बाकी अजून होते कित्येक श्वास माझे (गझल)

Submitted by गणक on 18 April, 2021 - 05:17

मी पहिल्यांदा एखादी गजल वृत्तात लिहिण्याचा प्रयत्न केला आहे. काही चुका असल्यास नक्की सांगा.
वृत्त : आनंद ( गा गा ल गा ल गा गा )

बाकी अजून होते कित्येक श्वास माझे !

वाऱ्यात दरवळू द्या आता सुवास माझे
ठेवून जात आहे खोटे सुहास माझे !

गावून गीत माझे शाबासकी तुम्हाला
माझेच ओठ बोले गाणे उदास माझे !

मांडून स्तूत खोटे "चेले" उदंड जगली
घटवून घेतले मी आयुष्य "मास" माझे !

वैऱ्यास ठार केले वाटे कुणी न बाकी
त्यांनीच घात केला जे आसपास माझे !

आशेत आदराच्या शाई लयास गेली
दरसाल फक्त झाले काव्य झकास माझे !

ठोकून कैक टाळ्या हे हात लाल झाले
ते रक्त शोषणारे नेतेच डास माझे !

शोधे मला जगी या "मी" माणसात नाही
धर आरसा मुखाशी होतील भास माझे !

माझ्या कठीण वेळी ते डावलून गेले
ज्यांच्या मुखात होते नाव हमखास माझे !

बेरोजगार लोंढे त्यांच्या वरी न बोले
हे ही सवाल त्यांना वाटे भकास माझे !

शेतात काल "राजे" ठेवून प्राण गेले
घेवू तरी कसे मी तोंडात घास माझे !

तोडून बंध सारे यमराज आज गेला
झाले अशा तर्‍हेने घर सूखवास माझे !

केलीत वाहवा पण नाही अजून झाले
बोलायचे विसरलो जे शेर खास माझे !

घाईच का तुम्हाला देहास जाळण्याची
बाकी अजून होते कित्येक श्वास माझे !

-- अविनाश उबाळे

Group content visibility: 
Use group defaults

वाह! सुंदर झालिये..काही शेर खास आवडले-

शोधे मला जगी या "मी" माणसात नाही
धर आरसा मुखाशी होतील भास माझे !> धर आरसा मुखाशी खूप मस्त!

शेतात काल "राजे" ठेवून प्राण गेले
घेवू तरी कसे मी तोंडात घास माझे !> वाह वाह वाह!!!

माझ्या कठीण वेळी ते डावलून गेले?
ज्यांच्या मुखात होते नाव हमखास माझे ! >> इथे काही घोळ झाला आहे का

झकास

धन्यवाद बन्या.
धन्यवाद अजिंक्यराव पाटील

टिरीअन लॕनिस्टर जी प्रतिसादाबद्ल आभार.
काही लोक नेहमी एखाद्याचा उदो उदो करतात पण त्याला गरज पडते तेव्हा अनोळखी सारखे वागतात या अर्थाने तो शेर लिहिला आहे !

वा क्या बात है! मस्तच.

माझेच ओठ बोले >> इथे थोडी गडबड आहे. माझे ओठ म्हणजे अनेकवचन आहे, तिथे क्रियापद 'बोलती' असं होईल. ह्यापेक्षा एकवचनी केलेत तर अर्थ आणि वृत्त, दोन्ही अबाधित राहील - माझाच ओठ बोले

माझ्या कठीण वेळी ते डावलून गेले?
ज्यांच्या मुखात होते नाव हमखास माझे ! >> इथे काही घोळ झाला आहे का<<<

होय

ज्यांच्या मुखात होते नाव हमखास माझे >> ज्यांच्या मुखात होते हमखास नाव माझे , असं केल्यावर बसतंय मीटरमध्ये

ज्यांच्या मुखात होते नाव हमखास माझे >> ज्यांच्या मुखात होते हमखास नाव माझे , असं केल्यावर बसतंय मीटरमध्ये<<<

हो, पण ते या गझलेच्या जमिनीत बसत नाही

हरचंद पालव
हिरा
बेफिकीर
प्रतिसादाबद्ल खूप मनापासून धन्यवाद !
आपण दिलेल्या सुचनांचे पालन मी नक्कीच करेल.
खरे तर या सूचना माझ्यासाठी मार्गदर्शक आहेत.

माझेच ओठ बोले गाणे उदास >> माझेच ओठ गाती गाणे उदास माझे चालेल का ? गाणी गायची, म्हणायची, गुणगुणायची असतात. बोलायची नसतात बहुतेक

का नाही चालणार?>

आनंदकंद : गा गा ल गा ल गा गा

नाव हमखास माझे> गा "गा" ल गा ल गा गा- इथे दुसरा गुरू 'नाव' शब्दामुळे चुकलाय...

हमखास नाव माझे- वृत्तात बसतंय पण <"आ"स माझे> हा रदीफ आहे...'नाव माझे' शेवटी लावले तर रदीफ बदलतो...

हे माझे मत. बाकी जाणकार सांगतीलच.

अच्छा! धन्यवाद माउ. मला गझलेतलं फारसं कळत नाही. आता रदीफ म्हणजे काय ते वाचून बघतो.