अहद-ए-वफ़ा… अहिस्ता...

Submitted by सूक्ष्मजीव on 14 June, 2020 - 03:59

हरीहरन हे नाव गाण्याची थोडी देखील आवड असणाऱ्याला माहित नाही असे होऊ शकत नाही. पार्श्वगायन हा जरी त्यांचा प्रांत असला तरी त्याव्यतिरिक्त त्यांनी अनेक उत्तम गझल गायल्या आहेत. अर्थात हिंदी-उर्दू गझल चे नाव निघाले की ‘गुलाम अली, जगजीत सिंग किंवा नाही म्हणता पंकज उधास’ हेच ठळक गझल गायक म्हणून आपल्या समोर येतात. खऱ्या गझल प्रेमींमध्ये मग ‘अहमद आणि महमंद हुसेन’, सारखे किंवा ‘तलत अझीज, भूपेंद्र सिंग, आणि चंदन दास’ सारखे गझल गायक आपले स्वतंत्र स्थान मिळवून आहेत. अगदीच कट्टर गझल पंथी ‘बेगम अख्तर, फरीदा खानुम, मेहदी हसन, आबिदा परवीन’ यांना हिमालया सारखे थोर समजतात. हे सर्व फक्त गझल गायकीला समर्पित दिग्गज गायक, आणि स्वतः पार्श्वगायक म्हणून उत्तुंग उंची गाठल्याने हरिहरन यांची गझल गायक म्हणून ओळख कुठेतरी मागे पडते. हरिहरन गझल गायक म्हणून संगीतप्रेमींमधे एकदम पुढे आले ते त्यांच्या झाकीर हुसेन यांच्यासोबत केलेल्या हाजीर या अल्बममुळे. हा अल्बम उत्तमच आहे, पण आज आपण त्याच्या सुरुवातीच्या काळातील एका गझलकडे पाहणार आहोत. गुल्फाम हा अल्बम १९९४ साली आला. याचे गायक आणि संगीतकार हरिहरन स्वतः आहेत.

ही गझल, गायकीच्या अंगाने गझलपेक्षा नज्म या व्याखेकडे जास्त झुकणारी आहे. हळुवार आहे. सारंगी आणि सतार यांच्या सोबतच गिटारच्या स्वरमेळातून गझलची सुरुवात होते आणि हरिहरन गाऊ लागतात.

उसने जब मुझसे किया अहद-ए-वफ़ा अहिस्ता...
दिल के वीराने में एक फूल खिला अहिस्ता ...........

शब्दाच्या अर्थ व्यक्त करण्याच्या शक्तीला व्याकरणात अभिधा, लक्षण आणि व्यंजन अशी नावे आहेत, आणि हिंदी-उर्दू मध्ये ही क्षमता अफाट आहे. साध्या शब्दामधून गहिरा अर्थ व्यक्त होतो.

पहिल्या ओळीतील प्रश्न, जेंव्हा तिने तिचं प्रेम हळुवारपणे माझ्या समोर व्यक्त केलं, स्वीकारलं त्यावेळी काय घडलं? दुसऱ्या ओळीत त्याचे उत्तर, माझ्या हृदयाच्या उजाड माळरानावर हळुवार पणे एक फूल उमललं..... वाह! काय कल्पना आहे. साधी, सोपी, तरल आणि तरीही हृदयाला हात घालणारी.

नक्कीच प्रत्येकाने हा क्षण अनुभवलेला आहे. स्त्री असो अथवा पुरुष, हे फूल अनेकांच्या हृदयात उमलले आहे. ज्याने त्याने ते फूल एका कप्यात आजही जपून देखील ठेवलेलं आहे. या शेरा मधील भावना ही अनेक वेळा प्रेम करून त्याची सवय झालेल्या साकी वाल्या आशिकाची नाही तर रुक्ष जमिनीवर पावसाचा शिडकावा व्हावा तसं प्रेम मिळालेल्या, प्रेमाची पूजा करणाऱ्या प्रियकराची आहे प्रेयसीची आहे.

यामध्ये हरिहरन यांनी केलेला ‘आहिस्ता’ या शब्दाचा उच्चार हा त्याचा सही अर्थ आपल्या पर्यंत पोहोचवतो. आहिस्ता नंतर गिटारच्या स्वरावरील आंदोलन त्या ‘आहिस्ता’ ला थेट आपल्या हृदयातल्या फूलाशी जोडून देतो.

मैंने माना तू मसीहा है, शिफ़ा बाँटेगा...
मेरे जख्मों को मगर हाथ लगा आहिस्ता..........

मला समजलंय, तू तारणकर्ता आहेस, देवदूत आहेस आणि सर्वांचे दुःख दूर करशील तुझ्या स्पर्शाने सगळ्यांच्या वेदना दूर होतील. तशाच तू माझ्याही वेदना दूर करशील; पण तरीही, ... माझ्या जखमांना हळुवारपणे हात लाव. त्या अतिकोमल आहेत. पर्यायाने माझ्या भावना अतिकोमल आहेत! तुला खूप काळजी घ्यावी लागेल.

या शेरामधला ‘शिफ़ा’ हा शब्द खूप सुरेख आहे. शिफ़ा म्हणजे उपचार नाही, तर बरे झालेल्या अवस्थेचे नाव आहे. साधारण वैदू काय, औषध देऊ शकतो; पण जर देवदूतच अवतरला तर तो उपचार थोडेच करत बसणार आहे तो थेट बरेच करून टाकणार. तू तशीच माझ्या जीवनात आलेली आहेस, माझ्या सर्व जखमावर तूच इलाज आहेस याची मला खात्री आहे पण तरी त्यांना हळुवारपणे स्पर्श कर........... ओरखडा राहणार नाही याची काळजी घे. मी खूप हळवा आहे.

आजकी शब मैं परेशां हूँ, बहोत तनहा हूँ...
ऐ सबा उसकी कोई, बात सुना आहिस्ता.............

आजच्या रात्री मी खूप उदास आहे, एकटा आहे. तू नाहीस सोबत. मग काय, मी सकाळच्या हवेला विनंती करतो उजाडल्या बरोबर तिची एखादी आठवण, बातमी तुझ्यासोबत घेऊन ये.

दिवस बदलेले आहेत. तू आणि मी सोबत नाही, पण तुझ्या आठवणी मला व्याकूळ करतात. तू दिसतेस कधी ऑनलाईन, कधी फेसबुक वर. पण आपण जास्त बोलत नाही.... बंधने अनेक आहेत; नीतीची, समाजाची, व्यवस्थेची. कदाचित वचनबद्धतेची सुद्धा. पण तुझी खबरबात, एखादा कटाक्ष मला पुरेसा आहे. तो मिळेल कोठून...?

या शेरामधील ‘मैं परीशां’ आणि ‘तनहा’ ची फेक लाजवाब आहे. जरी मी एकटा आणि उदास असलो तरी निराश मात्र नक्कीच नाही कारण मला तुझी काही ना काही खबर मिळेल हा आशावाद चालीमधून व्यक्त होतो. तो ऐकणाऱ्याने अनुभवल्याशिवाय कळणार नाही.

तीरगी है मेरी किस्मत तो बुझा दे आँखे...
छोड़ना है तो मुझे छोड़के जा आहिस्ता...........

माझ्या नशीबात जर अंधारच असेल तर मला डोळ्यांची गरज ती काय? तू जर माझ्या कडे पुन्हा कधीच येणार नसशील तर खोटी आशा कशाला? जर मला तू सोडणार असशील तर खुशाल सोडून जा. पण कशी जाशील? ‘आहिस्ता’ म्हणजेच हळुवारपणे.

आता मला स्पष्ट झालेले आहे की तू माझी होऊ शकत नाही. पण दोघेही वेडे आहोत. माझी तुझ्याबद्दलची ओढ कमी होत नाही. हा खेळ किती दिवस खेळणार आपण? प्रेम करणारे पुन्हा मित्र कधीच बनू शकत नाहीत. ते प्रेमीच राहतात. मग हा आभास कशासाठी....? म्हणून निर्वाणीचं सांगतो, आपण एक होत नसू तर मला तू सोडून जा............

प्रत्येक शेर आधीच्या शेरा पेक्षा जास्त तीव्र होत जातो, गहिरा होतो आणि आपल्याला पण सामावून घेत राहतो. शेवटच्या शेरात त्याचा कळस झाला आहे. वास्तवाची जाणीव झाली आहे आणि ‘आहिस्ता’ हा काफ़िया संपूर्ण गझलेला एकजिनसी बनवतो.

हरिहरन यांनी खूप सयंत पणे ही गझल गायली आहे. कुठेही आलाप, ताना, किंवा चमत्कृती नाही. प्रभावी शब्दयोजना आणि समर्पक अर्थानुरूप चाल ही या गझलेची बलस्थाने आहेत. ही रचना ऐकताना जर दोन महत्वाच्या शब्दांमधील जे अंतर आहे त्या अवकाशाकडे जर पाहता आले तर ही गझल ऐकण्याचा आनंद द्विगुणीत होईल हे नक्की. हरिहरन यांनी ही गझल गाताना स्वतःचा खराखुरा आवाज लावला आहे. बऱ्याचदा ते अतिगोड आवाज काढून गातात.

एखाद्या सायंकाळी, कातरवेळी चहा-कॉफीचा मग भरून घ्या, बैठकीतून सगळ्यांना हाकलून बाहेर घालवा, हेडफोन्स किंवा उत्तम म्युजिक सिस्टीम वर लूप मध्ये ही गझल लावा. खिडकीतून सुर्यास्त पाहताना ही रचना अनुभवा.

Group content visibility: 
Use group defaults

हरिहरन यांनी ही गझल गाताना स्वतःचा खराखुरा आवाज लावला आहे. बऱ्याचदा ते अतिगोड आवाज काढून गातात.++++++100

छान लिहिले आहे ☺️

धन्यवाद

आपल्या नावात हरिहरन आहे हे वाचून थोडा दचकलो आहे.

हरिहरनच्या गजला थोड्याच ऐकल्या आहेत. या गजलेची ओळख करून दिल्याबद्दल धन्यवाद. खरंच ते आहिस्ता खुपच कोमलपणे म्हणतात. हरिहरन टच!

मला या धाग्याचे शीर्षक वाचून सारखे और क्या अहद ए वफा होते है हे सुरेश वाडकरचं सनी मधलं गाणं आठवतय.
ऐकायला हवी ही गजल.

सर्वांचे आभार,
सुनील लिंक दिल्याबद्दल विशेष आभार.
लेखात लिंक देतं येत नव्हती म्हणून प्रतिसादात देत होतो पण तिथेही दिसत नाही.
तुम्ही एकदम सोप्या पद्धतीने दिली.