तापलेला रस्ता, वितळलेल डांबर, घामाच्या धारा, गरम वारा, उन्हाच्या झळा, तहानलेले जीव, व्याकुळ नजरा. वासरांच्या तापल्या पाठी चाटणार्या गाई. आकाशाकडे बघणारे पक्षी. गरिब बापडा पिसारा आवरुन बसलेला मोर. आग ओकणारा सुर्य. बापरे. कधी एकदा पाऊस येतोय याची प्रत्येकजण वाट बघत होते. उकाडा वाढतच चालला. निसर्ग पावसाची वाट पाहात होता. जुनी कात टाकुन वसंतात झाडांना नवी पालवी फ़ुटली आणि सुष्टी पावसाच्या स्वागतासाठी तयार झाली. हळु हळु आकाशात मेघांची दाटी होत चालली. मधेच सुर्याच्या आड येणारे ढग पाहिले आणि सर्व सृष्टिला धीर आला. मोर पिसारा झटकुन तायार झाला होता, चातकाला आपली प्रतिक्षा संपणार म्हणुन आनंद झाला.
१० जुन २०१३
ती नेहमी मला बोलते, जेव्हा तू मला भेटतोस, हसत नाहीस.. जसा लग्नाआधी हसायचास.. जेव्हा लांबूनच बघायचास.. नजर पडताच खुलायचास.. आता तिला कसे समजवू, उगाच हसता येत नाही मला, आणि कृत्रिम हसायला तर मुळीच जमत नाही.. लग्नाआधीची गोष्ट वेगळी होती.. आता तुला भेटणे आणि तुझ्याबरोबर घरी जाणे रोजचेच आहे.. रोज तशीच तूच दिसणार हे ठाऊक आहे.. मग का उगाचच ते औपचारीक हसणे.. पण.., गेले दोनचार दिवस मात्र हे रुटीन बदलले होते.. तिच्या कॉलेजला सुट्ट्या, तर घर ते ऑफिस माझ्या एकट्याच्या वार्या.. आजही एकटाच होतो.. आणि ती कसल्याश्या कामासाठी बोरीबंदरला गेली होती.
पाऊस आवडत नाही
तो मनास भिजवत नाही
सगळ्यांनी रस्ता धरला
दु:खाचे उरकत नाही
ती स्पष्टच 'नाही' म्हणते
पण मलाच समजत नाही !
मैफल रंगत नसताना
अर्ध्यातुन उठवत नाही
मी शेर मांडला नव्हता
टाळ्यांना समजत नाही
ती अशी पाहते मजला
की स्वत:स पाहत नाही
बन 'जितू' देव तू आता
माणुसपण सोसत नाही
....रसप....
१४ जून २०१३
http://www.ranjeetparadkar.com/2013/06/blog-post_15.html
पाऊस आवडत नाही
तो मनास भिजवत नाही
सगळ्यांनी रस्ता धरला
दु:खाचे उरकत नाही
ती स्पष्टच 'नाही' म्हणते
पण मलाच समजत नाही !
मैफल रंगत नसताना
अर्ध्यातुन उठवत नाही
मी शेर मांडला नव्हता
टाळ्यांना समजत नाही
ती अशी पाहते मजला
की स्वत:स पाहत नाही
बन 'जितू' देव तू आता
माणुसपण सोसत नाही
....रसप....
१४ जून २०१३
http://www.ranjeetparadkar.com/2013/06/blog-post_15.html
८ जुन २०१३
पहिल्या पावसाची चाहूल लागल्यापासून बायकोचे कुठेतरी लांबवर फिरायला घेऊन चल चालूय.. तिचेही खरेच आहे.. पावसाळा हा काही खिडकीतून बघायचा उत्सव नाही.. कडाडणारी वीज अन गडगडणारे ढग.. घरबसल्याच धडकी भरवतात.. जणू काही शत्रू अंगावर चाल करून येतोय.. पण मैदानात उतरायचे ठरवल्यास तेच जोडीदार बनून राहतात.. तरीही लांबवर कुठे जायचे म्हणजे वेळ हवा, सुट्टी हवी.. पैशाचेही सोंग काही घेता येत नाही.. जमेल तेव्हा जाऊच, पण आजची संध्याकाळ भाऊच्या धक्क्यावर घालवूया म्हणालो.. हो ना करता झाली तयार..
दरवर्षी असाच
अचानक
तू मला गाठतोस,
ह्यावेळी फसणार नाही,
तुझ्या भुलाव्याला
ह्या माझ्या भ्रमाला
मोडीत काढतोस....
काहीच कसं
ऐकून घेत नाहीस
नकाराचा पर्यायही
बाकी ठेवत नाहीस
दुनियादारीचा चढवलेला मुखवटा
खसाखसा पुसून काढतोस....
जेवढा बाहेर......
तेवढाच
मनातही कोसळतोस....
ओले मेघ उरी झुरती
फुटोनी कोसळाया;
वीज जणु शुभ्र होते
प्राणांना उजळाया..
सरी येती देत जाती
भिजण्याचे बहाणे;
पान फुल झाड हले
घालताती उखाणे..
कवेत घेती आज मला
पाझरत्या पाऊसधारा;
चिंब मनाचे रान झाले
वाऱ्यावरती मोरपिसारा..
विझून गेले ऊन जीवाचे
वैशाखाचा व्याकूळपणा;
मागती तरी धूळ माती
निळाईच्या स्वप्नखुणा..
- सई
नो चिकचिक नो झिगझिग
अन दरवळणारा मातीचा वास
आज आमच्याइथे पहिला पाऊस पडला !
अंग भिजवायला पुरेसा नव्हता,
मन मात्र पार न्हाऊन निघाले..
- तुमचा अभिषेक
उधळत खिदळत होतो
त्या नीलसागरात
सुवर्णमत्स्य संगतीने
पाण्याचे गीत गात
हातात हात माश्याच्या
पाण्यात सुरांची साथ
लव्हे डोलता किनारे
बिलगुनी आनंदात
पाण्याचे ऐकून गाणे
नभ व्याकुळतेने पुरता
बोलवित मजला तिकडे
लेऊन सफेद कुर्ता
मज कडेवरी घेऊनी
दिनकर मेघदूत झाला
निरोप देऊन सागरास
तो आभाळी आला
खूप खूप खेळुनी
मी नभाच्या समवेत
धुंद होऊन जावे
जिथे जिथे नभ नेत
खेळ खेळता खेळता
मळला तयाचा सदरा
हात फिरवूनी मायेने
घेतसे मजला उदरा
प्रेमळ कुशीत नभाच्या
होतो निजून शांत
ऐकून कोरडी हाक
मोडला ओला एकांत
पाहून हाक कोणाची
मन गलबलून आले
हिरव्यागार धरेचे
केवळ माळरान झाले
ढग मग येतात आभाळाची कावड भरून
हवेत एक हळवा गारवा हलकेच देतात पसरून
आत्ममग्न थेंबांची आवर्तने होत राहतात काही काळ
हिरवेलेसे गढूळ पाणी साचत जाते सभोवताल
मौनात शांत थरथरत झाडं जगून घेतात हिरवेपण
धुरकट हवेत चुकार शीळ ओलावलेले पंख पण
पिवळ्या प्रकाशाची नक्षी आता ढगांच्याही पाठीवर
निथळणाऱ्या क्षितिजाच्याही पल्याड घुमते एक सर
टिपून घेतो काचेवरचा एक थेंब अस्पर्शसा
एक मेघ आत दडलेला बरसाया आतूरसा