही वाढतंय. पंक्चरमध्ये फक्त ४५ मिनिटेच गेली नाही‌ तर लयही तुटली. त्यामुळे इंदापूरला पोहचताना दुपारचा एक वाजला. इथल्या कला- वाणिज्य महाविद्यालयातल्या गेस्ट हाऊसवर थांबेन. आज ८५ किलोमीटर झाले. अगदी इंदापूर गावातही लोक माझी विचारपूस करत आहेत. गेस्ट हाऊसला मस्त आराम केला.

संध्याकाळी ह्याच महाविद्यालयात एका छोट्या कार्यक्रमात मी बोलेन. एनएसएसच्या माजी सदस्यांनी त्याचं आयोजन केलं आहे. दुपारी आराम झाल्यानंतर पंक्चर नीट केलं. आता दुसरी स्पेअर ट्युब माझ्याकडे तयार आहे. माझं पंक्चर कौशल्य अजून तितकं परिपूर्ण नाहीय. नुकतीच दिवाळी झाल्यामुळे महाविद्यालयात विद्यार्थीही फार नाही आहेत. पण एनएसएसच्या माजी सदस्यांनी आयोजन मस्त केलं. विनोदजी गायकवाड सरांनी कमी वेळेत सगळी तयारी केली. एनएसएस चे काही जण आणि काही विद्यार्थिनी कार्यक्रमात आल्या. त्यांच्याकडे वेळ कमी होता, म्हणून थोडक्यात माझ्या मोहीमेबद्दल सांगितलं. ह्या महाविद्यालयात आधीही एचआयव्ही जागरूकतेवर कार्यक्रम झाले आहेत. आयोजकांनी रिलीफ फाउंडेशनच्या सहकार्याने ह्या विषयावर व आरोग्यावर भविष्यातही काम करण्याची इच्छा व्यक्त केली.

दूस-या दिवशीही ८५ किलोमीटर झाले.

पंक्चर होऊनही दुसरा दिवस योजनेनुसारच पार पडला. उद्या पंढरपूरला जाईन. उद्या बाल दिन आहे आणि मी ह्या प्रवासातल्या पहिल्या बाल गृहाला भेट देईन. तिथे मुलांना भेटेन आणि खूप काही बघायला मिळेल. ह्या विचारांमध्येच झोप आली.

पुढचा भाग: जे सत्य सुंदर सर्वथा.... (एचआयव्ही व आरोग्य जागरूकता सायकल प्रवासाचे अनुभव): ३. इंदापूर ते पंढरपूर

अशा इतर सर्व लेखांसाठी- माझा ब्लॉग

Group content visibility: 
Use group defaults