गाणे थेंबाचे

Submitted by यःकश्चित on 16 December, 2012 - 01:14

उधळत खिदळत होतो
त्या नीलसागरात
सुवर्णमत्स्य संगतीने
पाण्याचे गीत गात

हातात हात माश्याच्या
पाण्यात सुरांची साथ
लव्हे डोलता किनारे
बिलगुनी आनंदात

पाण्याचे ऐकून गाणे
नभ व्याकुळतेने पुरता
बोलवित मजला तिकडे
लेऊन सफेद कुर्ता

मज कडेवरी घेऊनी
दिनकर मेघदूत झाला
निरोप देऊन सागरास
तो आभाळी आला

खूप खूप खेळुनी
मी नभाच्या समवेत
धुंद होऊन जावे
जिथे जिथे नभ नेत

खेळ खेळता खेळता
मळला तयाचा सदरा
हात फिरवूनी मायेने
घेतसे मजला उदरा

प्रेमळ कुशीत नभाच्या
होतो निजून शांत
ऐकून कोरडी हाक
मोडला ओला एकांत

पाहून हाक कोणाची
मन गलबलून आले
हिरव्यागार धरेचे
केवळ माळरान झाले

भेटावया तिला मी
सारून नभांना दाट
मज निरोप देताना
नभ करून देई वाट

घेऊन निरोप नभाचा
वसुंधरी झेपावलो
स्पर्शून काळ्या माईला
मनोमन सुखावलो

-यःकश्चित

Group content visibility: 
Public - accessible to all site users

वाह !

खरच अप्रतीम

घेऊन निरोप नभाचा
वसुंधरी झेपावलो
स्पर्शून काळ्या माईला
मनोमन सुखावलो
>>>>वीशेश

श्रीवल्लभ व वैशाली...मनःपुर्वक धन्यवाद..