दुःख कधी मी झाकले नाही
दुःख कधी मी झाकले नाही, ना कुरवाळले त्यास कधी
पण सोडता मज सोडवत नाही, जगण्याचा हव्यास कधी
पंचेद्रियांनी भोगतात काही, सहजी अत्तरांचे ताटवे
अखेरचा घेतला मी न जाणें, तो सुवासिक श्वास कधी
पायीं लोळण घेत होती, खरीच सुखांची रास तिथे
पाय वळून वदले नसती, खरे मृगजळी आभास कधी
मी तरीही हसतो उसने, सोशीत प्राक्तनाचे भोग हे
अवसेच्या चंद्रास का सुटला, पौर्णिमेचा ध्यास कधी
क्षणिक सुख लाभले सर्वां, या गझलेच्या मैफिली
कुठे उमटले हळुवार उमाळे, कुठेतरी उच्छवास कधी
- रोहन