आईचे पत्र

Submitted by मंगलाताई on 19 May, 2020 - 09:41

एक आई व्रुद्धाश्रमातून स्वतःच्या मुलाला पत्र पाठवते. फोनला उत्तर देते.
चिरंजीव,..............
कसा आहेस. कालपरवा तुझा फोन आला होता आश्रमात. मला ऑफिसमधली क्लार्क सांगत होती . आमची केअरटेकर आली होती मला बोलवायला ,पण काठी शोधून चष्मा काढून खोलीबाहेर पडेस्तोवर तू फोन ठेवलास. मला फक्त तुझा निरोप मिळाला.
तुला आता माझी काळजी वाटते असे तू म्हणालास क्लार्क जवळ. कसली काळजी ? काळजीसारखं काय आहे ? या आश्रमात आम्ही राहतो म्हणजे इथे जुळवून घेतो काही दिवसांच्या सवयीने . हो घरून आल्या-आल्या बरेच दिवस तुमची आठवण व्याकुळ करते मनाला मनाला , सुरूवातीला असं वाटतं की माझं दुःख हेच जगातील सर्वश्रेष्ठ दुःख आहे पण हळूहळू कळतं की माझ्यासारखे कितीतरी आई-वडील कितीतरी आई-वडील आई-वडील नको असतात मुलांना . नको तर नको त्यात काय एवढं आई-वडील नको हा एक विचार आहे 'मूल नकोय 'सारखा.
'मला मूल नकोय ' हा विचार आधी आला तर मला 'आई वडील नकोय ' हा आलाच नसता . म्हणून मूल आधी-नंतर आई वडील . मुलं आधी म्हणजे मुलाला प्राधान्य आलेच. मग ज्याला प्राधान्य आहे त्याचे ऐकायला नको का आपण? संस्कार कमी पडलेत ,नशीब फुटके निघाले, देवाजवळ न्याय नाही असा कांगावा निरर्थक आहे. उलट एका विचाराची वृद्ध मंडळी एकत्र राहू शकतात हे ही बरेच ही बरेच आहे.
तू मला वृद्धाश्रमात ठेवले पण मलाही माहित आहे रात्री तुला झोप लागत नाही. मध्येच जाग येते ,मन अस्वस्थ होते, पण नाही व्यक्त होता येत कुणाजवळ . तू काही हौस म्हणून ठेवले नाहीस ना मला ? तुला तुझ्या मुलाला मोठे करायचे आहे खूप मोठे. मी तुला जसे मोठे केले ना तसे. मग त्यात चुकीचे काय आहे. तुझे ही आता वय वाढत आहे , पन्नाशिचा झालास तू . तुलाही थकवा येतोय, पण मुलाला मोठं करताना थकून चालत नाही अजिबात . मूल मोठं झालं की थकावे खुशाल . तुझा मुलगा माझा नातू मोठा होत असताना त्याच्या पासून अलिप्त राहायला शिक ,भावनिक नात्यात गुंतू नकोस . मला याचा अनुभव आहे म्हणून मी देते तुला सल्ला.
तुला आता ही भीती वाटते की आता कोरोनाव्हायरस 60 च्या वरच्या लोकांना लवकर होऊ शकतो .आईचे कसे ? तसे काळजीचे काहीच नाही कारण येथे सगळे साठच्या वरचेच आहेत आणि जगापासून दूर क्वारंटाईन आहे . आम्हाला क्वारंटाईन होऊन बरीच वर्षे झाली आता. या क्वारंटाईन ची आम्हाला फार सवय झाली.
हो पण तू आता घरात आहेस, बंद घरात. तुला त्रास होतोय का ? अरे सवय करुन घे. एखाद्या नवीन गोष्टीची सवय करून घेतली की नाही होत त्रास . नंतर नंतर असं वाटू लागतं हेच योग्य आहे .किती समस्या आहेत रे तुमच्या पिढीला ? आमचं बरं होतं बाबा लग्न करा, मुलांना जन्म द्या, मोठ्ठ करा संपलं . आणि मुलांना मोठं करताना त्याने आपल्या सारखे व्हावं असं आम्हाला वाटत असे. त्यामुळे फार काही समस्या नव्हत्या आमच्या. पण तुमच्या मोठेपणाच्या संकल्पना वेगळ्या, त्यामुळे वाटतं तेवढं सोपं नाही ते . खरंच कसं सांभाळतो हे सगळं . कधी एकटेपणा वाटला तर करत जा मला फोन . माझ्याजवळ बोलत जा मन मोकळं करत जा. जगात आईशिवाय कुणाजवळ मोकळं होता येत नाही, पण याला मित्र अपवाद आहेत म्हणून सांगते खूप मित्र जोड. ठेव मैत्री दिलखुलास सगळ्यांची आणि कर मन मोकळं मित्रांजवळ.
मला ही खूप मैत्रिणी आहेत आश्रमात आणि त्या माझ्या जिवलग आहेत.माझं पुढचं आयुष्य मैत्रिणीच्या सोबतीने चांगलं जाणारच आहे . पण कधी कधी असं वाटतं असं वाटतं याआधीच मी आश्रमात यायला हवं होतं ,मैत्रिणींसोबत जगता आलं असतं मला भरपुर.
बरं चल पुढे करते आता पत्र.
.. तुझीच आई
...................

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

छान आहे पत्र.

आपण मुलांमध्ये खूप इन्व्हेस्टेड असतो. मुलं तितकी गुंतलेली नसतात. आणि हे साहजिकच आहे. त्यांचे भविष्य त्यांना हाक मारते आहे.
>>>>>तुझा मुलगा माझा नातू मोठा होत असताना त्याच्या पासून अलिप्त राहायला शिक ,भावनिक नात्यात गुंतू नकोस . मला याचा अनुभव आहे म्हणून मी देते तुला सल्ला.>>>> परफेक्ट!!!

>>>.माझं पुढचं आयुष्य मैत्रिणीच्या सोबतीने चांगलं जाणारच आहे . पण कधी कधी असं वाटतं असं वाटतं याआधीच मी आश्रमात यायला हवं होतं ,मैत्रिणींसोबत जगता आलं असतं मला भरपुर.>>> अतिशय सकारात्मक दृष्टिकोन.

धन्यवाद सामो
तुमच्या प्रतिक्रिया पोहचल्या ,आवडल्या

छान लिहिले आहे. आईची आठवण झाली. इतरांना त्रास नको म्हणून पटकन गेली बिचारी. तेव्हापण मुलांना त्रास नको हाच विचार केला असेल तिने.

कटू वास्तव्य. इच्छा असूनही आई-वडिलांच्या जवळ राहता येत नाही, आणि पुढची पिढी त्यांच्या आयुष्यात व्यस्त असल्याने त्यांचापण सहवास लाभत नाही, असे हे चक्र आहे.

<< एखाद्या नवीन गोष्टीची सवय करून घेतली की नाही होत त्रास . नंतर नंतर असं वाटू लागतं हेच योग्य आहे >>
काही वर्षांनी आमच्यावर पण हीच वेळ येणार आहे, खरंच, आत्तापासून सवय केली पाहिजे.