पाऊस

! अवेळीचा पाऊस आणि तू !

Submitted by Unique Poet on 7 May, 2011 - 07:37

! अवेळीचा पाऊस आणि तू !

अवेळी येणार्‍या पावसाला पाहून
मला आठवतेस ती , तू

धांदल, गडबड उडवणारी ,
चकीत करणारी तू

मी येतेय रे , आपण भेटूया
असल्या क्षूल्लक शिष्टाचारात न पडणारी तू

रोजच पडतोय असा येणारा पाऊस
आणि कालच भेटल्यासारखी बोलणारी तू

अवेळीच्या पावसाला मी हरखून पाहत राहतो
जसं वर्षभराचं एकदम बोलणारी तू

झाडं,रस्ते,बिल्डींग,बंगले सगळ्यांना चैतन्य देणारा पाऊस
माझ्या मनाचं मळभ हटवणारी तू

अवेळी आला तरी सुखावणारा पाऊस
प्रसन्नतेचा शिडकावा करणारी तू

गुलमोहर: 

पाऊस

Submitted by फुले नेत्रा on 3 March, 2011 - 13:21

पाऊस...
किती सांगू याच्याबद्दल,
कविताही कितीतरी झाल्या या पावसावर
पण तरी तो ऐकेचना
सोबत एक आठवण घेऊन येतो
आणि म्हणतो, कर ना एखादी कविता माझ्यावर

किती सांगितलं त्याला
बाबा रे निघून जा, निघून जा आणि येऊ नकोस परत
आणि कोण तू..? मी का करू कविता तुझ्यावर..?
पण तरी तो ऐकेचना
सोबत एक आठवण घेऊन येतो
आणि म्हणतो, कर ना एखादी कविता माझ्यावर

शेवटी मलाच राहवेना,
घेतला पेन बसले लिहायला
तर शब्दच सुचेना
मग उठले,
म्हटलं किती वेळ वाया घालवू कविता करण्यात या पावसावर
पण तरी तो ऐकेचना
सोबत एक आठवण घेऊन येतो
आणि म्हणतो, कर ना एखादी कविता माझ्यावर

पेन बंद करुन मी चटकन उठले

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

पाऊस येता

Submitted by शुभांगी. on 7 January, 2011 - 06:03

रात्र नाही , चांदोबा नाही, का ग झाला अंधार??
पळत येवुन बघतो तर घड्याळात वाजले चार

मला मात्र ओरडू नको, करु नको थयथयाट
ढगांना त्या सांगणार कोण थांबवा गडगडाट?

ढगांच्या त्या आवाजाची, वाटते मला भीती,
दिवे सुद्धा गेले, दादा सांगतो भुताच्या गोष्टी

टपटप टपटप येतो आवाज, अंगणामधुन फार
तिकडे जावे हळुच, तर आज्जी देइल मार

ढग नको ,आवाज नको, हवे नुसते पाणी
डराव डराव बेडकाची, डबक्यामधली गाणी

मला वाटते भिजावे, आणि खेळावे होडी होडी
ताईला मात्र खिडकीत काय, यात आहे गोडी

चंदु आला, पिंकी आली, मी ही मारतो कल्टी
भिजु नको आई म्हणते, होईल मला सर्दी

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

मज्जाखेळ[३-५]: वाफेचे पाणी

Submitted by सावली on 5 December, 2010 - 21:43

जेव्हा जेव्हा पाऊस पडतो तेव्हा तेव्हा पाऊस कसा पडतो असा एक प्रश्न घरी विचारला जातो. गेले अनेक दिवस मी "वाफ वर जाते, मग थंड झाली कि पाऊस पडतो" वगरे थोडक्यात सांगत होते.
परवा चहा प्यायला बसले आणि परत हाच प्रश्न आला. त्यावेळी दाखवलेला हा पिटुकला प्रयोग.

वयोगट: [३-५]

साहित्य:
कुठलीही गरम वाफाळणारी वस्तू , चहा, दुध, वरण काहीही.
एक थंड स्टीलचा पेला / चमचा

कृती:
-चहा कसा गरम आहे, त्यातून कशा वाफा येत आहेत ते सांगा.
-मग स्टीलचा पेला कसा थंड आहे ते हात लाऊन दाखवा
-आता पेला वाफेवर १ ते २ मिनिट पकडा किंवा झाकून ठेवला तरी चालेल.

शब्दखुणा: 

पाऊस आणि ती

Submitted by मंदार शिंदे on 25 September, 2010 - 14:58

"काय, ओळखलंस का मला? हो, तोच मी - ज्याची वर्षभर वाट पहायचास तू. माझ्या पहिल्या स्पर्शानं आनंदीत व्हायचास, नाचू लागायचास. आठवतंय का काही? यंदा झालंय तरी काय तुला? माझ्या येण्याची चाहूल लागली की लगेच दारं-खिडक्या बंद करुन घेतोयस. अरे, मन मोकळं करुन बोल की माझ्याशी. नेहमी बोलायचास तसाच... पुन्हा..."

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

कान्ह्याची बासुरी

Submitted by अरुंधती कुलकर्णी on 11 September, 2010 - 10:49

पावसाच्या आठवांत
माझा जीव चिंब झाला
निथळत्या अंगणात
गंध दरवळ ओला

तगमग झाली शांत
तृष्णा धरेची भागली
काळी वसुंधरा माय
बीजे तृप्त हुंकारली

सृष्टी झाली झाली दंग
गान वृक्षांचे आगळे
साज मोत्यांचे लेऊन
उभे पूजेला ठाकले

असे भिजले गं मन
जशा श्रावणाच्या सरी
काया झाली हलकीशी
निळ्या कान्ह्याची बासुरी....

--- अरुंधती

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

तू नसताना

Submitted by चाऊ on 1 September, 2010 - 10:03

तू नसताना, का असा हा पाऊस बरसून पडतो
थंड ओला वारा असा का अंगांगाला भिडतो
उजेड थोडा, कुंद सावळा, उदासवाणा मिटतो
गडगडणारा घन गंभीर का मत्तपणे हा घुमतो

तू नसताना आठवणींचा महापूर हा येतो
भिजल्या ओल्या क्षणाक्षणांचा दंश काळजा होतो
वहात जातो आयुष्याचा अर्थ जळाच्या संगती
गढूळलेल्या लाटा फुटती विद्ध किनार्‍यावरती

आता कळले, पाऊस असा का तू नसताना येतो
आवेग तुझा, तुझाच स्पर्श, सोबत घेऊन येतो
मेघदूत, अस्वस्थ, तुझे, गंध संदेश देतो
विरही मला, तुझ्या सारखा चिंब मिठीत घेतो

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

प्रणयाचा पाऊस!

Submitted by निमिष_सोनार on 28 August, 2010 - 00:26

पाऊस बरसला,
सुगंध पसरला!

श्वास मोहरला,
सहवास बहरला!

मंद तारा,
धुंद वारा!

प्रेमात ओला,
आसमंत सारा!

मन फुलले,
तन उमलले!

प्रणय पाहूनी,
क्षण थांबले!

-- निमिष सोनार, पुणे

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

पाऊस

Submitted by मंदार शिंदे on 22 August, 2010 - 19:24

बाहेर पडणारा पाऊस
खिडकीतून बघणारा मी.

अंगणातल्या मातीचा गंध -
नभातून धरणीवर
जणू अत्तराचा सडा,
सृष्टीची ही उधळण
खिडकीतून बघणारा मी.

भिजलेली सडक -
नुकतीच न्हालेली
जणू श्यामल तरुणी,
सडकेचं हे नवं रुप
खिडकीतून बघणारा मी.

पावसाच्या मार्‍यात हिरवं झाड -
लाजेनं चूर झालेली
जणू नवी नवरी,
पावसाची ही सारी किमया
खिडकीतून बघणारा मी.

पावसात भिजू नये म्हणून
बाहेर न पडणारा मी -
खिडकीतून पाऊस बघताना
नकळत चिंब झालोय,
तुझ्या आठवणींनी...

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

स्वैर कल्पना: "वीजपाऊस"

Submitted by निमिष_सोनार on 9 August, 2010 - 12:29

चंदामामा वीज विकत घेतो...
सूर्यदादा कडून!

चांदण्याताईंना वीज मोफत वाटतो ...
ओंजळ भरून!

महिनाभर निघते आकाश,
प्रकाशाने उजळून!

महीना संपल्यावर सूर्याकडून येते,
विजबीलही भरभरून!

बील भरले नाही तर सूर्यदादा बघतो...
रागाने थरथरून!

चंद्राची वीज कापतो अमावस्येला...
चंद्राकडे पाठवून!

ढगआजोबा करीती थयथयाट...
चंद्राला विझलेला पाहून!

उडल्या वीजरूपी ठीणग्या अन संतापाच्या जलधारा ...
त्यात पृथ्वीताई निघाली न्हाऊन!

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

Pages

Subscribe to RSS - पाऊस