साहित्य

तुझ्यासाठीच...

Submitted by Meghvalli on 26 March, 2026 - 11:23

तुझ्यासाठीच गुंफला हा भावविश्वाचा पसारा,
तुझ्यासाठीच फुलवला हा प्रेमाचा मोर पिसारा।

तुझ्या एका स्मितहास्यात विश्व सगळं उजळून गेलं,
मी मात्र सावल्यांमध्ये शोधत राहिलो निवारा।

तुझ्या स्वप्नवेलींनी बांधला मी श्वास माझा,
तुझ्या भेटीचा स्वप्नातही केला प्रत्येक क्षण साजरा।

तुझ्या आठवणींचा वारा अजूनही स्पर्शून जातो,
तो स्पर्श वाटतो जणू एखादा थंड निखारा।

‘मेघ’ अजूनही भिजतो त्या आठवांच्या क्षणांत चिंब,
अलवार पसरतो देहांत एक अनामिक शहारा।

गुरुवार, २६/३/२६ , ८:१५ PM
अजय सरदेसाई -मेघ

काय राखतो?

Submitted by Meghvalli on 25 March, 2026 - 11:06

विचारलंस आम्हाला—आम्ही आणखी काय राखतो,
ओठांवर शब्द आणि हातात लेखणी राखतो।

रक़ीबाचे दर्शन जेव्हा होते नकळत असे,
स्पंदनांच्या अंतरी मूक दुःखही राखतो।

तुझं प्रेमच कदाचित—माझा एखादा भ्रम असेल,
तरीही तुझा प्रत्येक घाव शिरोधार्य राखतो।

तुझ्या त्या आडमुठेपणाचा थांबत नाही सिलसिला,
जगण्यासाठी म्हणून थोडासा स्वतःचाच भ्रम राखतो।

हे प्रेमच वेडं आहे—मनास कधी न जुमाने,
तुझे प्रतिबिंब नेहमी डोळ्यांतच राखतो।

‘मेघ’ म्हणे—इतकं सोपं नाही मनाला ओळखणं,
या हृदयात दडवून अगणित गूढविश्वं राखतो।

शब्दखुणा: 

आतून उमटतात स्वर यमनाचे

Submitted by Meghvalli on 24 March, 2026 - 07:52

वीण आपली तुटत नाही मज तुझी आठवण येते,
त्या गडद जलद निळ्या वर्षेतून मज तुझी हाक येते।
कधी सगुण कधी निर्गुण रूप दिसते हृदयाते,
जिव वेडा पिसा होतो तुझ्या दर्शनाते।
इंद्रिये माझी अवघी गुणगुणती गीत कुणाचे,
आतून उमटतात माझ्या का स्वर यमनाचे।
धूसरल्या या वाटांवरी मी तुझाच शोध घेतो,
कळ्यांच्या मर्मबंधातून तूच उमलून येतो।
कधी शांत ध्यानातून तू रिसतोस अंतरात,
मीच हरवून जातो मग त्या निळ्या अनंतात।

मंगळवार, २४/३/२६ , ३:३५ PM
अजय सरदेसाई -मेघ

प्रतिभा (वाढीव भाग)

Submitted by मिरिंडा on 23 March, 2026 - 04:14

(काही वाचकांच्या आग्रहास्तव ही गोष्ट पुढे वाढवली आहे.कारण शुचिताचं पुढे काय झालं याबद्दल लिहीण्याचा आग्रह होता.त्यामूळे शेवटचा भाग वाढवून लिहीला आहे. आपल्या प्रतिक्रिया अवश्य द्याव्यात ही विनंती *****************************************************

प्रांत/गाव: 

माझी कविता

Submitted by Meghvalli on 22 March, 2026 - 04:33

श्वासाश्वासात एक कविता जगते माझ्या,
हृदयात ती कविता स्पंदते माझ्या…१

साधेच रूप तिचे, ती नव्हे लावण्यवती,
नीटनेटकी उतरते तरी ती शब्दांत माझ्या…२

नाही रंग तिला, ना आकार स्वतःचा,
भावनांचा अलंकार ती नेसून येते माझ्या…३

मौनातल्या गाभाऱ्यात ती अलवार उमलते,
परा–पश्यंती–मध्यमा, शेवटी वैखरी असा प्रवास करते…४

लेखणीतून ती शब्दांत उतरते तेव्हाच उमगते,
एरव्ही पराच्या सूक्ष्म जगात विहरते…५

निर्माता दिसलो जरी मी, निर्माण नाही करत,
ती स्वयंभू नि स्वयंप्रकाशी—आहे उपजत…६

अजून न उमजलेले

Submitted by Meghvalli on 22 March, 2026 - 02:51

काय करावे, का करावे, कुणा सांगावे
शांततेतल्या स्वरांना कसे ऐकून घ्यावे...

मनात उठल्या प्रश्नांच्या लहरी अनामिक,
उत्तरांच्या किनाऱ्याला कसे स्पर्श करावे...

दिवस ओलांडती तसेच, अर्थ न उमजता,
क्षणांच्या या प्रवाहाला काय नाव द्यावे...

शब्द येती ओठांवर, पुन्हा विरून जाती,
भावनांच्या दारांना कसे उघडे ठेवावे...

गर्दीतही एकटेपण हळूच येऊन बसते,
स्वतःलाच मग स्वतःशी अलवार भेटवावे...

शोधता शोधता थकलो, सापडले नाही काहीच,
जरा थांबून या शांततेला कसे जवळ घ्यावे...

शनिवार, २१/३/२६ , १०:३०. PM
अजय सरदेसाई -मेघ

ते क्षण

Submitted by Meghvalli on 21 March, 2026 - 11:00

विरघळून वाहणारे ते क्षण,
तुझे नि माझे होते ते क्षण।

ओसंडणाऱ्या गोड आठवांचे ते क्षण,
शोधून आता सापडत नाहीत ते क्षण।

चांदण्यांच्या रात्री, चंद्रकोरीचे ते क्षण,
मेघसरींनी चिंब भिजलेले ते क्षण।

तुझ्या डोळ्यांत माझ्या प्रतिबिंबाचे ते क्षण,
तुझ्या मनात माजलेल्या काहुराचे ते क्षण।

वाटले होते कधीच न संपणारे तेच क्षण,
पण गेलेच निसटून—क्षणभंगुर ते क्षण।

शनिवार, २१/३/२६ , ८:३० PM
अजय सरदेसाई -मेघ

राधेय

Submitted by Meghvalli on 16 March, 2026 - 01:38

कवच दिलेस मला शरीर सावरायला,
काय करू मी मनाचं — ते ही संवेदनशील आहे।

सुतपुत्र म्हणून हिणवते हे जग मला,
सांगू कसं त्यांना — मी सुतपुत्र नव्हे, सूर्यपुत्र आहे।

तो श्रीकृष्ण द्वारकेचा सांगण्यास मज आला,
“सोड सुयोधनास — तू ज्येष्ठ पांडुपुत्र आहे।”

मारू कसे ते तीर आता जे राखले अर्जुनासाठी?
माझेच हात हे, नि हृदयही माझेच आहे।

सांग मला तू आज — मी खरा कोण आहे?
ठरवले मी मनाशी — मी राधेय आहे।

सोमवार, १६/०३/२०२६ – १०:५५ AM
अजय सरदेसाई ‘मेघ’

तुझ्यावर खूप प्रेम आहे

Submitted by Meghvalli on 15 March, 2026 - 23:18

हो, माझे तुझ्यावर खूप प्रेम आहे,
तू दिलेल्या वेदनांचे मज खूप अप्रूप आहे।

वेचली नेहमीच फुले मी तुझ्यासाठी,
तू दिले जे काटे ते मी अजून जपून आहे।

क्लांत शांत समयी तू असतेस मनात,
तुझे ते कडवट बोल अजून कानावर आहे।

लोक म्हणतील कदाचित मी असा प्रेमवेडा,
चिरदाह वेदनेचा मज शाप हाच आहे!

जाऊ कुठे सोडून सावल्या आठवांच्या,
विसरू तरी घर त्यांचे माझ्याच मनात आहे।

सोमवार, १६/३/२०२६ — सकाळी ८:३१
अजय सरदेसाई — मेघ

आहे, का नाही..?

Submitted by Meghvalli on 15 March, 2026 - 14:35

तू स्वप्नांत येतेस माझ्या जशी,
मी तुझ्या स्वप्नांत येतो का?
गूढ स्मित तुझ्या ओठांवर उमटे,
अर्थ त्याचा कधी उमगेल का?

स्वप्नांत एरवी बोलतेस खूप,
प्रत्यक्षी मग इतकी रुष्ट का?
तिरक्या नजरेने पाहतेस मला,
तोही केवळ माझा भास का?

द्वेषच वाटला त्या पावसाचा,
तू स्वच्छंद भिजलीस का?
अगतिक उभा मी दूरून पाहतो,
इतकी त्याच्याशी तुझी सलगी का?

क्षणभर नजर माझ्यावर थांबे,
मग पुन्हा अचानक वळते का?
डोळ्यांत ओळख चमकून जाते,
ती होते पुन्हा अपरिचित का?

Pages

Subscribe to RSS - साहित्य