हे गगना तू मजला ताऱ्यांचे दान दे
हे गगना तू मजला ताऱ्यांचे दान दे
तुजपर्यंत पोहोचण्यास पुष्पक विमान दे
घेऊन जा उंच नभी, अंबरात राहू दे
गगनातुनी सुंदर ती वसुंधरा मज पाहू दे
हे धरती तू मजला हरितसृष्टी दान दे
मुक्तपणे विहारण्यास घनदाट रान दे
काम क्रोध मत्सराने व्यापली धरा ऊभी
प्रेम क्षमा शांती फुलवण्या देहात त्राण दे
हे वरुणा तू मजला चैतन्य वरदान दे
झुळझुळ ती ऐकण्या अंतरी दोन कान दे
जीवन तू सृष्टीचे , फुलवतोस धरा सारी
कोपू नको कधी पुन्हा, संयमाचे वाण घे
हे समीरा तू मजला निर्भयता दान दे
कणाकणात पोहोचण्यास वाहण्याचा मान दे
