तो डाव पापणीचा तेव्हा मला न कळला

Submitted by गणक on 18 July, 2020 - 02:51

डोळ्यांत दोष वाटे हर्षात अश्रू गळला
तो डाव पापणीचा तेव्हा मला न कळला

वेशीत शब्द खोटे रस्ते नवीन होते
तो गाव लेखणीचा तेव्हा मला न कळला

गाफिल सर्व काटे न सांगता उमलल्या
ठराव त्या कळ्यांचा तेव्हा मला न कळला

तोडले अंग लचके वाटे मला पिशाच्च
घेराव "माणसांचा" तेव्हा मला न कळला

बाजार लोकशाही त्यांनीच मांडलेला
तो "भाव" भाषणांचा तेव्हा मला न कळला

चपळाई अंगी होती तरीही ससेच हरले
सराव कासवांचा तेव्हा मला न कळला

ठेवून खूश त्यांना अवघा दबून गेलो
भराव मागण्यांचा तेव्हा मला न कळला

या वेदना खळीच्या गालातल्या तिच्या त्या
तो घाव लाजण्याचा तेव्हा मला न कळला

तुटलेले हात माझे तु तह कर म्हणाले
पाडाव सैनिकांचा तेव्हा मला न कळला

गझलेच्या सागरात कोणी मला ढकलले
हा वाव पोहण्याचा आता मला हो कळला

.......... गणक

Group content visibility: 
Public - accessible to all site users