कळलेच नाही

Submitted by श्रीराम_देशपांडे on 24 May, 2025 - 07:46

कुणाशीही कधी जमलेच नाही
मला माझे कुणी दिसलेच नाही

तिच्या रागातही आधार होता
मनाला हे कधी कळलेच नाही

मला धार्मिक साहित्यात कोठे
सुखाचे सूत्र सापडलेच नाही

कळत होते मला सारे परंतु
कधी वेळेवरी वळलेच नाही

कधी ते लोभ-निद्रेतील स्वप्न
मला जागेपणी पडलेच नाही

खरेदीदार तर होते परंतु.....
स्वतःला मी कधी विकलेच नाही

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults