गझल

बाकी अजून होते कित्येक श्वास माझे (गझल)

Submitted by गणक on 18 April, 2021 - 05:17

मी पहिल्यांदा एखादी गजल वृत्तात लिहिण्याचा प्रयत्न केला आहे. काही चुका असल्यास नक्की सांगा.
वृत्त : आनंद ( गा गा ल गा ल गा गा )

बाकी अजून होते कित्येक श्वास माझे !

वाऱ्यात दरवळू द्या आता सुवास माझे
ठेवून जात आहे खोटे सुहास माझे !

गावून गीत माझे शाबासकी तुम्हाला
माझेच ओठ बोले गाणे उदास माझे !

मांडून स्तूत खोटे "चेले" उदंड जगली
घटवून घेतले मी आयुष्य "मास" माझे !

वैऱ्यास ठार केले वाटे कुणी न बाकी
त्यांनीच घात केला जे आसपास माझे !

आशेत आदराच्या शाई लयास गेली
दरसाल फक्त झाले काव्य झकास माझे !

गझल...चेहऱ्यावर मुखवटे ठेवा

Submitted by 'स्वच्छंदी on 23 March, 2021 - 12:05

चेहऱ्यावर मुखवटे ठेवा
©® स्वच्छंदी

शक्य तितके हासरे ठेवा
चेहऱ्यावर मुखवटे ठेवा

फार मित्रांची नको गर्दी
चार ठेवा... चांगले ठेवा

पेटवा आम्हां बिचाऱ्यांची
आपली शाबुत घरे ठेवा

आत काटे राहुद्या बेशक
वर सुगंधी मोगरे ठेवा

गंध नाही ज्यांस जगण्याचा
पुस्तकातच ते धडे ठेवा

प्रेम प्रेमासारखे राहिल
स्वप्न स्वप्नासारखे ठेवा

ही गझल होइल मुकर्रर बस्
दुःख शब्दांच्या पुढे ठेवा

शब्दखुणा: 

हक्क सांगू....

Submitted by 'स्वच्छंदी on 28 February, 2021 - 00:31

हक्क सांगू..............

पावसावर हक्क सांगू की ढगावर हक्क सांगू ?
की उन्हाने जाळलेल्या वावरावर हक्क सांगू ?

ती मला बस् दे म्हणाली आणि मी देऊन बसलो
मी कसा आता स्वतःच्या काळजावर हक्क सांगू ?

पाहिजे आहेत तितके मोगरे आहेत भवती
मी कशाला रातराणीच्या फुलावर हक्क सांगू ?

धर्म, जाती, पंथ, भाषा यातल्या मिटवू दऱ्या अन्
शक्य झाले तर नव्याने माणसावर हक्क सांगू

लागली शर्यत कधी तर प्रश्न पडतो एक हा की
कासवावर हक्क सांगू की सशावर हक्क सांगू ?

शब्दखुणा: 

आत्मनिर्भर

Submitted by कुमार जावडेकर on 3 February, 2021 - 14:01

मार्ग खडतर, लक्ष्य दुर्धर होत गेले
आणि अंतर आत्मनिर्भर होत गेले

शब्द जितके आत्मनिर्भर होत गेले...
अर्थ सारे अस्थिपंजर होत गेले

सुख जगू शकलेच नाही त्या ठिकाणी...
दुःखसुद्धा फक्त जर्जर होत गेले

बांधण्यासाठी नवे सेतू फुकाचे
माणसांचे स्वस्त पत्थर होत गेले

चालणे नशिबात होते का म्हणू मी...
राहण्यासाठी कुठे घर होत गेले?

प्रश्न पुसणे बंद केले मी कधीचे
मौनही माझे निरुत्तर होत गेले

- कुमार जावडेकर

माणसे

Submitted by कुमार जावडेकर on 18 January, 2021 - 13:33

येत होती, जात होती माणसे
गीत अपुले गात होती माणसे!

साथ होती माणसांच्या माणसे
माणसांचे हात होती माणसे...

आज झाली जीवनाची सोबती
काल जी अज्ञात होती माणसे

माणसांचे पीक येथे काढती
येथुनी निर्यात होती माणसे!

हसत त्यांनी सहज अश्रू लपवले...
केवढी निष्णात होती माणसे!

भासली होती विजेचा लोळ ती -
पेटलेली सात होती माणसे!

का घरे मी दुश्मनांची जाळली?
त्या घरांच्या आत होती माणसे....

- कुमार जावडेकर

वाचू शकला नाही...........

Submitted by 'स्वच्छंदी on 10 January, 2021 - 01:00

वाचू शकला नाही...........

तोच मोडला ऐन क्षणी जो वाकू शकला नाही
वादळामधे माड बिचारा वाचू शकला नाही

पडला, रडला, धडपडला तो धावत गेला पुढती
मायेमध्ये गुरफटला तो चालू शकला नाही

बस पहिल्या ओळीने डोळे इतके ओले झाले
ओळ एकही त्यानंतर तो वाचू शकला नाही

दोष उन्हाला देण्याआधी इतके ध्यानी ठेवा
सावलीत जो जो जगला तो वाढू शकला नाही

पतंगास तो माझ्या आता थिल्लर म्हणतो आहे
जो मांज्याने माझा मांजा कापू शकला नाही

एक भिकारी ऐकत बसला माझी कर्मकहाणी
जे मागाया आला होता...मागू शकला नाही

शब्दखुणा: 

भेट देऊ नको गुलाबाची

Submitted by 'स्वच्छंदी on 29 December, 2020 - 03:34

बोचते सल उरास काट्याची
भेट देऊ नको गुलाबाची

आठवण हुंदक्यांसवे येते
खासियत रोजच्या सरावाची

आज गेलो ठरून मी वेडा
आणि चर्चा तुझ्याच नावाची

छिद्र होते जुनेच नावेला
चूक नव्हती तुझ्या किनाऱ्याची

तू हवी तेवढी सुखे घे पण
वेदना आमच्याच वाट्याची

"आतल्यां"च्या जिवावरी जगतो
केवढी ही मिजास देहाची

©® - महेश मोरे (स्वच्छंदी)
9579081342

शब्दखुणा: 

मातीमध्ये हात घालतो त्याला कळते

Submitted by 'स्वच्छंदी on 2 November, 2020 - 06:20

मातीमध्ये हात घालतो त्याला कळते

मातीमध्ये हात घालतो त्याला कळते
मातीची सल केवळ शेतकऱ्याला कळते

प्रेमामध्ये पडतो अन् जो जळून जातो
प्रीत खरी त्या वातीच्या धाग्याला कळते

जगणाऱ्याला अशीतशी ती कोठे कळते ?
जगण्याची किंमत तर मरणाऱ्याला कळते

मोठा नाही घाव गड्या बघणारा म्हणतो
किती टोचते हे त्या लढणाऱ्याला कळते

दिशा एकही राहत नाही हातामध्ये
तेव्हा कोठे वादळ नावाड्याला कळते

©®_ महेश मोरे (स्वच्छंदी), सातारा
9579081342

शब्दखुणा: 

धडधड.....

Submitted by 'स्वच्छंदी on 26 October, 2020 - 12:07

धडधड....
- महेश मोरे (स्वच्छंदी)

सांगुनी हलकेच काही जायची धडधड
बस् नजर भेटायची अन् व्हायची धडधड

एवढा अभ्यास होता मी तुझा केला
फक्त स्पर्शातूनही समजायची धडधड

जवळ तू असलीस की सगळेच नॉर्मल अन्
दूर तू गेलीस की थांबायची धडधड

जाणुनी जर घ्यायची आई असेलच तर
एकदा केवळ तिची ऐकायची धडधड

ध्यास इतका घेतला होता तिचा मी की
फक्त आठवली तरी वाढायची धडधड

नाव सहजच घ्यायची माझे सखी तिकडे
आणि इकडे नेमकी वाढायची धडधड

Pages

Subscribe to RSS - गझल