आस ही मूर्त झाली
ऋतू आगळा हा ऋतू सावळा हा
ऋतू पावसाळी कसा साजिरा हा
भले थोरले मेघ हे वर्षताती
जळा निर्मळाते बहू ओतताती
घनाकार होता असे अंतराळी
रवीने पहा त्यागिली ते झळाळी
कसा वायु तो शीत कोंडे उराशी
नवा श्वास घेते धरित्री जराशी
नवे थेंबुटे देत संजीवनी का
नवा साज लेती वनी वल्लरी का
मनाला तशी येतसे ही उभारी
नव्या अंकुरे आस ही मूर्त झाली
आज नवा पाऊस आलाय
आता तुझा फोन येईल
बोलू आपण बरच काही
रोजच्याच गोष्टी,
रोजचच जगणं, जिंकणं, हरणं,
कोठेही पावसाचा उल्लेख न करता
उरात भरलेला मातीचा गंध लपवत
थंड वा-यानं अंगावर फुललेला काटा
मनात उठणारी ढगांची सावळ संध्या
आणी आपल्या दुराव्याची कळ सोसत
एक शब्द ही नसेल जवळिकेचा
दडवलेला सल, न भेटण्याचा,
तरीही
ओल्या स्पर्शाची फुलं
उबदार श्वासाची भूल
आणी डोळ्यातली ओल
पोहोचवील मेघदूत तूझ्यापर्यंत
शब्दांमधल्या निश:ब्दतेमधून
काल माझ्या अंगणात आभाळ आलं होतं.
त्याला पाहून माझा आनंद गगनात मावेना.
मी भारावून त्याच्या पाया पडलो.... त्यानेही माझ्या पाठीवरून हात फिरविला.
उभ्या अंगातून एक वीज सळसळत गेली...
पण ही वीज जाळणारी नव्हती तर उबदार होती...
अगदी गुलजार साहेबांच्या एखाद्या तरल कवितेसारखी.
मंत्रमुग्ध अवस्थेत मी चाचरतच आभाळाला म्हटलं, " माझ्याकडे तुला द्यायला काहीच नाही पण..."
आभाळ प्रेमळपणे हसलं अन् म्हणालं, " अरे बाळा, ... पाऊस कधी खालून वर जातो का? "
असं म्हणत त्याने माझा हात त्याच्या मुलायम हातात घेतला, गालावर प्रेमाने थोपटलं आणि एक पाऊस मला भेट म्हणून दिला.
आलायस तर खरा...
आता थांबणार आहेस की
दडी मारणार आहेस लगेच
हुरहूर लावून?
मनाचं ओसाड माळरान आधीच तापलंय, वैतागलंय...
त्यावर आता पाऊलभर हिरवी शाल पांघरशील,
निष्प्राण पायवाटेत नवी ओढ रुजवशील
आणि नंतर नेहमीच्या लहरीपणाने पाठ फिरवशील!
मग पहिल्याहून अधिक असह्य
दुष्काळ सोसावा लागेल...
हे सगळं व्हायच्या आधीच सांगतोय -
एकतर थांब तरी, किंवा मग जा तरी!
तुझी वाट पाहणं चालूच राहील -
तू सगळे बहाणे विसरून, तुझा हट्टीपणा सोडून,
आवेगाने, ओढीने आणि तृप्त मनाने
बरसू लागेपर्यंत!
तेवढा उन्हाळा सहन होईल या मनाला...
- नचिकेत जोशी
पाऊस वेंधळा पुन्हा नव्याने आवेगाने येतो
नव्या सरींनी तिच्या सयींचे जुनेच गाणे गातो...
पाऊस वेंधळा भल्या सकाळी धसमुसळासा दिसतो
अन योग्यासम संध्याकाळी ध्यान लाऊनि असतो...
पाऊस वेंधळा कधी तिच्या मग डोळ्यामधला विरह वाचतो
तिच्या अंगणी तुळशीपाशी डोह साचतो...
पाऊस वेंधळा नको वाटतो अंधारातून...अंधाराचा
उदास निश्चल अगतिक चेहरा या दाराचा...
पाऊस वेंधळा तरी कशाने मित्र वाटतो?
तो जाताना का डोळाभर मेघ दाटतो?
..............
पाऊस वेंधळा अन माझ्याही अशा मनस्वी ओळी
तो गेला कि रिते रिते नभ, रितीच माझी झोळी...
खाटेवरती का म्हातारी पडल्या पडल्या कण्हते आहे
कुणीतरी या नरड्यामध्ये ओता पाणी म्हणते आहे...
ऊन असे कि काळ्या मातीनेही अगदी प्राण सोडले
बांधावरली बाभूळ वेडी तरी सावली विणते आहे
ढेकळातल्या आडव्या रेषा भाळावर दिसणारंच नक्की
झोळीमधल्या क्षीण मुलाचे नशीब यातून बनते आहे...
पिवळ्या खुरट्या गवतामध्ये गाय मारते असंख्य टोचा
भकास डोळ्यावरती माशी पिसाटशी भणभणते आहे...
कधीतरी या तप्त उन्हाने घाम फ़ुटावा आभाळाला
अंथरुणावर धरती व्याकूळ तापाने फ़णफ़णते आहे....
--- संतोष वाटपाडे
ताण (टेंशन) – एक बोधकथा

बारमाही कधीही वादळवारे, पाऊस पडणाऱ्या एका प्रदेशात एका धनिक शेकर्यााला घरकामासाठी, गोठ्यातील कामासाठी व गुरांची राखण करण्यासाठी एक नोकर हवा होता.
एका सकाळी एक मरतुकडासा मुलगा त्याच्याकडे आला व त्याने त्याच्याकडे नोकरीची याचना केली. "तू काय काय करू शकतोस?' असे मालकाने थोड्याशा टाळण्याच्या सुरातच त्याला विचारले.
मुलगा म्हणाला, "वादळीवार्यासह गडगडाटी धुवांधार पाऊस पडत असताना व वीजांचा कडकडाट होत असतांनाही मी रात्री शांतपणे गाढ झोपू शकतो !'
शिरवे आले अंगावरती
वैशाखमासे भिजली माती,
तप्त सरोवरे झाली थंड,
मयुरासंगे मने नाचती
वार्यासंगे करुनी गट्टी
मेघांनीही केली दाटी,
लपवूनी त्या दिनकराला
काळोखा धाडले अवनीवरती
झट्कूनी आपले ओले अंग
श्वान ही झाले होते दंग,
सुगंध मातीचा भटकंतीसाठी
आरूढ झाला वार्यावरती
फूले फुलली मने खुलली
बालबालका नाचू लागली
चातकानेही तहान भागवली
जलधारांनी धरती सजली
आठवणीने स्पर्शाच्या शहारले अंग
जशी जुई थरथरली वा-याच्या संग
नेहमीच सारखा आला तो धुमसून
तर त्या पावसाची चूक काय? सांग!
गंध मातीचा बेधुंद करणारा
केसातल्या गज-याची ओळख सांगणारा
तो तर येणारच पहिल्या सरींसवे,
मग त्यात पावसाची चूक काय? सांग!
सावळं अंधारं वादळ जमणार
विजांचा कडाड अन घन घुंमणार
सय वादळाची तुझ्या डोळ्यातल्या, मनातल्या
आली, त्यात पावसाची चूक काय? सांग!
भिजून सुखावून सारं गपगार
पुन्हा नवे हिरवे धुमारे फुटणार
आस आणि आशा पुन्हा भेटीची,
आली, त्यात पावसाची चूक काय? सांग!
येशील जाशील पावसासारखी
पुन्हा वैशाखात होरपळण्यासाठी
आलं मनात असं काही, उगाचच,