माझ्या अंगणातले चाफ्याचे झाड

Submitted by मंगलाताई on 15 May, 2020 - 12:01

माझ्या अंगणातले चाफ्याचे झाड खूप काहीतरी सांगायचा प्रयत्न करते आहे. काय सांगायचं आहे ते लक्षात येत नाही पण त्याच्याशी गुजगोष्टी केल्या तर कळतं हळूहळू.
हिरव्याकंच पानांचा रंग अन् त्या वरच्या स्पष्ट दिसणाऱ्या शिरा एक सारख्या . अगदी भूमितीय आकार घेऊन लगडलेली सळसळणारी पान .सळसळ आवाज करीत वार्‍याच्या झोताने वर-खाली मागे-पुढे होतात. आणि वेगळीच चमक दिसते या पानांवर लवलव कांती आलीये चाफ्याला आता. थोडं वेडंवाकडं खरबरीत वाढलेलं, झुकलेलं खोड बघून कुणालाही अंदाज येणार नाही की या खोडा वरच ही सुंदर चाफ्याची दारोमदार उभी आहे. घनदाट हिरवाकंच पानांचा डोलारा बघितला की बघतच राहावं असं वाटतं. मन भरतच नाही , नजर हटतच नाही. हिरव्या गुलदस्त्यात शुभ्र पांढरे फुलं मध्येच मान वर करून एकमेकांकडे बघताना दिसतात. शुभ्रतेचे वरदान आहे चाफ्याला .फुल एवढं टपोर की कुठूनही चटकन दिसावे ,कळी एवढी सुंदर की उमलन्यापूर्वीच तिचा तजेला नजरेत भरण्यासारखा असतो ,अगदी हिरव्या देठांच्या बारिक कळ्या म्हणजे मोत्यांची माळ जणू
भर उन्हाळ्यात बहरून येणाऱ्या फुल झाडात चाफा अव्वल क्रमांकावर आहे. गुलमोहराचे सौंदर्य दुरूनच दिसते ते त्याच्या लालचुटुक रंगावरून आणि गर्द सावली वरून.पण चाफ्याचा हसरे पणा , अवखळपणा गुलमोहराच्या गंभीरपणा पुढे सरसच आहे. वेडेवाकडे आकार घेत विविध वळणं घेत चाफा वाढतो, पण त्याच्या नैसर्गिक आकारात एक रानटी सौंदर्य भरलेले आहे . त्याला नाटकियता मुळीच आवडत नाही. जसे असेल तसे सच्चे स्वरूप .आत एक बाहेर एक नाही जमत चाफ्याला. बाजारातून दाम खर्च करून आणलेल्या पुष्पगुच्छांना गुपचुप बसवतो चाफ्याचा गुच्छ .देशी फुलांच्या घडणीत तर सौंदर्याचा मानकरी आहे चाफा.
चाफा फुलांचा राजा नाही पण पारिजात, गुलमोहर, बूच,बहावा,पळस,काटेसावर अशा देशी फुलझाडांमध्ये आपुलकीचा आहे चाफा. नित्य परिचयातला. जीवलग.
उन्हाळ्यात हळूच एक एक काडी गोळा करून पक्षी घरटे बांधायला सुरुवात करतो चाफ्यावर त्याला फार बरं वाटतं. पक्षी येतो फांदीवर बसतो, हळूच पक्षीन येते चोचीत काडी धरून दोघांच्या चर्चा होतात आणि हळूच एखाद्या बुंध्याच्या खोबनीत काडीवर काडी रचून पक्षाची माडी तयार होते. अभिमानानं ऊर भरून येतो चाफ्याचा पण मंद हसून तो सुख पोटात साठवून ठेवतो. अधिरपणाने उन्माद करणे माहिती नाही त्याला. दिसामासाने पक्ष्यांची ये-जा वाढते ,किलबिल वाढते, अंडी घालायची गडबड घाई सुरू होते ,अंडी उबवण्याची काळजी सुरू होते . चाफा गुमान बघतो बोलत काहीच नाही आणि एक दिवस अंड्यातून पिवळी चिमुकली चोच बाहेर येते. पक्षीन आनंदाने चारदा फांदीवर बसते ,गिरकी घेते ,किलबिलाट करते , उगाच पंख फडफडवते. नर पक्षी मात्र थोडा गंभीर असतो जास्त काही बोलत नाही तो .बाप असतो ना तो बापाला हळवं होऊन चालत नाही ,चाफ्याला आता सुचत नाही काय करावं ते उगाचच तो मान उंच करून डोकावतो घरट्यात ,पक्षीन आपले पंख झाकून ठेवते .अन् हा बहारदार संसार चाफा डोळ्यात साठवून ठेवतो.
पौर्णिमेच्या रात्री चाफ्याच्या सौंदर्यात भरच पडते .हिरव्या पानांवर चंद्र प्रकाशाची किरणे परावर्तित होऊन एक नवीनच लकाकी येते आणि शुभ्रतेत न्हाऊन निघतात फुलं. अमावस्येला चाफ्याचे सौंदर्य मात्र अधिक खुलते गर्द काळाच्या रंगाचा एक तंबू आणि त्यावर लटकलेले फुलांचे झुंबर असा दिसतो चाफ्याचा डोलारा .चाफ्याला जसे बघावे तसा तो दिसतो ,निरखून पाहिले तर अंतरंगातल्या गुजगोष्टी सांगत जातो .उन्हाचं त्याला वावडं नाही, पण जोराचा वादळी पाऊस, गारांचा मारा नाही आवडत त्याला , रडवेला होतो तो. मंद पावसाच्या सरीने तृप्त होतो, न्हाऊन निघतो आनंदानं ,हळूच स्मित करत ओठाच्या कोपऱ्यातून घरच्या गृहिणीला देवपूजेला हवेत म्हणून चारदोन फुलं हळूच सोडतो तो अंगणात . पण ओरबडून फुलं घेतलेले त्याला आवडत नाही.
त्याला सगळं माहित आहे घरातलं आणि घरातल्यांच्या मनातल . फाटकातून आत येणार्‍या पाहुण्यांना तो ओळखतो आणि मनातल्या मनात हसतो. अंगणात मुलांना खेळताना पाहिलं त्यांने आणि आता मुलं मोठी झाली हेही लक्षात आहे त्याच्या .मुलांना चाफ्याच्या अन् चाफ्याला मुलांच्या स्मृती आहेत. चाफा कधी उदास होतो तर कधी खुप हसतो आनंदी होतो .त्याला घरातल्यांची हसरे चेहरे उदास चेहरे कळतात बरकां .मुलांची लग्न सण यात चाफा आनंदाने सहभागी झाला . गणेशोत्सवात भरपूर फुलं दिली त्याने गणपतीच्या हारा करीता. होळीला त्याला नवीन बहार आल्यामुळे मात्र त्याची कोवळी पानं बघून समाधान झाले. देव्हार्‍यात वाहिलेलं फूल अगदी संध्याकाळपर्यंत ताजे राहते आणि त्या देणाऱ्या कडे पाहून जी प्रसन्नता येते त्याला मोल नाही.

सौंदर्याचे बहारदार स्वरूप आहे चाफा एकसारखी पाने, जणूकाही कारखान्यात वळवून, रंग देऊन कापून आणली की काय असे वाटते .अन् फुलं टपोरी ,पांढरी ,टवटवीत मनमोहक. विशेषणांचा राजा आहे चाफा . निसर्गाच्या कुशीत किती विविधता आहे त्याचा एक बिंदू आहे चाफा. विश्वाच्या पसार्‍यात वैविध्य सृष्टीत एका कोपऱ्यात उभा आहे चाफा.शेवटी या सौंदर्याच्या दर्शनाने मनाला हेच कळते की सृष्टी कर्त्याचे अनंत हात पृथ्वी रचनेत गुंतलेले आहेत .त्या हातांपुढे नतमस्तक व्हावे आणि पुन्हा चाफ्याशी आपल्या गप्पा सुरू कराव्यात.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

खूप सुंदर! माझं आवडतं फूल. सकाळी फिरून येताना फुले गोळा करून आणायची काचेच्या वाटीत पाण्यात घालून ठेवली की दिवसभर मंद सुगंध दरवळत राहतो घरभर! थंडीच्या दिवसात बुचाची फूलं!