आभाळ आणि अंगण

आभाळ आणि अंगण

Submitted by दाद on 13 October, 2013 - 23:57

गर्जुन कधी तडकुन-बिडकुन चालून येतं आभाळ
अनावरून अंगणात मग बरसुन जातं आभाळ
भरून आलं खूप की अन मनात येईल तेव्हा
भुळूभुळू गळत मुळूमुळू होतं आभाळ....

थेंब न थेंब झेलत तेव्हा भिजत रहातं अंगण
शांतपणे आभाळाचं ऐकुन घेतं अंगण
धारा झेलित पागोळ्यांनी वाहून जाता जाता
कोसळत्या आभाळासाठी खांदा होतं अंगण

थोपटून परत पाठवतं अंगण सावरलेलं आभाळ
अंगण मिठीत घेऊ कधी पहातं मग आभाळ
आभाळाच्या कवेत येईल असलं नसतं अंगण
आभाळ निव्वळ भाळ अस्तं... जमीन असतं अंगण

-- शलाका

Subscribe to RSS - आभाळ आणि अंगण