कविता

अपूर्ण कविता

Submitted by दत्तात्रय साळुंके on 28 July, 2018 - 03:46

अपूर्ण कविता

माझ्या कवितेच्या वहीत
काही पाने उगाच फडफडतात
अपूर्ण कवितेची

कथा सांगतात
भरल्या ताटावरुन उठलेल्या
माणसाची

शब्द सुरेख असतात
पानं भळाळतात
खंत
अर्धवट अनुभूतीची

उगाच म्हणायचं जगलो
परीपूर्ण
समज काढायची वेड्या
मनाची

© दत्तात्रय साळुंके

शब्दखुणा: 

वास्तव

Submitted by कविता क्षीरसागर on 26 July, 2018 - 04:07

वास्तव

एखाद्या सुंंदर , हव्याहव्याशा
स्वप्नातून अचानक जाग येते ...

तेव्हा सामोऱ्या येणाऱ्या
वास्तवाचा हात हातात घ्यायला
आपण बिलकुल तयार नसतो

मग अंगावर येणारे हे सत्य नाकारुन
आपण ओढून घेतो पुन्हा
त्या हव्याहव्याशा स्वप्नांची
उबदार चादर ...

या अशाच
स्वप्नं आणि वास्तवाच्या मध्यसीमेवर
अडकून पडलेय आयुष्य ...

मी कवटाळू पहातेय स्वप्नांना
आणि वास्तव मला ...

कविता क्षीरसागर

शब्दखुणा: 

भीती वाटते

Submitted by कविता क्षीरसागर on 12 July, 2018 - 05:59

भिती वाटते ..

जगण्याचीही भिती वाटते
मरण्याचीही भिती वाटते
पांढरपेशी मनास माझ्या
कसलीही पण भिती वाटते

आवडते जरि हवा मोकळी
लावुन घेते दारे खिडक्या
क्षुल्लकसे वाटती परंतू
डासांचीही भिती वाटते

मनि शब्दांच्या मोजत मात्रा
दुसऱ्यांचे मोजतेय पैसे
जीव रमेना नोकरीत पण
सोडायाची भिती वाटते

एकेकाचे दुःख पाहुनी
कातर कातर मनात होते
पोकळ पण ह्या वांझ भावना
त्यांचीही मग भिती वाटते

शब्दखुणा: 

कविते !

Submitted by कविता क्षीरसागर on 12 July, 2018 - 05:54

एकदा कधीतरी
भावनेच्या आवेगात
आसवेच
झाली होती शाई
कविता लिहिताना ...

आता जणू
तुला त्याची
चटकच लागलीय
कविते ..

कविता क्षीरसागर

शब्दखुणा: 

मैत्री

Submitted by भागवत on 1 July, 2018 - 05:11

शब्दा पलीकडची नि:शब्द निखळ मैत्री
दुधाच्या सायी सारखी घट्ट असते मैत्री

नदी पात्रातील प्रवाही पाण्यासारखी दोस्ती
अवगुणात चांगले गुण शोधणारी असते दोस्ती

अवखळ, अल्लड, दिलदाराची यारी
यार साठी मार खायची सुद्धा असते त-यारी

दु:खातील काटे बाजूला काढणारा सखा
स्वत:चा घासातील घास भरवणारा असतो सखा

आयुष्याचा खेळ सावरत असतो सवंगडी
बेरंग अस्तिवातही रंग भरवत असतो सवंगडी

नात्याच्या पलीकडे संगत करतो सोबती
आनंद बेफिकीरीने वाटत असतो सोबती

तुजविन

Submitted by राजेश्री on 28 June, 2018 - 21:52

शब्दाविण नसते कविता
अन सुरांविण कसले गाणे
तसे तुजविण माझे असणे
अन तुजविण माझे जगणे...
श्वासांच्या मैफिलीत माझ्या
तुझेच सूर आळविते
जगण्याच्या तालामध्ये
तुझी चाल नित्य बांधते
तुझे हसणे माझी कविता
तुझे असणे माझे गाणे
तुजविण कसली कविता
तुजविन कसले गाणे

©राजश्री
२९/०६/२०१८

शब्दखुणा: 

तुझे डोळे

Submitted by कौस्तुभ आपटे on 9 June, 2018 - 11:48

----तुझे डोळे-----

सागर पिंजुन रत्न बिलोरी असतील आणले
अन जीवनाचे सार ओतुनी भरले चांदणे
घडवूनी क्षणभर देव असावा अचंबित ज्यांपूढे
तुझे डोळे ...तुझे डोळे ... हे असे ...तुझे डोळे ॥धृ॥

मुग्धता कधी सुमनांची,
चारुता कधी चंद्राचि,
नयनातुन ती सांडते.
गुढता गहन कोड्याची,
कल्पना नव्या कवीतेची,
नजरेतुन ती मांडते.

या तुझ्या लोचनी, खोल गेलो किती,
तरीही त्रुप्ती मना ना मिळे.
बाळ तान्हे कुणी, मधुरसे हासुनी,
जैसे लळा लावते गोजीरे
गोजीरे.. तुझे डोळे ..तुझे डोळे ... हे असे ॥१॥

असा मी कसा मी

Submitted by सुमित खाडिलकर on 5 June, 2018 - 09:56

असा मी कसा मी

कशा बदलतात जगण्याच्या दिशा
वाऱ्यावर वाहतो पाचोळा जसा मी
असा मी कसा मी, असा मी कसा मी

खूप ठरवले, काही राहिले काही केले
राहिल्यावर रुसू अन केल्यावर हसूतरी कसा मी

काहीतरी मिळवण्याची उर्मी
मलाही माहिते ती येते कुठुनी
तरी असल्या उर्मीवर भुलू कसा मी

कोणी म्हणे याला अध्यात्माची चाहूल
जे म्हणती तयांची ढोंगे पाहून
उदासच हसतो मनाशी आता मी

जन्मली करोडो माणसं, मुंगी, किडे
खरंच त्यांचे जगणे निरर्थक का होते!
कोडे हे सोडवेल का सांगा कोणी

शब्दखुणा: 

बाप ….

Submitted by manishh on 29 May, 2018 - 06:53

सगळ्या बापांसारखेच,
आपल्या बापालाही काही कळत नाही
याची खात्री पटल्यानंतर…

मला ह्याच शाळेत का घातलं?
फुटबॉल ऐवजी क्रिकेटला का नाही टाकलं?
असे आरोप केल्यानंतर…

बाप आहे ना, तो चुकतोच.
आपल्यासारखा स्मार्ट तो मुळात नसतोच
हे समजून चुकल्यानंतर…

मग तू स्वतः बाप झाल्यावर,
वैतागून पोरांना ओरडून झाल्यावर
प्रेमाने जवळ घेतल्यानंतर…

शब्दखुणा: 

Pages

Subscribe to RSS - कविता