सहवासे जुळती धागे

Submitted by SharmilaR on 29 September, 2024 - 02:21

सहवासे जुळती धागे

‘ह्या घरात एक तर ती तरी राहील, किंवा मी तरी..’ हे ओठावरचं वाक्य मी पोटात ढकललं. कारण अगदी कोरस मधे ‘तीssssss..’ हे उत्तर यायचीच शक्यता जास्त होती.

माझी आधीच ‘मानसिक तयारी’ करण्या करता कमूने काही दिवसांकरिता, म्हणजे खरं तर माझा मुक्काम तिथे अमेरिकेतल्या त्यांच्या घरी असेपर्यंत, ‘ती’ ला घरी आणण्याची शक्यता वर्तवली होती. शक्यता एवढ्याकरता की, अजून तर तिला घरी आणण्याच्या प्रोसेस मधल्या बऱ्याच स्टेप्स बाकी होत्या म्हणे. आत्ता तर फक्त ती ‘उपलब्ध’ होणार असल्याचं कळलं होतं. मला थोडं आधीच ‘वॉर्न’ करण्याची जबाबदारी सून असल्यामुळे कमूने पार पाडली होती. अजूच्या एकट्याच्या हातात असतं तर बहुदा तो सरळ घेऊनच आला असता.

माझं प्राण्यांबद्दलचं (अ)प्रेम (प्रेमाच्या विरुद्ध.., अगदी द्वेष नाही.. पण दूसरा हव्वा तसा शब्द काही सापडला नाही) घरीदारी जगप्रसिद्ध होतं. प्राण्यांबद्दल मला अगदी राग वगैरे नाही, पण ‘त्यांनी त्यांच्या जगात राहावं, आणि आपण आपल्या!’, ह्या मताची मी आहे. म्हणजे त्यांनी ‘आपल्या’ उंबरठ्याच्या बाहेर मुकाट असावं, आणि आपण घराबाहेर पडल्यावर पण त्यांनी आपल्यावर उगाच ‘तोंडसुख’ घेऊ नये, असं मला वाटतं. त्या बदल्यात मी पण उगाच त्यांच्यावर दगड, काठी असं काही उगारत नाही.

पण माझ्या मताला इथे विचारतोय कोण..? माझ्या घरात मी कधी कुठल्याही प्राणिमात्राला प्रवेश दिला नाही, पण हे घर तर अजू-कमूचं होतं. मी आपली इथे काही महिन्यांची पाहुणी होते! तेव्हा पाहुण्याने आपल्या अंथरूणाचा अंदाज घेतलेला बरा! मी गुमान राहीले!

अजू-कमू ने काही दिवसांकरिता एका मांजरीला ‘सांभाळायचं’ ठरवलं होतं. खरं तर त्यांना माऊ कायमचीच घरी आणायची होती, पण ती जबाबदारी पूर्णपणे पेलेल की नाही, ते बघण्याकरिता आधी काही दिवसांसाठी ते तिला पाहुणी म्हणून सांभाळून बघणार होते.

‘मंचकींन’ ची ‘आई’ काही दिवसांसाठी परदेशी जाणार होती, म्हणून मग तिला सांभाळायला कुणी तरी हवंच होतं. ज्यांच्याकडे ती जाणार, त्या ‘तात्पुरत्या’ पालकांचा आधी ऑडिओ इंटरव्ह्यु, मग विडियो कॉल करून त्यांचं घर नीट बघणं.., अश्या सगळ्या स्टेप्स अजून बाकी होत्या म्हणे!
तुकाराम महाराजांना स्मरून मी ‘उगा’ होते. चेहऱ्यावरची नापसंती मात्र फारशी लपत नसावी. विडियो कॉल मधून ‘मंचकींन’ च्या ‘आई’ ला आमचं घर दाखवतांना कमूने मी बसलेली खुर्ची शिताफीने टाळलेली माझ्या चाणाक्ष नजरेतून सुटली नव्हती.

शेवटी एकदाच्या त्या सर्व ‘स्टेप्स’ पूर्ण होऊन मंचकींन घरी येण्याचा दिवस उजाडला. अजू-कमू दोघेही त्या दिवशी सकाळचं वर्क फ्रॉम होम भराभर आटपून तिला आणायला गेले. त्यांचा एवढा उत्साहं मी फक्त नवीन गाडी घरी आणतांना बघितला होता.

‘ती आली.. तिला पहिलं.. तिने जिंकलं..’ असं काही मंचकींनबद्दल अजिबातच झालं नाही. उलटपक्षी ‘फर्स्ट इम्प्रेशन’ मध्ये मला ती नाहीच आवडली. पण हे माझं फीलिंग म्यूचुअल होतं. मला ते ‘फेंदारलेल्या मिशीचं बोजड प्रकरण’ वाटलं, तर तिला इथलं काहीच आवडलेलं नव्हतं. तिला मुळात तिचं घर सोडून कुठे जायचचं नव्हतं.

मग आल्या आल्या मंचकींनने घाबरतच स्वत:ला लपायला एकांतातल्या अंधाऱ्या जागा शोधल्या, अन् जिन्या खालच्या अंधारात जाऊन ती लपून बसली. ‘तिच्या आईला सोडून आल्यामुळे तिला खूप वाईट वाटतंय.. ती खूप घाबरलीय. तिला अॅडजस्ट व्हायला वेळ हवाय... सध्या तिच्याकडे पूर्ण दुर्लक्ष करायचं.’ असं मुलांनी सांगितल्यामुळे आम्हीही जाणीवपूर्वक तिच्याकडे दुर्लक्ष केलं. नाही तरी मला कुठे तिच्याकडे लक्ष द्यायला आवडणार होतं..? माझ्यावर उगाच उडी-बिडी मारू नको म्हणजे झालं!

मुलांनी मंचकींनचं खाणं, पाणी, लिटरबॉक्स, खेळणी.. असं सगळं हॉल मध्ये वेगवेगळ्या कोपऱ्यात मांडून ठेवलं, आणि ती दोघं ‘वर्क फ्रॉम ऑफिस’ करायला गेली. मंचकींनने मधेच केव्हा तरी आपल्याकडे कुणाचं लक्ष नाहीय असं बघून (वाटून) स्वत:च्या सगळ्या सोई घाबरत घाबरतच बघून घेतल्या. ह्यालाच ‘मांजरीचं डोळे मिटून दूध पिणं म्हणत असावे!’

त्या दिवशी तर मग तिने काही खाल्लं प्यायलं नाहीच. दुसऱ्या दिवशी मुलं उठून त्यांच्या त्यांच्या कामाला गेली. घरात एकदम शांती होती, पण मंचकींन काही तिची जागा सोडून बाहेर येत नव्हती. तिला इथे येऊन चोवीस तास उलटायला आले, तशी मलाच तिची काळजी वाटायला लागली.

प्राण्यांवर माझं प्रेम नसलं, तरीही घरात एक चार पाय, रुसून रागावून उपाशी अंधाऱ्या कोपऱ्यात बसलेत हे बघून कससंच वाटायला लागलं.

मंचकींनच्या खेळण्यांमधलं एक खेळणं म्हणजे, निळी सॅटींनची रिबन तिला खूप आवडत होती म्हणे. मग मी नवऱ्याच्या मदतीने ती रिबन दाखवत.. झुलवत.. जरा चुचकारत (लांबूनच) तिला तिच्या खाण्या पर्यंत आणलं. खाल्लं बाबा तिने एकदाचं थोडंसं! पाणीही प्यायली, परत लपून बसायच्या आधी! माझा जीव भांड्यात पडला.

एक-दोन दिवसात हळूहळू घरात रुळायला लागली मंचकींन..! म्हणजे किमान तिचं घाबरणं कमी झालं. लागलीच तहान, तर सगळ्यांसमोर पाणी पिण्यापर्यंत तिची मजल गेली. अधून मधून बाल्कनीच्या काचेवरच्या माश्या पकडायला लागली. मुलं तर त्यांच्या ऑफिस व्यतिरिक्तचा अख्खा वेळ मंचकींनसमोर तिची खेळणी, त्यातल्या त्यात ती बारीक निळी रिबन नाचवण्यात घालवू लागले. पण तिचा शिष्ठपणा काही जात नव्हता. फार फार तर, मुलांवर उपकार केल्यासारखे त्यांच ‘वर्क फ्रॉम होम’ असलं तर, अंधारी जागा सोडून त्यांच्या जवळपास टेबल खाली बसायला लागली, पण मुक्यानेच!

आमच्या घरात सकाळी उठून दिवस चालू करणारी पहिली मी असते. नेमकी तीच वेळ मंचकींनच्या भुकेची असायची. इतर कुणाला म्हणजे, तिच्याशी खेळणाऱ्या मंडळींना झोपेतून उठवणं तर तिच्या स्वभावा विरुद्ध होतं. मग नाईलाजाने तिला तिचं मौनव्रत सोडून, जागी असलेल्या माझ्याशी संवाद करायला लागायचा. ते ‘म्याव.. म्याव..’ पण इतकं हळू.. की जेमतेमच ऐकू येईल असं! त्या सकाळच्या तेवढ्या वेळेपूरतं आम्ही दोघींनी एकमेकींच अस्तित्व मान्य करून टाकलं. मीही मग तिला तिचं खाणं द्यायला लागले. तेवढं झालं की मी माझ्या कामाला, अन् ती तिच्या तपश्च्ऱ्येला!

एकदा मात्र गंमतच झाली. रात्री सगळे घरात असतांना पण मंचकींन माझ्या मागे मागे फिरायला लागली. एकदम कमूच्या लक्षात आलं, मी गारठ्यामुळे अंगावर शाल घेतली होती, तर मंचकींनची नजर त्या शालीतून खाली लोंबत असलेल्या बाssssरीक लांब धाग्यावर होती. मी तो धागा काढून कमूच्या हातात दिला. कसल्या खुश झाल्या दोघीही! आल्यापासून पहिल्यांदाच मंचकींनला एवढं उड्या मारतांना पहिलं आम्ही सगळ्यांनी. त्या दिवसापासून ती शाल बाहेरच खुर्चीवर ठेवायला लागले मी. ज्या कुणाला खेळावसं वाटलं तिच्याशी, त्यांनी काढा नवा धागा, अन् करा सुरू तो नाचवणं!

एकदा आम्ही घरातले सगळेचजण चार दिवस बाहेरगावी जाणार होतो. ते चार दिवस मंचकींनला कोण कसं सांभाळणार, हा प्रश्नच होता. काही दिवस तिला शेल्टर मध्ये ठेवण्याचा पर्याय कमूला मान्य नव्हता. ‘आत्ता आत्ता जरा ह्या घरात माणसाळलीय तर मग परत बदल नको तिला.’

मग जरा शोधाशोध केल्यावर रोज घरी येऊन तिचं खाणं पिणं सांभाळेल, आणि तासभर तिला सोबत करेल असा एक केअरटेकर मिळाला. तासाला पंचवीस डॉलर असा त्याचा रेट ऐकल्यावर माझा वासलेला ‘आ’ कितीतरी वेळ तसाच होता. तासाभरा करता एवढे पैसे!!! एवढे पैसे मिळवायला मला भारतात किती दिवस पूर्णवेळचं (तासभराचं नव्हे!) काम करायला लागतं बर..? मी हिशेब सुरू केला. पुढे कधीतरी इथे कायमचं रहायला आलेच तर, हाच उद्योग करायचा असं मनाशी पक्क ठरवून टाकलं. प्राणीप्रेम नसलं म्हणून काय झालं! बाकी अमेरिकेत मांजरप्राणी म्हणून जन्माला यायला, आणि मनुष्यप्राण्याकडून लाड करून घ्यायला फारच मोठं पूर्वसंचित लागत असावं!

माणूस नसल्यावर त्याची किंमत कळते! इथे तर आम्ही घरातली चारही माणसं चार दिवसांकरिता गायब झालो होतो. आम्ही परतल्यावर आत्ता आत्ता पर्यंत घरातल्या सर्वांकडे संपूर्ण दुर्लक्ष (अती शिष्ठपणा!) करणारी मंचकींन आता मात्र दाराचा आवाज झाल्या बरोब्बर, कोण बाहेर चाललंय.. अन् घरात कोण कोण आहे ह्याची खात्री करून घ्यायला लागली. चहा कॉफीचा कप हातात घेऊन कुणी बाल्कनीत बसलं, तर तीही तिथे जाऊन बसायला लागली. कुणी तिला गोंजारलं तर तेही आवडून घ्यायला लागली.

मी मात्र अजूनही मंचकींनला चार हात लांबच ठेवत होते. पण जास्तीत जास्त वेळ घरात माझाच वावर असायचा. मग बाल्कनीचं दार उघडून हवं असलं.., नाहीतर उगाच एखाद्या कपाटात डोकावायचं असलं.. (आता तिची उत्सुकता तितपत जागृत झाली होती) तर बारीक आवाजात माझ्याकडे बघत तिचं ‘म्याव .. म्याव..’ चालायचं. मग मलाही तिला हवं असेल ते करत तिच्याशी बोलायलाच लागायचं. एकदा तर संध्याकाळी घरात ती आणि मी अशा दोघीच होतो. ती सतत खुर्चीवरच्या शालीजवळ जाऊन पंजे मारत होती. तर शेवटी मीच चक्क त्यातला धागा काढला अन् तिच्यासमोर नाचवायला लागले.

आमच्या परतीचा दिवस आला. नंतर काही दिवसांनी मंचकींन पण तिच्या घरी परत जाणार होती. अजू-कमूला खूपच वाईट वाटत होतं (मंचकींन परत जाणार म्हणून!). मलाही वाईट वाटत होतं (मुलांपासून लांब जायचं म्हणून!). मी माझी शाल तिथेच ठेवली.

मंचकींन गेल्यावर काही दिवसांनी अजू-कमूने ‘चिकू’ला घरी आणलं. आता ही चिकू मात्र थोड्या दिवसांची पाहुणी नाहीय, तर त्यांची स्वत:ची आहे. चिकू मंचकींनपेक्षा अगदी विरुद्ध स्वभावाची आहे. तिने आल्यापासूनच घरावर आपला मालकी हक्क प्रस्थापित केलाय. तिच्या सकाळच्या भुकेच्या वेळी, झोपेत असलेल्याला ती जागं करणार! तिचा मूड असेल तेव्हा (आणि तिच्या जागेपणी तो असतोच असतो म्हणे!) जो समोर असेल त्याला तिच्याशी खेळायला लावणार. प्रत्येक गोष्टीत तिला नाक खूपसायचं असतं. आम्ही विडियो कॉलवर अजू-कमूशी बोलतो तेव्हा ती टुणकन उडी मारून त्यांच्या मांडीवर बसते आणि कॅमेऱ्यात बघून तिचं हॅलो (म्याव.. म्याव..) करते.
खेळून खेळवून दमली की मात्र खुर्चीवरच्या शालीजवळ चिकू आरामात पहुडलेली असते.

****************

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त…

मांजरे माणसांवर भुल टाकतात. मग माझ्यासारखी पक्की मांजरद्वेष्टी मंडळीही त्यांच्यासमोर नांगी टाकतात बरे!!! सध्या घरात २ मांजरी आणि त्यांना भेटायला येणार्‍या चार मांजरी इतका मांजरवडा (पोरवडा च्या चालीवर) घरात आहे…

छान लिहिले आहे. उगाच अतिभावनिक टच दिला नाही हे आवडले. त्यामुळे रीलेट झाले.
मी सुद्धा प्राण्यांबाबत असाच आहे.आपापल्या जगात खुश राहा.
पण मुलांना मांजरांची फार आवड आहे. त्यामुळे मांजरे अजून घरात आली नसली तरी बाहेर त्यांना मुलांचे मित्र म्हणून स्वीकारले आहे

खूप छान.
आधी लेखाचे नाव वाचून टाळणार होते पण लेखिकेचे नाव वाचून पटकन लेख पण वाचून काढला.

<<मांजरे माणसांवर भुल टाकतात. मग माझ्यासारखी पक्की मांजरद्वेष्टी मंडळीही त्यांच्यासमोर नांगी टाकतात बरे!!! >>
माझा नवरा माबोवर असता तर त्याने +1000000 केले असते या वाक्याला Happy

छान लिहिलं आहे.
नर्मविनोदी आणि उगा भावना न ठिबकणारे! Happy

धन्यवाद साधना, ममो, ऋन्मेष, धनवन्ति, अमितव.

@साधना,
घरात २ मांजरी आणि त्यांना भेटायला येणार्‍या चार मांजरी>> बराच मोठा
मांजरवडा आहे. हा. हा...

@ ऋन्मेष,
मांजरे अजून घरात आली नसली तरी बाहेर त्यांना मुलांचे मित्र म्हणून स्वीकारले आहे>>
>> पुढे मागे त्या घरातही येतीलच.

@ धनवन्ति,
लेखिकेचे नाव वाचून पटकन लेख पण वाचून काढला>>
>> ही फारच मोठी complement झाली.

माझ्या एका चुलत बहिणीने (घरात ती व तिचा सख्खा, म्हणजे माझा चुलत भाऊ, दोघेच असत तेव्हा! काका, काकू जाऊन बरीच वर्षे झालेली होती) घरात मांजरे पाळली होती.

ही बातमी नाही. बातमी पुढे आहे, खरे तर दोन बातम्या आहेत.

तिने सतरा मांजरे एकावेळी पाळली होती, सतरा! पाच खोल्यांचे घर होते. घरी काही कार्यक्रमानिमित्त कोणी येणार असले तर सर्वात मागच्या खोलीत ती सतरा मांजरे आपापसात मंगळागौर, रुमालपाणी, आंधळी कोशिंबीर असे खेळ खेळत.

उगीच मध्येच कोणीतरी येणार असले तर ती मांजरे मायबोलीवरील ड्यु आय डिं प्रमाणे घरभर मुक्त व भयावह संचार करत. (आमच्याकडे, 'उगीच व मध्येच कोणीतरी येणे / जाणे हे येथील सर्वांप्रमाणेच प्रॉपर फोन करून, वेळ ठरवून वगैरेच होते. मात्र, जेव्हा पूर्वनियोजित कार्यक्रम असे तेव्हा कार्यक्रमानिमित्त येणाऱ्यांची संख्या खूप अधिक असल्याने त्यावेळी मांजरे पाक व्याप्त काश्मीर मध्ये नांदवली जात).

तर मध्येच कधीतरी या मांजरांना कुत्र्याचे खाद्य देण्यास सुरुवात करण्यात आल्याची बातमी मिळाली. नंतर सहज काही कारणाने त्यांच्या घरी गेलेलो असताना फार नयनमनोहर दृश्य दिसले. सर्व मांजरे अर्धवट अवाढव्य झालेली होती व डोक्यावर पन्नास किलोचे वजन असल्याप्रमाणे हलत डुलत चालत होती. स्वतःच्या प्रजातीचा विसर पडावा या स्तरावर त्यांना चुकून नेण्यात आले होते. ती मांजरे भयावह दिसत असली तरी ती स्वतःलाच आणि एकमेकांनाच घाबरत होती.

नंतर एक दीड वर्षांनी हळूहळू एकेका मांजराने इहलोकातून अदृश्य होण्याची किमया साध्य केली.

वरचा (म्हणजे मूळ धाग्याचा) लेख मांजरांबाबत संवेदनशीलपणे लिहिलेला आहे व हे दुर्मीळ आहे

तिने सतरा मांजरे एकावेळी पाळली होती.>> बापरे!!!

लेख मांजरांबाबत संवेदनशीलपणे लिहिलेला आहे व हे दुर्मीळ आहे>>> धन्यवाद बेफिकीर.

छान कथा ..!

प्राण्यांबद्दल मला अगदी राग वगैरे नाही, पण ‘त्यांनी त्यांच्या जगात राहावं, आणि आपण आपल्या!’, ह्या मताची मी आहे>>> मी सुद्धा ह्या मताची आहे ..

छान लिहिले आहे

मांजरी पाळायचा सर्वात मोठा फायदा म्हणजे त्यांची स्वच्छता ते स्वतःच करतात . कुत्र्यासारखे त्यांच्यावर फार मेहनत घ्यावी लागत नाही

गोंडस लिहिलंय! मांजरींचं जगच वेगळं! बावळ्ळ्ट्ट क्यूट असतात अगदी.

सतरा मांजरी! बापरे बाप... असाच एक लेख वाचला होता लोकसत्ताच्या सोयरे सहचर सदरात बहुतेक सई परांजपेंचा. त्याचीच आठवण झाली.

नवीन प्रतिसाद लिहा