कविता

ती

Submitted by पुरंदरे शशांक on 30 July, 2019 - 23:45

ती

पानांवर अलगद थेंबी ती आरसपानी होते
.......ती अशीच उमटत जाते

कुसुमांच्या बहरातूनही काटेही पेरीत जाते
......ती अशीच वेडी असते

सुंदरता हाती धरुनी ओंगळास थारा देते
......ती सदा मनस्वी असते

सुंदरासुंदरापलिकडली व्यक्तता केवळ असते
....... ती कधीही कृत्रिम नसते

प्रिय स्पर्शाने अनामिक भावना मनी उमटते
....... ती अशीच बहरत जाते

जावळातून तान्हुल्याच्या ती गंधीत होत रहाते
.......ती अशीच शब्दी येते

भाकरीत दिसते कधी ती, भुई सारवताना येते
.....ती कविता अविरत असते

कविता: आज्जी माझी…

Submitted by भागवत on 29 July, 2019 - 07:27

आभाळभर माया, आठवणींच्या सुरकुत्या
प्रखर बुद्धीची प्रभा, अंगी विशिष्ट कला
आज्जी माझी...

मायेची पाखर, उडून गेली दूरवर
परी आठवण नाही पुसली कदापि
आज्जी माझी...

संवादातून प्रेमाचे ऋणानुबंध जोडले
भेटीत स्नेहच जपले, हेच संचित साधले
आज्जी माझी...

कधी प्रसंगातून शब्दाविनाच सुटले,
डोळ्यातून अश्रु अर्धवट ओघळले,
प्रयत्नांत कधी धडपडले, घडले
परी मी किंचित नाही घाबरले
आज्जी माझी...

आप्तांना भेटण्यास जीव कासावीस
दिसताच पाणावले डोळे आठवणीने
आज्जी माझी...

शब्दखुणा: 

निरोप

Submitted by -शाम on 24 July, 2019 - 10:18

*निरोप*

केलीस फार तू निरोप घेण्या घाई
मन:पटलावरचे पुसलेसुद्धा नाही
ही आठवणींची गलबललेली चित्रे
सोडू का माझ्यासोबत कुण्या प्रवाही

चेहरा असा पारा पुसलेला ऐना
ना बिंब कोणते वा काही उमटेना
भवताली रंगबिरंगी सजते दुनिया
अन् मला सफेदीमध्ये या करमेना

काळासोबत गळतील मनाची पाने
ना पुन्हा बहरणे कुठल्या हिरवाईने
देहास फरपटत नेऊ पैलतीराला
की गाऊ माझे गाणे आनंदाने

मी जरा मोकळे बोलू जाता येथे
शब्दांचे धागे दुनिया ओढत नेते
अवघ्या प्रश्नांचा गुंता गुंता होतो
उत्तर पहिले काळीज काढुनी घेते

शब्दखुणा: 

संचित

Submitted by भानुप्रिया on 23 July, 2019 - 11:06

तुझ्या आठवांचं संचित
'आपल्या' असणाऱ्या सगळ्या क्षणांच्या
मऊशार अशा रेशमी रुमालात गुंडाळून
माझ्या मनाच्या
खोल, अंधाऱ्या तळघरात
जपून ठेवलंय मी
युगानुयुगं
शरीर जीर्ण झालं असलं
तरी त्या क्षणांवर एक
सुरकुती हि नाही
का त्या आठवांवर
कुठलेही तरंग उठलेले नाहीत
अंतरीची भळभळती जखम
सातत्याने वाहतेय
नव्यानं तयार होणारं रक्त
त्या तळघराच्या जमिनीला
अखंड ओलावा देतंय
हृदयाच्या भिंतींना
अजून हि चिरा गेलेल्या नाहीत
पण त्यावर काही युगांची पुटं मात्र
आता चढू लागलीयत

शब्दखुणा: 

फुलपाखरांचे ब्युटी पार्लर

Submitted by Dr Raju Kasambe on 18 July, 2019 - 10:49

फुलपाखरांचे ब्युटी पार्लर

एक होता सुरवंट
होता तो गलेलठ्ठ

दोनच कामे त्याला आवडत
झोपावे किंवा असावे मस्त हादडत

खाऊन खाऊन वजन वाढले
चालणे गेले वळवळणे राहिले

आई त्याला रागवत असे
चांगल्या गोष्टी सांगत असे

झालास लठ्ठ खाऊन खाऊन
चारदा झाली त्वचा बदलवून

खा खा खातोस पाने फुले
बघून तुला घाबरतात मुले

जाणे जरुरी लठ्ठोबा आता तुम्हाला
निसर्ग देवीच्या ब्युटी पार्लरला

असे आयुष्य कुठवर कंठणार
बनून नुसतेच खुशालचेंडू

वळवळ करीत सुरवंट गेला
कोशातील ब्युटी पार्लरला

विषय: 

अभंग...

Submitted by भागवत on 15 July, 2019 - 02:35

पंढरीच्या गावा| वैष्णवांचा मेळा|
भक्तीचा उमाळा| अपरिमित ||

सोहळा कीर्तनाचा| नामाचा गजर|
श्रद्धेचा महापूर| अखंडित||

पांडुरंग ध्यानी| पांडुरंग मनी|
नाम संकीर्तन| प्रवाही||

टाळांचा नाद| मृदुगांचा हुंकार|
विणेची झंकार| संगीतमय||

विटेवरी पांडुरंग| अठ्ठावीस युगं|
भक्तांची रांग| अविरत||

शब्दखुणा: 

सुस्नात तू गं ओलेती...

Submitted by अ'निरु'द्ध on 2 July, 2019 - 11:02

सुस्नात तू ओलेती

सुस्नाऽत तू गं ओलेऽती
केसऽही तुझे ते ओले...
अन् थेंब उष्ण तव गाली
परि मन माझे ते भिजले...

अंगावर ओले वसन
बिलगे तनुला तव ओल्या...
कासाविस करुनी सोडी
माझ्याच मनाला खुळ्या...

तनु पुसतानाचा बांक
अन हलके हलके झोके...
मृदू वस्त्र टिपे तव काया
मन माझे परि ओथंऽबे...

हलकेच बांधिशी केस
उचलुनी दुमडुनी कर...
पाहूऽनी अदा जिवघेणीऽ
माझाच धडधडेऽ ऊर...

आरऽसा बिलोरी दावे
तव पुष्ट सघन प्रतिबिंब...
तो लोभस नाजूक बांधा
पाहुऽनी होई मन चिंब...

प्रश्न आणि प्रश्न..

Submitted by मन्या ऽ on 25 June, 2019 - 14:34

प्रश्न आणि प्रश्न..

मनातील गुंता
हा नात्याचा
सोडवु कसा मी?
तुझ्याशी असणारे
बंध तोडु कसे मी?

आहेत फक्त
प्रश्न खुपसारे,
उत्तरे तयांची
शोधु कशी मी?
उत्तरे अपेक्षित
नसतील तर
काय करु मी?

सांग तुच मला आता
तुझ्याशी असणारे
बंध तोडु कसे मी?
तुझ्यावीना एकटी
राहु कशी मी?
नात्यांचे जुळू
पाहणारे बंध
स्विकारु कसे मी?

प्रश्न असंख्य आहेत.
उत्तरेही असतील..
ती उत्तरे शोधण्यास
साथ मला देशील?
एवढीच एक अपेक्षा
पुर्ण करु शकशील?

आयुष्याच्या वाटेवर..

Submitted by मन्या ऽ on 21 June, 2019 - 03:33

आयुष्याच्या वाटेवर..

आयुष्याच्या वाटेवर
अनेकजण भेटतात
काही विस्मृतीत
जातात ; तर
काही मनात घर
करतात..
आयुष्याच्या वाटेवर
अनेकजण भेटतात..

मनात घर करणारे
खोलवर रुजतात;
त्यांची साथ
हवीहवीशी वाटत
असताना मात्र
साथ सोडुनिया जातात.
आयुष्याच्या वाटेवर
अनेकजण भेटतात..

आरण्यकेश्वर..

Submitted by अ'निरु'द्ध on 18 June, 2019 - 09:48
aryanakeshwar

आडरानी दाट
भग्न शिवालय
उध्वस्त पाषाण
तयाचेही...

खुल्या प्रांगणात
सोसे उन्ह ताप
नंदी पाषाणाचा
धष्टपुष्ट...

पसरी आवारे
पाला नि पाचोळा
सुखे विहरती
नाग सर्प...

वन्य श्वापदांचा
अवचित डेरा
वाघाचाही फेरा
कधिमधी...

कधी काळी कोणी
एखादा पांथस्थ
आणिक भाविक
तुरळक...

योगी साधकांचा
कधी पदस्पर्श
परी अशा वेळा
कवचित...

गाभारी विलसे
सदा ही अंधार
जागे गूढ भाव
अंतरीचा...

Pages

Subscribe to RSS - कविता