गझल

नाइलाज

Submitted by जो_एस on 24 November, 2014 - 03:37

प्रार्थना तुला जुनीच खास ना नवीन आज
हात हे सदा रितेच साथ फक्त नाइलाज

वागताच वेगळे ठरेल ते जगात वेड
बंधने नकोच ती असेल वेगळाच बाज

बोललो न मी तसे न वागलो तसा कधीच
का तुलाच वाटते मला असा असेल माज

सर्व तर्क व्यर्थ येथ, स्वार्थ साध हाच मंत्र
तापल्या तव्यावरी मिळेल ते खुशाल भाज

झेलण्या कुतर्क सर्व हो तयार तू सुधीर
सोड व्यर्थ तर्क लाज हा स्वतःस अर्क पाज

सुधीर जोशी

शब्दखुणा: 

वाटेल तेवढा त्रास दे...

Submitted by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे on 23 November, 2014 - 11:03

नमस्कार मंडळी, मायबोलीवरच्या थोरामोठ्यांच्या गझला नावाच्या रचना वाचून पहिली वाहिली रचना गद्य , पद्य का गझल कै माहिती नाही, सुचलं ते लिहिलं. दुरुस्त्या सुचवाव्यात.

वाटेल तेवढा त्रास दे,
पण मला भारी किस* दे.

तुला रागावतो कितीही मी
गालावर फिरवते ते मोरपीस दे,

गझल पाडतो चिडू नको
खर्च करायला पोरांची फीस दे,

आयुष्यात चांगल्या खुप आल्या
पण रक्त आटवायला एक खवीस दे,

विठ्ठला, मागत नाही त्रासाशिवाय
पण जाता जाता भारी किस दे.,

शब्दखुणा: 

देवपण

Submitted by समीर चव्हाण on 21 November, 2014 - 06:43

इसम एक मोठा जगाला
निकालात काढाल त्याला

नका दाखवू स्वप्न कोणी
निजू द्याल थकल्या जिवाला

विचारांविना काय अमुचे
कुठे अर्थ ह्या भटकण्याला

बरोबर असे काय असते
पकडला जसा जो मिळाला

असूद्या मला दगड-धोंडा
नको देवपण पामराला

समीर चव्हाण

शब्दखुणा: 

आनंदी आयुष्याची एखादी ओळ..

Submitted by श्रीगणेशा on 9 November, 2014 - 09:06

आनंदी आयुष्याची एखादी ओळ लिहावी..
जी दुःखाच्या मंचावरती आधारास पुरावी..!!

इतक्या वेळा तुटलो की उठताही आले नाही..
या तूट-फुटींची सांगा,कोणी भरपाई द्यावी..??

आयुष्याचे अवघे जगणे नितळ करावे म्हणतो..
फक्त जरा श्वासांची तुरटी देवा पुरुन उरावी..!!

आभाळाचा हेवा अन धरतीशी वैर नसावे..
जाणुन मोठेपण इतरांचे आपण लवती घ्यावी..!!

शेतामधल्या मातीला घामाचे देता अत्तर..
गात्रे अन गात्रे पीकांची गंधाळून निघावी..!!

-गणेश शिंदे,दुसरबिडकर..

सावलीच अन्ध आहे

Submitted by भक्तिप्रणव on 3 November, 2014 - 05:04

दिसतो प्रकाश ज्याचा वात त्याचीच मंद आहे
जाळ्यात तिमिराच्या आज सावलीच अंध आहे

शिवतो कुणी उसासुन लक्तरे नग्न जगाची
गार वार्या त गारठणारे उघडे त्याचेच अंग आहे

शमता शमेना हाव ही कुबेर भणंग होतो
चित्रगुप्ताला देउन लाच जो तो उधळीत रंग आहे

भावनांच्या तप्त कल्लोळात पडते आहुती मनाची
थमल्यावर ढोल तुतार्या केवळ प्रतिमाच वंद्य आहे

जवानी आजची ही राख उद्याची आहे
शोधण्यात अर्थ सुखाचा जिंदगी दंग आहे

नाही भीत कुणाला, का बाळगु शरम मनाची
भाडात गेली दुनिया सांगणारा दबंग आहे

देउन दोष विधात्याला लपवी पाप स्वतःचे
नियतीला आव्हान द्यायची नियतच सवंग आहे

संदीप मोघे

शब्दखुणा: 

तू येण्याच्या आधी काही तू गेल्याच्या नंतर..

Submitted by श्रीगणेशा on 17 October, 2014 - 10:05

तू येण्याच्या आधी काही तू गेल्याच्या नंतर..
सखये मी मग मोजत बसतो दोघांमधले अंतर..!!

सोपे नसते.कळले..!आयुष्याचे चंदन होणे..
वेढा घालुन बसलेला प्रश्नांचा नाग निरंतर..!!

येता-जाता 'तो' डोकावत असतो विहिरीपाशी..
'भरल्या' विहिरीतुन नक्की जगण्याचा मिळतो मंतर..!!

सारवलेली मायेने स्वप्ने शेणा-मातीची..
फरशीवर त्यांना 'पुसण्या'वाचुन नाही गत्यंतर..!!

कृष्णाला पाहुन त्या पुतनेलाही फुटला पान्हा..
मग का आजमितीच्या कैक यशोदांचे स्थित्यंतर..??

-गणेश शिंदे..
दुसरबिड,बुलडाणा...

नदीला सागराची ओढ असली तर असू द्या ना

Submitted by मिल्या on 25 September, 2014 - 04:09

नदीला सागराची ओढ असली तर असू द्या ना
मला तुमच्यामधे थोडा तरी सागर दिसू द्या ना

नका सांगू मला प्रेमात पडण्याचे नफे तोटे
तुम्ही फसलात ना! आता मलासुद्धा फसू द्या ना

जरासे मौन धरले तर तमाशा केवढा करता
मला माझ्याच सान्निध्यात घटकाभर बसू द्या ना

तगादा आत्महत्येचा कशाला लावता मागे?
गिधाडांनो मला जमिनीस तर आधी कसू द्या ना

किती ढाळाल नक्राश्रू, व्यथांना पाहुनी माझ्या
किती मी सांत्वने सोसू, मला थोडे हसू द्या ना

मला ही जिंदगी तर एक सोडा बाटली वाटे
सुखे मिळतील, आधी दु:ख सारे फसफसू द्या ना

विषय: 

कयास

Submitted by समीर चव्हाण on 20 September, 2014 - 02:14

छान हा प्रवास चालला
आंधळा कयास चालला

चालले कुठे कधी कुणी
एक-एक श्वास चालला

दशक लोटले मरून मी
वेंधळा तपास चालला

रात्र कसबशीच काढली
दिवसही उदास चालला

काय विचकटून चालले
ताडकन् घरास चालला

मारतोय हात पाय पण
जन्म हा तळास चालला

जन्मभर ‘समीर’ हा तसा
फक्त चालण्यास चालला

समीर चव्हाण

शब्दखुणा: 

हकनाक वेदनांचा येथे जमाव बसतो..

Submitted by श्रीगणेशा on 7 September, 2014 - 08:26

पाऊसलेखणीने जमिनीत काव्य कसतो..
कवितेत जिंदगीच्या तो एकरूप दिसतो..!!

म्हणतात कैक आधी जोडी खिलार होती..
आता खुटा रिकामा दारी उदास हसतो..!!

सत्कार सोहळ्याला ज्याच्याकडून शाली..
बांधावरी बिचारा तो बोडखाच असतो..!!

नुसताच आसवांचा अंदाज बांधल्याने,
रोपास भावनेच्या बघ कोंब येत नसतो..!!

इतक्या सुरेल ताना घेऊ नकोस दुःखा..
हकनाक वेदनांचा येथे जमाव बसतो..!!

-गणेश शिंदे,दुसरबिडकर..
९९७५७६७५३७

कडूशार

Submitted by समीर चव्हाण on 8 August, 2014 - 00:12

जगण्याची चव जात राहिली
जी तुझिया पश्चात राहिली

बोलाया बोलतो कसनुसे
की इच्छा गेल्यात राहिली

कडूशारशी सय एखादी
गोड स्मृतींच्या आत राहिली

तरंग उठले, तरंग विरले
धाकधुकी डोहात राहिली

तिच्या पुढे-मागे दुनिया पण
ती कोठे कोणात राहिली

वीतभराच्या घरात वारा
आस जशी डोळ्यांत राहिली

मिणमिणणे खुपले कायमचे
झळाळी न लक्षात राहिली

समीर चव्हाण

शब्दखुणा: 

Pages

Subscribe to RSS - गझल