शशक

लेखन उपक्रम ३: उठा उठा सकाळ झाली - कविन

Submitted by कविन on 28 September, 2023 - 08:10

शाळेची सहल जाणार म्हणून तो खूप आनंदी होता. त्याने कधी नव्हे ते आदल्या रात्रीच सगळी तयारी करून ठेवली होती. परंतु सकाळी सूर्याचा पहिला किरण जमिनीवर पडताच... कर्णकर्कश आवाजात गजर वाजायला सुरुवात झाली.

"अरे दिनू अरे एss बाळा उठायचं नाही का तुला? आज सहल आहे ना!" आईने पांघरूण काढत विचारलं.

"पाच मिनिटं झोपूदे गं"

"पाच पाच करत पंधरा मिनिटं झाली. आता उठतोयस की पंखा बंद करु?"
यावरही त्याने फक्त "हुम्म्म!" म्हणत कुस तेव्हढी बदलली.

लेखन उपक्रम २ - झुळूक - मॅगी

Submitted by मॅगी on 27 September, 2023 - 03:38

बाकीचे अजून आले नव्हते, गाडी यायला तसा वेळच होता. तेवढ्यात त्याचे लक्ष तिच्याकडे गेले.

त्याच्या भांडखोर, बोलाचाल बंद शेजाऱ्यांची तन्वी. एकाच शाळेत ती दहावीत आणि तो पाचवीत.

दुपारी सहलीतली बाकी मुलं जेवायला गेल्यावर तो नदीकाठी सेल्फी काढत होता. अचानक पाय घसरून तो पाण्यात पडला. नाकातोंडात पाणी गेलंच होतं तेवढ्यात "ए बावळट ss" ओरडत कोणीतरी उडी मारुन त्याला बाहेर काढलं. डोळे उघडले तर समोर तन्वी! "आता सेल्फी काढायला गेलास ना, तर फोन फेकून देईन तुझा." रागाने म्हणून ती जेवायला निघून गेली.

विषय: 
शब्दखुणा: 

लेखन उपक्रम ३ - बालहट्ट - मामी

Submitted by मामी on 26 September, 2023 - 23:00

शाळेची सहल जाणार म्हणून तो खूप आनंदी होता. त्याने कधी नव्हे ते आदल्या रात्रीच सगळी तयारी करून ठेवली होती. परंतु सकाळी सूर्याचा पहिला किरण जमिनीवर पडताच...

त्याच्या डोळ्यांमधील चिपवर शाळेकडून आलेला 'सहल कॅन्सल'चा संदेश त्याला मिळाला. त्याची ही पहिली ओव्हरनाईट ट्रिप होती. ती पण दुसर्‍या एक्झोप्लॅनेटवर - डॅगोनवर - पण त्या ग्रहाच्या सौरमंडलात सौरवादळ होण्याची शक्यता ०.०००००००००००००००००००००१ ने वाढल्याने शाळेने सहल कॅन्सल केली होती.

रडूनरडून गोंधळ घातला त्यानं. आज'च' शाळेतून'च' सहलीला जायचयं'च'!

विषय: 

लेखन उपक्रम २ - आर यू रेडी? - मॅगी

Submitted by मॅगी on 26 September, 2023 - 07:21

बाकीचे अजून आले नव्हते, गाडी यायला तसा वेळच होता. तेवढ्यात त्याचे लक्ष तिच्याकडे गेले.

टीनेजर सावळी मुलगी, पिवळा स्वेटशर्ट, पाठीला काळ्या कार्टून म्हशीची कीचेन लावलेली सॅक. "आर यू रेडी टू गो?" तिने विचारले. "बसची वाट बघतोय." काही न सुचून तो म्हणाला. हल्ली स्ट्रेंजर डेंजर शिकवत नाहीत वाटतं. बसमध्ये त्याचं शेजारी लक्ष गेलं. तीच!

च्यायला! कार धड असती तर बसने यावं लागलं नसतं... "रेडी टू गो?" तिने सॅकमधली सुतळ गुंडाळत पुन्हा विचारलं.

विषय: 
शब्दखुणा: 

लेखन उपक्रम २ - सुटका - rmd

Submitted by rmd on 25 September, 2023 - 22:24

बाकीचे अजून आले नव्हते. गाडी यायला तसा वेळच होता तेवढ्यात त्याचं लक्ष तिच्याकडे गेलं...
तिचा चेहरा ओढलेला होता. गाल सुजलेला. शरीर खंगलेलं. हातात एक सूट्केस. खांदयाला पर्स.
पण तिच्या डोळ्यांत मात्र आनंद फुलून आलेला होता.
"आलीस?"
"हो. कायमचं सगळं सोडून आले. परत न जाण्यासाठी"
"आधीच का नाही आलीस परत?" त्याने आवंढा गिळला.
"सुरूवातीला तो असा असेल असं वाटलं नाही. हळुहळू त्याचा खरा चेहरा समोर आला.
आणि कुठल्या तोंडाने घरी येणार होते? तुमच्या मनाविरूद्ध पळून गेले होते ना! धीरच झाला नाही.
आता हेच माझं नशीब असं मान्य केलं होतं.

विषय: 
शब्दखुणा: 

लेखन उपक्रम २ - विल्हेवाट - मामी

Submitted by मामी on 25 September, 2023 - 10:45

बाकीचे अजून आले नव्हते. गाडी यायला तसा वेळच होता तेवढ्यात त्याचं लक्ष तिच्याकडे गेलं...

तिने नेहमीप्रमाणेच रेशमी फुलाफुलांचे वस्त्र परिधान केले होते. केशभूषणांनी तिचे केस सुरेखशा रचनेत मस्तकावर रचले होते. लाडिकपणे दांतात धरलेली गवताची काडी तिच्या ओठांवर मोहक दिसत होती! तिच्या हातात काळा मखमली बटवा शोभून दिसत होता - रोजच्याप्रमाणेच!

तो त्या अप्सरेकडे एकटक बघतच राहिला. आजची सकाळही कारणी लागली म्हणायची!

....................... टिंग टिंग!!!!

"भाऊ, टाका ती कचर्‍याची पिशवी गाडीत. रोज काय शेजारणीकडे टक लावून बघता! "

विषय: 

लेखन उपक्रम २ - गिफ्ट - मामी

Submitted by मामी on 25 September, 2023 - 08:12

बाकीचे अजून आले नव्हते. गाडी यायला तसा वेळच होता तेवढ्यात त्याचं लक्ष तिच्याकडे गेलं...

ती चिमुरडी झाडाखाली बसून रडतरडत कागदावर काहीतरी एकाग्रतेने लिहित होती. त्यानं हळूच तिच्या मागे जात त्या कागदावरचा मजकूर वाचला.

कागदावर जागा मिळेल तिथे केवळ एकच शब्द पुन्हापुन्हा लिहिला होता तिनं - 'आई'!

दीर्घ उसासा सोडून त्यानं पाठुंगळीची सॅक खाली काढली. दोन खेळणी बाहेर काढली आणि तिची तंद्री भंग होणार नाही अशा बेताने तिच्याजवळ ठेवली. पुन्हा सॅक खांद्यावर टाकून त्यानं स्वतःचे डोळे पुसले.

तिची खरी मागणी पूर्ण करण्याची ताकद त्याच्यामधे नव्हती.

विषय: 

लेखन उपक्रम २ - प्राप्ती - rmd

Submitted by rmd on 24 September, 2023 - 20:38

बाकीचे अजून आले नव्हते. गाडी यायला तसा वेळच होता तेवढ्यात त्याचं लक्ष तिच्याकडे गेलं...
ती त्याला अगदी चिकटून होती. थोडी उंच. रंगानं सावळी.
तो समाधानानं हसला. त्याने कौतुकाने स्वतःकडे एक नजर टाकली.
खूप प्रयत्नांनंतर त्याला ती प्राप्त झाली होती. वाट पाहाणं संपलं होतं.
अखेरीस त्याची तपश्चर्या फळली होती.
त्याला आठवत होती त्या अघोरी साधूकडे केलेली याचना, त्याने सांगितलेल्या सगळ्या विधींची पूर्तता... अगदी २१ कुमारिकांचे प्राण घेण्यापर्यंतचा टप्पा.

सोपा नव्हता निर्द्रव्य, तरल अस्तित्वापासून ते ही अशी सावली पडणार्‍या घन शरीरापर्यंतचा प्रवास!

विषय: 
शब्दखुणा: 

लेखन उपक्रम २ - चरणस्पर्श - आशिका

Submitted by आशिका on 24 September, 2023 - 04:41

बाकीचे अजून आले नव्हते. गाडी यायला तसा वेळच होता तेवढ्यात त्याचं लक्ष तिच्याकडे गेलं...

संमिश्र भावनांची सरमिसळ दिसत होती तिच्या चेहर्‍यावर. आनंद, उत्सुकता, धाकधुक, स्ट्रेस, अभिमान ... त्याला कल्पना होतीच. आतून तो बघत होता सगळं. बाकीचे आले, गाडीतून महत्वाची मंडळी आली. निरोपाचा क्षण जवळ येऊन ठेपला. विरहवेदना सहन करावीच लागणार जर पुढे 'सुखाचं चांदणं' अनुभवायचं असेल तर...निर्धार पक्का होता, 'उलटी गणना' सुरु झाली. तिचं रुप डोळ्यांत साठवत निघाला तो प्रवासाला. तिच्यासाठी कित्येक दिवस मैलोंमैल प्रवास करणार होता तो......

विषय: 

लेखन उपक्रम २ - किंमत - प्राचीन

Submitted by प्राचीन on 24 September, 2023 - 04:27

बाकीचे अजून आले नव्हते. गाडी यायला तसा वेळच होता. तेवढ्यात त्याचे लक्ष तिच्याकडे गेले....."
त्याची चिडचिड बघून तिनं विचारलं,
" काय झालं? "
" सगळ्याचाच वैताग आलाय. लोक किती विचित्र वागतात! कधी आपल्याला किंमत देणार, तर कधी आपण त्यांच्या दृष्टीने मातीमोल असणार. "
" त्यांचं आपल्याशिवाय फारसं अडलेलं नाही, याचं वैषम्य वाटतंय का?"
तिनं नेमकं वर्मावर बोट ठेवल्यानं तो आणखीनच लाल झाला.
" असंच असतंय बाबा.. आयुष्यात चढउतार यायचेच. कधी आपला
भाव वधारला, तर उतूमातू नये नि कवडीमोल ठरलो तरी त्रासू नये.

Pages

Subscribe to RSS - शशक