निशाणी
निशाणी
तुकडे करण्या आले तेव्हा पाणी झालो
गाडले तरी मी रत्नांच्या खाणी झालो
ती गळचेपी चालू होती स्वातंत्र्याची
मी पंचाहत्तरची आणीबाणी झालो
मीच महाराष्ट्राच्या कंठी कंठी वसतो
गोंड वऱ्हाडी मालवणी अहिराणी झालो
कर्मकांड करुनी धर्माचा श्वास कोंडला
खरा धर्म वदण्या संतांची वाणी झालो
संकटात शिकलेल्यांच्या हाती कॅमेरा
मदत तयांची करुनी आज अडाणी झालो
परंपरा अन् इतिहासाला जपण्यासाठी
सनवाराची , जात्यावरची गाणी झालो
अवघा भारत शिवरायांचा झाला जेव्हा
अटकेवरची भगवी एक निशाणी झालो