थरथर आहे की नाही
- महेश मोरे (स्वच्छंदी)
श्वासांमध्ये बघा पुरेशी थरथर आहे की नाही
मरणाऱ्याचा आत्मासुद्धा बेघर आहे की नाही ?
कोठे गेलो कुठून आलो तुलाच कळते पहिल्यांदा
सांग मला मग तुझी नजर माझ्यावर आहे की नाही
तसा इरादा चुंबायाचा कधीच माझा नव्हता पण
फक्त पाहिले ओठांमध्ये साखर आहे की नाही
काहीसुद्धा केले नव्हते ससा तरीही सापडला
बघावयाला आला होता...वाघर आहे की नाही
विकास म्हणजे काय नेमके असेल कळले तर सांगा
मधात घोळवलेले नक्की गाजर आहे की नाही
स्वप्न ओले कागदावर
फार ओझे कागदावर
उत्तरे झाली शिळी पण
प्रश्न ताजे कागदावर
बोलण्यावर ना भरोसा
भिस्त आहे कागदावर
संपले केव्हाच नाते
फक्त उरले कागदावर
एवढे सोपे न असते
व्यक्त होणे कागदावर
ही कृपा त्या इश्वराची
उमटते जे कागदावर
कविता क्षीरसागर
त्या देवाला सवा रुपाया माणुस देतो आहे
©®- महेश मोरे (स्वच्छंदी)
अन्यायाला शासन देतो दु:खितांस जो माया त्या देवाला सवा रुपाया माणुस देतो आहे
जो सूर्याला प्रकाश देतो अन् चंद्राला छाया त्या देवाला सवा रुपाया माणुस देतो आहे
हवेत इथल्या आयुष्याचे श्वास पेरले ज्याने, जो मातीच्या कुशीत स्वप्ने पेरत फुलवत आला
जो मेंदूला ऊर्जा देतो भलेबुरे समजाया त्या देवाला सवा रुपाया माणुस देतो आहे
डोळ्यांत दोष वाटे हर्षात अश्रू गळला
तो डाव पापणीचा तेव्हा मला न कळला
वेशीत शब्द खोटे रस्ते नवीन होते
तो गाव लेखणीचा तेव्हा मला न कळला
गाफिल सर्व काटे न सांगता उमलल्या
ठराव त्या कळ्यांचा तेव्हा मला न कळला
तोडले अंग लचके वाटे मला पिशाच्च
घेराव "माणसांचा" तेव्हा मला न कळला
बाजार लोकशाही त्यांनीच मांडलेला
तो "भाव" भाषणांचा तेव्हा मला न कळला
चपळाई अंगी होती तरीही ससेच हरले
सराव कासवांचा तेव्हा मला न कळला
ठेवून खूश त्यांना अवघा दबून गेलो
भराव मागण्यांचा तेव्हा मला न कळला
कुडीचे ऐनवेळी चांदणे होते
- महेश मोरे (स्वच्छंदी)
तुझ्या दारात जेव्हा थांबणे होते
बिचारे मन पुन्हा वेडेपिसे होते
तुझ्या डोळ्यांत केवळ पाहतो मी अन्
जगाला वाटते की बोलणे होते
बदलली वाट नाही आजसुद्धा मी
दिशेवर प्रेम माझे आंधळे होते
कुठे हे राहते ताब्यात माझ्या मन ?
तुझ्यापासून जेव्हा वेगळे होते
तुझ्या हातात माझा हात असला की
कळत नाही किती हे चालणे होते
हृदय माझे तसे माझेच आहे पण
तुझ्या नजरेस पडले की तुझे होते
हरएक श्वासात भिनतेस तू
- महेश मोरे (स्वच्छंदी),सातारा
8554085101
ठरवून देतो शहारा शरीरास त्या गूढ स्पर्शात असतेस तू
भरतेस अस्सल सुखांनीच आयुष्य अन् धुंद बरसात करतेस तू
हळुवार स्पर्शून जाते किनाऱ्यास ती लाट पाण्यातली तू सखे
पाण्यास असते तुझी काळजी आणि अपुल्याच खेळात रमतेस तू
तो चंद्र फिरतो जसा भोवताली नि धरणी जशी त्यास दुर्लक्षिते
मी घालतो नित्य घिरट्या तशा आणि अपुल्याच नादात फिरतेस तू
हरीहरन हे नाव गाण्याची थोडी देखील आवड असणाऱ्याला माहित नाही असे होऊ शकत नाही. पार्श्वगायन हा जरी त्यांचा प्रांत असला तरी त्याव्यतिरिक्त त्यांनी अनेक उत्तम गझल गायल्या आहेत. अर्थात हिंदी-उर्दू गझल चे नाव निघाले की ‘गुलाम अली, जगजीत सिंग किंवा नाही म्हणता पंकज उधास’ हेच ठळक गझल गायक म्हणून आपल्या समोर येतात. खऱ्या गझल प्रेमींमध्ये मग ‘अहमद आणि महमंद हुसेन’, सारखे किंवा ‘तलत अझीज, भूपेंद्र सिंग, आणि चंदन दास’ सारखे गझल गायक आपले स्वतंत्र स्थान मिळवून आहेत. अगदीच कट्टर गझल पंथी ‘बेगम अख्तर, फरीदा खानुम, मेहदी हसन, आबिदा परवीन’ यांना हिमालया सारखे थोर समजतात.
म्हणून ये बघायला
- महेश मोरे (स्वच्छंदी),सातारा
नको उशीर व्हायला म्हणून ये बघायला
नकोच साथ आपली अशीतशी सुटायला
ऋतू जसा सरायचा तसा निघून चाललो
उशीर लागतोच ना मनातुनी निघायला
नकोस देउ दु:ख वा नको नवीन वेदना
तुझी जुनीच आठवण पुरेल मज छळायला
उसंत बस् पुरेलशी कळीस दे फुलायला
कितीक वेळ लागतो सुवास दरवळायला ?
जसे सुचायचे सखे अधीर काव्य तुजवरी
हवा तसाच शेर बस् तुझ्यावरी सुचायला
काय भांडू मी कुणाशी
पोट असतांना उपाशी
शेवटी मी मोडली ती
वाट रुळलेली जराशी
कोवळे का दुःख माझे ?
घाव जपतो मी उराशी
माय माझी राहते ते
स्थान बनते एक काशी
दुःख विकण्या काढले मी
भाव झाला ना हराशी
सत्य होते ते कदाचित
भूक म्हणते हो अधाशी
मातृभूमी रडत असते
लेक जेव्हा जाय फाशी
आसवांची पैज होती
जिंकलो मी श्रावणाशी
इलाज नाही
- महेश मोरे (स्वच्छंदी)
आयुष्याला सलतो आहे..इलाज नाही
विरह तुझा मज डसतो आहे..इलाज नाही
जरी दिली तू टाळी नाही मला एकही
तुझी वाहवा करतो आहे..इलाज नाही
रस्ता बदलुन तू वळणावर वळल्यापासुन
नको तिथे मी वळतो आहे..इलाज नाही
तुला भेटले नाही घरटे हक्काचे अन्
मीही वणवण फिरतो आहे..इलाज नाही
चार विषारी दात काढले तेव्हापासुन
जो-तो येतो, छळतो आहे..इलाज नाही
इतकी वर्षे झाली पहिला गुलाब देउन
हात अता थरथरतो आहे..इलाज नाही