कविता

दोन डोळे मत्सराचे हाय दिसती का मला ..

Submitted by विदेश on 29 January, 2016 - 22:51

बोलतो मी जास्त जेव्हा चुप बसवती का मला
गप्प असतो मात्र तेव्हा बोल म्हणती का मला

वाटते ना कायद्याची आजही भीती कुणा
लाच देता काम होते ते हुडकती का मला

ओळखीचे चांगले ते समजुनी मी भेटता
विसरुनी उपकार माझे दूर करती का मला

सांगतो सर्वास माझी जात मी माणूसकी
घेउनी बाजूस कानी परत पुसती का मला

चार येती कौतुकाचे शब्द कानी ऐकण्या
दोन डोळे मत्सराचे हाय दिसती का मला ..
.

सेल्फी ...

Submitted by कविता क्षीरसागर on 29 January, 2016 - 00:12

सेल्फी

आजकाल सेल्फीचं भलतं फॅडच निघालंय
आणि या तरुणाईला तर अगदी वेडच लागलय

वेगवेगळ्या लोकांसोबत , वेगवेगळ्या ठिकाणी
फ्रंट कॅमेरा लगेच होतो ऑन होतो त्यांचा त्या त्याचक्षणी

कधी ऐतिहासिक स्थळांना भेट देताना
तर कधी एकमेकांनाच प्रेमाचा विश्वास देताना

कधी मॉलमधे मित्र मैत्रिणींसोबत
कधी सिनेमा हॉलमध्ये , पॉपकॉर्न आणि पेप्सीसोबत

कधी आनंदात बेभान होऊन डुंबत असताना
तर कधी भर गर्दीतही एकटेच फिरताना

अशा अनेक सेल्फीज अपलोड होतायत फेसबुकवर , व्हॉट्सॲपवर
त्यावरच्या कॉमेंट्स आणि लाईक्सने मग पडत जाते त्यात भर

स्वतःशिवाय जणू कुणाला दिसतच नाहीये जग

शब्दखुणा: 

दुःख ....

Submitted by कविता क्षीरसागर on 27 January, 2016 - 02:27

दुःख ...

तिचे राजवर्खी दुःख
जणू मेण्यात सजले
दुःख माझे पोरकेसे
वाटेवर पडलेले

तिची वेदनाही थोर
सा-या जगास कळते
मनातल्या मनामधे
माझा हुंदका गिळते

दुःख दुःखच असोनी
किती पदर त्यालाही
आज वाटते असूया
मला तिच्या दुःखाचीही

कविता क्षीरसागर

शब्दखुणा: 

पर्याय आज नाही फुलण्याशिवाय आता ..

Submitted by विदेश on 26 January, 2016 - 14:27

पर्याय आज नाही फुलण्याशिवाय आता
फुलणार ना फुले ही काट्याशिवाय आता

आश्वासनास देण्या नेता सरावलेला
मतदार राहतो का भुलल्याशिवाय आता

होता अनोळखी पण नात्यातला निघाला
राहील काय येथे घुसल्याशिवाय आता

पेशा विदूषकाचा पाठीस लागलेला
उरली व्यथा न दुसरी हसण्याशिवाय आता

हुजरेगिरीत सारे आयुष्य काढलेले
होते न काम काही झुकल्याशिवाय आता ..
.

शब्दखुणा: 

ओळख नसता माना हलवत बघुनी हसती काही -

Submitted by विदेश on 20 January, 2016 - 11:47

ओळख नसता माना हलवत बघुनी हसती काही
ओळख असता टाळत नजरा उलटे फिरती काही

उगवत मातीतून बिजाला आनंदाला भरते
शेवट अपुला अंती माती का घाबरती काही

प्रयत्नांती ईश्वरप्राप्ती माहित हे सर्वांना
देवावर नवसावर श्रद्धा ठेवुन फसती काही

रस्त्यावरुनी पुष्प गुलाबी विकुनी जगती काही
अंथरुणावर स्वप्न गुलाबी बघतच मरती काही

कलियुग आहे कोणालाही कोठे कृष्ण न भेटे
दु:शासन का जागोजागी मिरवत दिसती काही ..
.

शब्दखुणा: 

बेधुंद

Submitted by VISHAL44 on 8 January, 2016 - 04:08

बेधुंद

खुला खुला आसमंत
गार गार वारा हा मंद
रोम रोमात उसळे आनंद
मन मन उडे बेधुंद

सांगे काही अंतरंग
चल भिजू चिंब चिंब
नको चोरूस तू अंग
चल पाहू प्रेम सप्तरंग

लव लवते वृक्ष पाती
भिर भिरतोय वारा
हळू हळू स्पर्श करता
येतो अंगास शहारा

नको करूस विलंब
चल जाऊ संग संग
घे भरारी उंच उंच
तोडून सारे बंध

# विशाल लांडगे

शब्दखुणा: 

कोऽहं

Submitted by पुरंदरे शशांक on 4 December, 2015 - 02:12

कोऽहं

मी सुरुप मी कुरुप
दयावान हिंस्त्र मीच
रुपवर्णा पलिकडिल
मीच तो जनावनात

तप्त शीत मीच एक
सुखदु:खातीत मीच
भव्य दिव्य मीच एक
क्षुद्र भासतो क्षणात

मी वसंत मी शिशिर
वाळवंटी मी अथांग
सागर अन् अंतराळ
भरुन सर्व निस्तरंग

मी प्रकाश मूर्तिमंत
तमातूनि मी वहात
गतिमान मीच एक
अचल शांत निर्विकल्प

ना तनात ना जगात
ना मनात ना क्षणात
भासमात्र सर्व येथ
मीपणही भास फक्त .....
---------------------------------------------------------

बाहेर पडतेय...

Submitted by भुईकमळ on 2 December, 2015 - 13:06

बाहेर पडतेय
त्या शब्दांच्या आराशीतून
शोधण्यासाठी एक निवांत कोपरा
जिथे फिरकत नाहीत पुन्हा
भुतकाळाचे कवडसे
ओरखडायला वर्तमानाचा
काळोखथंड अंतर्गाभा…

विकलेयत कवडीमोल भावात
कवितांचे कागद की काळजाचे तुकडे
ज्यांच्या सावल्या
पेट घेतात विव्हळ अश्रुंनी
रात्र उत्तरोत्तर गडद होताना,
आता पडत नाही फरक फारसा
मेणबत्ती अर्ध्यातच विझताना...

घरंगळतेय शिशीरस्नात अरण्यात
पाचोळा होऊन
की यायला नकोत दुरुनही वेढायला
तो दरवळ मायावी शब्दांचा ,
मी ठेवलंय पुरून श्वासांना
थडग्याखाली निर्माल्याच्या ….

चाललेय तरळत
पाणकणसाच्या मुठीतून निसटत्या

शांत-अशांत

Submitted by पुरंदरे शशांक on 24 November, 2015 - 04:59

शांत-अशांत

घुसमटता अवघे रान
अवघडली पाने सारी
गोठला श्वास वार्‍याचा
त्या कलत्या सांजकिनारी

निश्चळता निथळत होती
झाडीत गर्द विणलेली
पक्ष्यांच्या पंखांमधूनी
थरथरता हिरावलेली

पायवाट एकुटवाणी
डोहाशी स्थिरावलेली
जललहरी विरामलेल्या
काठावर रेती ओली

किरकिरते रानही स्तब्ध
निस्तरंग सारी पाती
कोल्हाळ निमाला वरचा
अंतरात खळबळ होती .....

तुझ्यावरची कविता

Posted
3 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
3 वर्ष ago

तुझी कविता .. तुझ्यासारखीच
अगदी आठवणीनं जपून ठेवलेली.
पण कितीही शोधली
आत - बाहेर,
तरी नाहीच हाती लागत शेवटी

तुझ्यावरची कविता ...
ती ही अगदी तुझ्यासारखीच !
अखंड शोध; आत - बाहेर
नुसतेच भास; आत - बाहेर
नाहीच सापडत शब्दांत शेवटी ..

शब्दांचे मात्र बघवत नाहीत हाल;
ते अगदी माझ्या वळणावर.
आत - बाहेर घुटमळतात
घुसमटतात;
कधी हुरहुरत
कधी हुळहुळत ...

प्रकार: 

Pages

Subscribe to RSS - कविता