स्वच्छंदी

बहुधा

Submitted by महेश मोरे स्वच्छंदी on 19 December, 2022 - 22:18

उत्कटता शब्दांची संगत सोडत आहे बहुधा
नाते अपुल्या दोघांमधले बदलत आहे बहुधा

: mahesh more (स्वच्छंदी)

येणाऱ्या जाणाऱ्या रस्त्यावर घुटमळतो आहे
पाय तुझ्या गावाचा रस्ता शोधत आहे बहुधा

टप्प्यामध्ये आला तो तर कळेल त्याला विस्तव
तो माझ्या जगण्यास कोळसा समजत आहे बहुधा

एकेका शेराने उचकी वाढत आहे माझी
ती माझ्या गझलेचे पुस्तक वाचत आहे बहुधा

काल जिथे मी होतो पोहत तिथे आजही आहे
प्रवाहात मी उर्ध्व दिशेने पोहत आहे बहुधा

टिळा लावला पंगतीस अन् बोट सुगंधी झाले
कुणीतरी देहाचे चंदन झिजवत आहे बहुधा

शब्दखुणा: 

काट्यांचे गजरे केले

Submitted by महेश मोरे स्वच्छंदी on 24 June, 2022 - 12:29

14/14
काट्यांचे गजरे केले

हे वार फुलांनी अमुच्या पाठीत नेमके केले
टाळून फुले मग आम्ही काट्यांचे गजरे केले

तू पुन्हा भेटली अन् ह्या जखमेची खपली निघली
तू मीठ चोळले त्यावर... हे किती चांगले केले

दोघांस भेटले त्याची दोघांत वाटणी केली
ती सुखे घेउनी गेली, मी दुःख आपले केले

बाहुल्या नाचवत होता सत्तेच्या कळसुत्रीने
नियतीने क्षणात एका त्याचेच बाहुले केले

नशिबात दुःख आल्याने घुसमट झालेली त्याची
सांगून कुडीला मग मी आत्म्यास मोकळे केले

#स्वच्छंदी

शब्दखुणा: 

माणसातला माणुस जागा ठेवा

Submitted by महेश मोरे स्वच्छंदी on 14 June, 2022 - 09:32

माणसातला माणुस जागा ठेवा

तिच्या घराला चार झालरी लावा, तिच्या घराच्या खिडक्या उघड्या ठेवा
ओठ दाबुनी येइल ती भेटाया, यार! चेहरा माझा उघडा ठेवा

स्वभाव ज्याचा फार चांगला होता, आयुष्याने त्याची विट्टी केली
फार चांगले बनू नका राजेहो! बोट ठेवण्याइतकी जागा ठेवा

संकटात जो नक्की धावुन येतो खरेच त्याच्यावरती श्रद्धा ठेवा
दगड मांडुनी देव मानला आहे त्या देवाला सवा रुपाया ठेवा

दिशा योग्य आहे यत्नांची ज्याच्या, ज्याची झुंजायची तयारी आहे
काय फरक पायाचा पडतो त्याला...डावा ठेवा अथवा उजवा ठेवा

शब्दखुणा: 

गझल....

Submitted by महेश मोरे स्वच्छंदी on 7 June, 2022 - 12:59

जायचे होते तुला तर जायचे होतेस ना
- महेश मोरे (स्वच्छंदी)

दुःख होते द्यायचे तर द्यायचे होतेस ना
या निमित्ताने तरी तू यायचे होतेस ना

काळजाच्या आतमध्ये ठेवले होते तुला
तू मला चोरून तेथुन न्यायचे होतेस ना

पापण्यांनी पापण्यांशी बोलली असशील पण
एकदा ओठांसवे बोलायचे होतेस ना

पापण्यांतुन रोज ठिबकत राहिलो नसतोच मी
पापण्यांवर तू मला ठेवायचे होतेस ना

पावलांवर चार मी येऊन होतो थांबलो
एकतर पाऊल तू टाकायचे होतेस ना

शब्दखुणा: 

स्वतःस जाळत गेलो..... - महेश मोरे (स्वच्छंदी)

Submitted by महेश मोरे स्वच्छंदी on 7 May, 2022 - 07:05

कातरवेळी चुरगळलेली पाने वाचत गेलो
तिची आठवण काढत गेलो, स्वतःस जाळत गेलो

लाटांसोबत लढत राहिलो...जोवर सोबत होतो
तिला मिळाला काठ नदीचा अन् मी वाहत गेलो

गैरसमज झाला थोडा अन् दूर जशी ती झाली
दूर राहिलो....विरहामधली धग सांभाळत गेलो

लिहायच्या नसतातच गोष्टी सगळ्या गझलेमध्ये
म्हणून फुरसत मिळेल तेव्हा स्वतःस सांगत गेलो

खोटे बोलत गेले ते ते खूप दूरवर गेले
अन् मी होतो तिथे राहिलो..खरेच बोलत गेलो

शब्दखुणा: 

वाद होता पेरला दोघात मित्रांनी

Submitted by महेश मोरे स्वच्छंदी on 3 May, 2022 - 03:15

घेतली जाणून माझी जात मित्रांनी
काढली नंतर उभ्या चौकात मित्रांनी

चल गळा कापू म्हणाले दुश्मनाचा अन्
कापला माझाच अंधारात मित्रांनी

फक्त इतक्यानेच सौख्याचे धनी झाले
दोन अश्रू ढाळले दुःखात मित्रांनी

यार ! दगडाच्या तळाशी ठेवला माझा
काढला अपुला खुबीने हात मित्रांनी

नेमका आला समोरच भोवरा माझ्या
अन् मला सोडुन दिले पाण्यात मित्रांनी

दुश्मनांनी शर्थ केली ना तरी मिटला
वाद होता पेरला दोघात मित्रांनी

©® - महेश मोरे (स्वच्छंदी)

शब्दखुणा: 

गझल - तोवर माझे शब्द संपले होते

Submitted by महेश मोरे स्वच्छंदी on 10 April, 2022 - 11:49

तोवर माझे शब्द संपले होते
- महेश मोरे (स्वच्छंदी)

ज्या रस्त्याने दुःख चालले होते
घर माझे मी तिथे बांधले होते

मी काट्याला बोट लावले नाही
या बोटाला फूल टोचले होते

तुला मजेने म्हणून गेलो "वेडी"
वेड मला तर तुझे लागले होते

या हृदयाने फितुरी केली कारण
या डोळ्यांनी तुला पाहिले होते

गुलाब चुंबुन फसली आहे रे ती
त्याहुन माझे ओठ चांगले होते

सुखे राहिली म्हणून शाबुत माझी
सुखाभोवती दुःख पेरले होते

हसता हसता पुसून गेली डोळे
हसून मीही दुःख सोसले होते

शब्दखुणा: 

खरे बोलता आले नाही...स्वच्छंदी

Submitted by महेश मोरे स्वच्छंदी on 25 April, 2021 - 10:20

खरे बोलता आले नाही
©® - महेश मोरे (स्वच्छंदी), सातारा

नाव तुझे ओठांवर होते तरी सांगता आले नाही
असून इच्छा मला जगाशी खरे बोलता आले नाही

आठवणींतच जेव्हा केव्हा श्वास संपले, मिटले डोळे
उरात उरले शल्य हेच की तुला पाहता आले नाही

प्रेमावरचे धडे घ्यावया लाख पुस्तके वाचत गेलो
नशीब माझे असे कडू की तुला चाळता आले नाही

शब्द दिलेला तुला म्हणूनच जमेल तितकी कोशिश केली
बघता बघता मला विसरलो, तुला विसरता आले नाही

दोघांमध्ये जे होते ते मनात होते मनी राहिले
मला सांगता आले नाही..तुला जाणता आले नाही

शब्दखुणा: 

गझल...चेहऱ्यावर मुखवटे ठेवा

Submitted by महेश मोरे स्वच्छंदी on 23 March, 2021 - 12:05

चेहऱ्यावर मुखवटे ठेवा
©® स्वच्छंदी

शक्य तितके हासरे ठेवा
चेहऱ्यावर मुखवटे ठेवा

फार मित्रांची नको गर्दी
चार ठेवा... चांगले ठेवा

पेटवा आम्हां बिचाऱ्यांची
आपली शाबुत घरे ठेवा

आत काटे राहुद्या बेशक
वर सुगंधी मोगरे ठेवा

गंध नाही ज्यांस जगण्याचा
पुस्तकातच ते धडे ठेवा

प्रेम प्रेमासारखे राहिल
स्वप्न स्वप्नासारखे ठेवा

ही गझल होइल मुकर्रर बस्
दुःख शब्दांच्या पुढे ठेवा

शब्दखुणा: 

हक्क सांगू....

Submitted by महेश मोरे स्वच्छंदी on 28 February, 2021 - 00:31

हक्क सांगू..............

पावसावर हक्क सांगू की ढगावर हक्क सांगू ?
की उन्हाने जाळलेल्या वावरावर हक्क सांगू ?

ती मला बस् दे म्हणाली आणि मी देऊन बसलो
मी कसा आता स्वतःच्या काळजावर हक्क सांगू ?

पाहिजे आहेत तितके मोगरे आहेत भवती
मी कशाला रातराणीच्या फुलावर हक्क सांगू ?

धर्म, जाती, पंथ, भाषा यातल्या मिटवू दऱ्या अन्
शक्य झाले तर नव्याने माणसावर हक्क सांगू

लागली शर्यत कधी तर प्रश्न पडतो एक हा की
कासवावर हक्क सांगू की सशावर हक्क सांगू ?

शब्दखुणा: 

Pages

Subscribe to RSS - स्वच्छंदी