गझलेत काही कमतरता , चुका असल्यास
नक्की सांगा. त्यांचे स्वागतच असेल .
<
संवेदना होती नवी....
वृत्त : देवप्रिया / कालगंगा
गालगागा गालगागा गालगागा गालगा
याचकाची भंगलेली साधना होती नवी !
घाव तो होता जुना अन् वेदना होती नवी !
मी तुझी नाही सखी पण छान माझा मित्र हो,
त्याच दुःखाला भुलाया सांत्वना होती नवी !
ते विषारी बोलती मी मुंगुसासम धाडसी,
पण मनाला दंशण्याची कल्पना होती नवी !
सागराने त्या उन्हाशी सापळा रचला जरी,
श्रावणाला धाडण्याची प्रेरणा होती नवी !
मी पहिल्यांदा एखादी गजल वृत्तात लिहिण्याचा प्रयत्न केला आहे. काही चुका असल्यास नक्की सांगा.
वृत्त : आनंद ( गा गा ल गा ल गा गा )
बाकी अजून होते कित्येक श्वास माझे !
वाऱ्यात दरवळू द्या आता सुवास माझे
ठेवून जात आहे खोटे सुहास माझे !
गावून गीत माझे शाबासकी तुम्हाला
माझेच ओठ बोले गाणे उदास माझे !
मांडून स्तूत खोटे "चेले" उदंड जगली
घटवून घेतले मी आयुष्य "मास" माझे !
वैऱ्यास ठार केले वाटे कुणी न बाकी
त्यांनीच घात केला जे आसपास माझे !
आशेत आदराच्या शाई लयास गेली
दरसाल फक्त झाले काव्य झकास माझे !
आई
आई जणू असे
पंच महाभूत ।
भुमिका अद्भुत
आई होणे ।
आई जणू पाणी
मायेचा सागर ।
प्रेमाची घागर
सरली ना ।
आई जणू हवा
सजीवांना श्वास ।
अंतालाच कास
सुटतसे ।
आई जणू अग्नी
परीक्षेचा काळ ।
पती मुलं बाळ
सांभाळणे ।
आई जणू पृथ्वी
सृष्टीला आधार ।
कधी ना माघार
पोषणात ।
आई ती आकाश
खग घेती झेप ।
अन्नाची या खेप
पिलांसाठी ।
कंठ कोरडा पडतो आणि
नेत्रही अश्रू पीती
कधी मनाला वाटून जाते
आठवणींची भीती
आठवणी या अशा अतिथी
सांगावे नसतात
जरी नकोश्या तरीही येवून
बीनडंखी डसतात
तोच डंख अन् त्याच वीषाने
गुंगावे तरी किती
कधी मनाला वाटून जाते
आठवणींची भीती
वर्तमानाला हादरुन सोडे
बीतलेली एक घटका
आठवणीमध्ये लपून लावते
पुन्हा मनाला चटका
नको दिवस तो परतून यावा
नको पुन्हा ती तीथी
कधी मनाला वाटून जाते
आठवणींची भीती
डोळ्यांत दोष वाटे हर्षात अश्रू गळला
तो डाव पापणीचा तेव्हा मला न कळला
वेशीत शब्द खोटे रस्ते नवीन होते
तो गाव लेखणीचा तेव्हा मला न कळला
गाफिल सर्व काटे न सांगता उमलल्या
ठराव त्या कळ्यांचा तेव्हा मला न कळला
तोडले अंग लचके वाटे मला पिशाच्च
घेराव "माणसांचा" तेव्हा मला न कळला
बाजार लोकशाही त्यांनीच मांडलेला
तो "भाव" भाषणांचा तेव्हा मला न कळला
चपळाई अंगी होती तरीही ससेच हरले
सराव कासवांचा तेव्हा मला न कळला
ठेवून खूश त्यांना अवघा दबून गेलो
भराव मागण्यांचा तेव्हा मला न कळला
काव्यपंक्ती सजविण्या
शब्दरुपी साज दे
ताऱ्यासम तेज माझ्या
लेखणीस आज दे
ताल शोधे ओळ अशी
वाद्यरुपी बाज दे
रसीक मन भेदे असा
गोड तीरंदाज दे
शब्दाला या ग्लानी आली
स्फुर्तीचा ईलाज दे
शब्दपदर ओढणाऱ्या
लेखणीस लाज दे
नव्या दाद सागरात
लिनता जहाज दे
श्रोते मंत्रमुग्ध करे
मधुमय आवाज दे
मन स्वस्थ बसू नये
ध्येय नवे काज दे
काव्यरूपी मुद्दलास
कौतुकाचे व्याज दे
जवळ येऊनही हे असे दुरावणे आले
जेव्हा तुझ्याच शब्दांत तुला मोजणे आले
आभाळाकडे मागितली माऊली मी
तसे मागून तुझ्या सावलीचे येणे आले
फाडूनी टाकली पाने जरी माझ्या गझलांची
नको असतानाही त्यांत तुला वाचणे आले
तोडूनी सारे पाश तुला भेटायला येण्याआधी
माझ्याच दाराच्या उंबर्यात तुझे नाकारणे आले
(माफी असावी मी माबो वर कथा/ कादंंबरी विभागात एका कादंंबरीचे भाग लिहीत होतो...अजूनही लिहीतो आहे त्यात गझलेकडे जरासे दुर्लक्ष झाले.
गझले माफ कर बाई--/\-- ! जे शिकायला आलो त्याकडेच दुर्लक्ष झालं... ध्येयाकडेच दुर्लक्ष झालं... )
उपभोगाया मजला आता सुख हे फुरसत नाही
देवा राहू दे दु:खातच त्याविण करमत नाही
आवड मजला ना पुष्पांची का पसरवली अफवा
होती ती काट्यांची सवयच फूलहि धरवत नाही
हसतो बघुनी परका कोणी स्नेही जणु समजोनी
रस्त्यावर सामोरी दिसता अपुला फिरकत नाही
आवडतो मज माळायाला गजरा ग सखे तुजला
नाही बघवत तो सुकल्यावर यास्तव माळत नाही
रंगत चढते भान विसरुनी लोकांना हसवाया
आनंदी खोटाच मुखवटा कोणा समजत नाही
पथ काटेरी पायाखाली मज सवयीचा आहे
हिरवळ सुखदच बागेमधली मजला वाटत नाही ..
.
........... विजयकुमार देशपांडे
बोलतो मी जास्त जेव्हा चुप बसवती का मला
गप्प असतो मात्र तेव्हा बोल म्हणती का मला
वाटते ना कायद्याची आजही भीती कुणा
लाच देता काम होते ते हुडकती का मला
ओळखीचे चांगले ते समजुनी मी भेटता
विसरुनी उपकार माझे दूर करती का मला
सांगतो सर्वास माझी जात मी माणूसकी
घेउनी बाजूस कानी परत पुसती का मला
चार येती कौतुकाचे शब्द कानी ऐकण्या
दोन डोळे मत्सराचे हाय दिसती का मला ..
.
चांगला होता जरी हा "त्या"स कधि ना भावला
"चांगला असणे"च ह्याचा दोष "त्या"ला घावला ..
आज पटली त्या यमाला फार माझी थोरवी
श्वासही माझाच तो का पळवण्याला धावला ..
एक सदरा मी सुखाचा माणसाचा घातला
फाडण्याचा घाट त्यांचा का अती सोकावला ..
हाय ना मी फेडला पहिला नवस त्याचा कधी
क्षण सुखाचा मज मिळेना देवही रागावला
लेउनीया साज आली कामिनी थाटात ती
तेज बघुनी कामिनीचे साजही भारावला
.