ती अन् पाऊस..
खूप दिवस झाले
आता पावसात
चिंब चिंब भिजुन
भरलेल सावळ ते आभाळ
नजरेत साठवणारी ती
भिजावं का थोडंतरी?
ह्या येत्या पावसात
चिंब चिंब घेऊ न्हाऊन
असा विचार करणारी ती
गेले कित्येक दिवस
दिवस? छे! कित्येक वर्ष
रिमझिम पावसाकडे बघतीये
छत्रीबाहेर हात काढुन
भिजण्याचा प्रयत्न करतीये
हा पाऊस मात्र
द्वाडच फार
भिजवले मलाच फक्त
मन मात्र तसेच कोरडे
कधी भरलं आभाळ, कधी भरलं आभाळ
तूच तुझे तुला आता, क्षण एवढे सांभाळ
कधी झालं रे मोकळं, आभाळ हे मोकळं
सुख आलं दारी आता, क्षण एवढे सांभाळ
भरलं हे आभाळ, मोकळं हे आभाळ
तूच घाल आता मेळ, पाठशिवणीचा खेळ
ज्याला कळलं कळलं, त्याचं पारडं भरलं
श्रावण हा ज्याचा त्याचा, त्यात इंद्रधनू सजलं
आभाळानं द्यावे पाणी
धरतीनं गावी गाणी
धरतीनं जागा द्यावी
झाडांची आई व्हावी
झाडांनी सावली द्यावी
पक्षांची घरटी ल्यावी
पक्षांनी पंख पसरावे
आभाळात विहरावे
आभाळाने द्यावे पाणी
धरतीनं गावी गाणी
पाषाणभेद ( त्रंबकेश्वर मुक्काम)
२५/०५/२०१९
कुंद धुंदलं आभाळ
कुंद धुंदलं आभाळ
पावसाळी ही सकाळ
वाहवल्या पायवाटा
पाणथळ पाणथळ
मंत्रमुग्ध तरू तोही
पानोपान गाई गाणं
टप टप सुरातून
मेघमल्हाराची तान
चिंब झाले चराचर
ओली बाळंत धरणी
रोमरोमी हुंकारती
तृणांकुराचीच गाणी
सुर्यदेव गारठला
त्याला निवारा सोडेना
विज वेडावत म्हणे
म्हाताऱ्याला सोसवेना
मन झाले चिंब चिंब
उब घराची पाखरा
देही फुलोरा फुलोरा
गंध भार परीसरा
© दत्तात्रय साळुंके
टपटप पडती धरणीवरती शुभ्रफुलांचे सडे
खुलून येते लख्ख चांदणे रिमझिम बरसते
हसू लागते फूल बहरते हिरव्या माळावरचे
जाहले इतकेच की, तिने आभाळ पाहिले ....१....
श्वासात दरवळते अत्तर मोहरत्या स्पर्शाचे
झुळूक गंधाची येते नंतर कळी उमलते
नदीत झरते जळात झुलतेे इंद्रधनु उमटते
जाहले इतकेच की, तिने आभाळ पाहिले ....२....
............... वैजयंती विंझे -आपटे
आभाळ आपल आपणच पेलायच
आपल्या वाटेवर आपणच चालायच
कुणाची काठी हवी कशाला
मनगटातली ताकद दिसू दे जगाला
बसतील कधीतरी उन्हाच्या झळा
अन् वाहेल मध्येच बेभान वारा
सावली तेंव्हा तू शोधु नकोस
आडोशाला जाऊन बसु नकोस
उन्हाच्या झळांमध्ये तू रापुन जा
बेभान वाऱ्यामध्ये तू मिसळून जा
सोन नाही का विस्तावात चमकत
सुगंध नाही का वाऱ्याने पसरत
निर्भीड छातीने सगळ झेलायच
आपल्या वाटेवर आपणच चालायच
सूर्य झालास तर अतिउत्तम पण
काजवा मात्र नक्कीच व्हायच..!
आपल आभाळ...
आभाळ आपल आपणच पेलायच
आपल्या वाटेवर आपणच चालायच
कुणाची काठी हवी कशाला
मनगटातली ताकद दिसू दे जगाला
बसतील कधीतरी उन्हाच्या झळा
अन् वाहेल मध्येच बेभान वारा
सावली तेंव्हा तू शोधु नकोस
आडोशाला जाऊन बसु नकोस
उन्हाच्या झळांमध्ये तू रापुन जा
बेभान वाऱ्यामध्ये तू मिसळून जा
सोन नाही का विस्तावात चमकत
सुगंध नाही का वाऱ्याने पसरत
निर्भीड छातीने सगळ झेलायच
आपल्या वाटेवर आपणच चालायच
सूर्य झालास तर अतिउत्तम पण
काजवा मात्र नक्कीच व्हायच..!
आपल आभाळ...
काल माझ्या अंगणात आभाळ आलं होतं.
त्याला पाहून माझा आनंद गगनात मावेना.
मी भारावून त्याच्या पाया पडलो.... त्यानेही माझ्या पाठीवरून हात फिरविला.
उभ्या अंगातून एक वीज सळसळत गेली...
पण ही वीज जाळणारी नव्हती तर उबदार होती...
अगदी गुलजार साहेबांच्या एखाद्या तरल कवितेसारखी.
मंत्रमुग्ध अवस्थेत मी चाचरतच आभाळाला म्हटलं, " माझ्याकडे तुला द्यायला काहीच नाही पण..."
आभाळ प्रेमळपणे हसलं अन् म्हणालं, " अरे बाळा, ... पाऊस कधी खालून वर जातो का? "
असं म्हणत त्याने माझा हात त्याच्या मुलायम हातात घेतला, गालावर प्रेमाने थोपटलं आणि एक पाऊस मला भेट म्हणून दिला.
गर्जुन कधी तडकुन-बिडकुन चालून येतं आभाळ
अनावरून अंगणात मग बरसुन जातं आभाळ
भरून आलं खूप की अन मनात येईल तेव्हा
भुळूभुळू गळत मुळूमुळू होतं आभाळ....
थेंब न थेंब झेलत तेव्हा भिजत रहातं अंगण
शांतपणे आभाळाचं ऐकुन घेतं अंगण
धारा झेलित पागोळ्यांनी वाहून जाता जाता
कोसळत्या आभाळासाठी खांदा होतं अंगण
थोपटून परत पाठवतं अंगण सावरलेलं आभाळ
अंगण मिठीत घेऊ कधी पहातं मग आभाळ
आभाळाच्या कवेत येईल असलं नसतं अंगण
आभाळ निव्वळ भाळ अस्तं... जमीन असतं अंगण
-- शलाका
ओल्या मातीच्या वासासवे
मन नकळत भूतकाळात जातं..
जुन्याशा त्या माजघरातून
धावतच मग अंगणात पोचतं..
छोटीशी पावलं तिथे
मातीभर उमटत जातात..
निरागस हास्याच्या लकेरी
अवघं आयुष्य व्यापून टाकतात!
इवल्याशा त्या ओंजळीत
पाउस झेलायचा प्रयत्न असतो..
छोट्याश्या अन् डोळ्यांमध्ये
आभाळाचाच रंग असतो!
एक मोठ्ठ आश्चर्य
मनभर दाटलेलं असतं..
'नक्की या ढगांमध्ये
पाणी कुठून येतं?'
काळ उलटत जातो..
पावसाचं गूढही उकलत..
लहानपणीच सगळं अप्रूप
तिथंच हरवून जातं..