त्या देवाला सवा रुपाया माणुस देतो आहे

Submitted by महेश मोरे स्वच्छंदी on 8 August, 2020 - 12:38

त्या देवाला सवा रुपाया माणुस देतो आहे
©®- महेश मोरे (स्वच्छंदी)

अन्यायाला शासन देतो दु:खितांस जो माया त्या देवाला सवा रुपाया माणुस देतो आहे
जो सूर्याला प्रकाश देतो अन् चंद्राला छाया त्या देवाला सवा रुपाया माणुस देतो आहे

हवेत इथल्या आयुष्याचे श्वास पेरले ज्याने, जो मातीच्या कुशीत स्वप्ने पेरत फुलवत आला
जो मेंदूला ऊर्जा देतो भलेबुरे समजाया त्या देवाला सवा रुपाया माणुस देतो आहे

चोची देतो, दाणे देतो, घरट्यासाठी झाडे, लपण्यासाठी कडेकपारी, कुणास अख्खे घरटे
पंखांमध्ये ताकद देतो अन् दुनिया विहराया त्या देवाला सवा रुपाया माणुस देतो आहे

जो आहे या आशेवरती वाट चालतो पंगू, मुक्यास वाचा देतो..देतो आंधळ्यास जो काठी
अन् स्पर्शाने जीवन करतो अत्तरभरला फाया त्या देवाला सवा रुपाया माणुस देतो आहे

आधाराविन स्थीर ठेविले ग्रहताऱ्यांचे मंडळ, युगे युगे जो फिरवित आहे गोल गोल पृथ्वीला
क्षण ज्याला बस् एक पुरेसा विश्व नवे घडवाया त्या देवाला सवा रुपाया माणुस देतो आहे

गर्भामध्ये भूक दिली, अन्नाची तजविज केली मायेसोबत माय दिली अन् बाप दिला रक्षाया
फुकटामध्ये प्राण दिला अन् दान म्हणूनच काया त्या देवाला सवा रुपाया माणुस देतो आहे

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सव्वा रुपया देणारे आहेत तसे सव्वा कोटी देणारे सुध्दा आहेत. निर्विवाद छान लिहिली आहे, पण श्रध्देवर नको लिहायला.

छान Happy

वाह!!! आवडली.
>>>गर्भामध्ये भूक दिली, अन्नाची तजविज केली मायेसोबत माय दिली अन् बाप दिला रक्षाया
फुकटामध्ये प्राण दिला अन् दान म्हणूनच काया त्या देवाला सवा रुपाया माणुस देतो आहे>>>> सुंदर!!

देवाला काहीच नको असतं हो आपणच आपल्या ऐपती प्रमाणे काहीतरी द्यायचा एक प्रयत्न करत असतो. पण देतानाही मागतो ते चुकतं.

गीतेत म्हटलं आहे खऱ्या श्रद्धेने / प्रेमाने फुल , एखादं पान , एखादा तांदळाचा दाणा अर्पण केला तरी मी सद्गदित होतो .. पण सव्वा रुपया देणारे काय किंवा सव्वा कोटी रुपये काय तेवढी खरी भावना खूप कमी लोकांची असेल असं वाटतं .. बरेच जण देवाने आहे ते सुरळीत चालू ठेवावं , काही विपरीत घडू देऊ नये यासाठी त्याच्याशी बरे संबंध असावेत या सुप्त इच्छेतून भक्ती करतात ... काहींना काही ना काही हवं असतं म्हणून त्याच्याकडे जातात .. तर काही थोडे लोक शुद्ध भीतीपोटी / गरजेपोटी ... उद्या वाईट वेळ आली तर देव मदतीला उभा राह्यला हवा ना .. मग तेव्हाच पहिल्यांदा देवळात थोडंच जाता येणार , देव म्हणेल इतके दिवस माझी आठवण नाही , आणि आता गरज पडल्यावर माझी आठवण आली ? मग मदत करणार नाही कदाचित ... अशा विचारापोटी ...

निव्वळ देवाच्या ओढीने , प्रेमाने किती जण देवळात जातात किंवा घरी खाजगी पूजा प्रार्थना ( मुर्तीपुढे बसूनच किंवा स्तोत्र अगरबत्ती दिवा हे सगळंच असं नाही ; साधे मनात हात जोडणंही आलं त्यात ... ) करतात हे तो देवच जाणे ...

मी कुठल्या कॅटेगरीत येते अजून मलाही नक्की माहीत नाही ..

कसलीही मटेरियलिस्टिक मागणी न करणं हे अजून जमलेलं नाही ... जे मिळायचं असेल , जे त्याला द्यायचं असेल ते तो देईलच , मागायची काय गरज आणि जे काही मिळेल / वाट्याला येईल ते त्याची इच्छा मानून विनातक्रार स्वीकारणं हेही अजुन जमलेलं नाही ... पण निदान हे जमायला लागणं हे ध्येय असायला हवं इतपत तरी समजलं आहे .. पुढचा रस्ताही त्यानेच पार करवून घ्यावा ही प्रार्थना आहे .. एकटीने जमणार नाही .

लोभानं जा, धाकानं जा, फक्त प्रेमानं जा देवच खरा सखा आहे. जिवंत माणसांपेक्षाही देव जास्त जवळचा वाटतो कारण तो ऐकून घेतो, हुसकावून लावत नाही, मागणाराचा धिक्कारही करत नाही. यामुळे मंदिरं, मशीदी, चर्च, प्रार्थनास्थळांची संख्या वाढत आहे.

>>>साधे मनात हात जोडणंही आलं त्यात >>> खरोखर मी मागण्याव्यतिरिक्त कधी देवाला हात जोडले नव्हते पण गेले काही महीने-२ महीने, गणपतीच्या सुंदर मूर्तीपुढे आंघोळ झाल्यावरती रोज हात जोडते व 'ॐ गँ ग्लौं गणपतये नमः' हा मंत्र म्हणते. त्या २ त्या २ मिनीटांनीही इतकी शांती मिळते जी दिवसभर पुरते. चमत्कार आहे की श्रद्धेचे बळ ते एक गणपतीच जाणे.

>>>>>लोभानं जा, धाकानं जा, फक्त प्रेमानं जा देवच खरा सखा आहे. जिवंत माणसांपेक्षाही देव जास्त जवळचा वाटतो कारण तो ऐकून घेतो, हुसकावून लावत नाही, मागणाराचा धिक्कारही करत नाही.>>>> करेक्ट तुम्हाला हव्या त्या भावभावनांचे आरोपण (प्रोजेक्शन) त्याच्यावर तुम्ही करु शकता.