रानाची पापणी गढूळली

Submitted by दत्तात्रय साळुंके on 20 October, 2022 - 10:34

धो धो पावसात रान
तग धरुन उभं ठाकलं
पीकाला म्हणालं भिऊ नको
पडू देणार नाय एकलं

पीकही घट्ट बिलगलं रानाला
पण तिरीमिरीत एखाद्याला
विनाकारण ठोकावं अगदी तसच
ढगानं झोड झोड झोडलं रानाला

एरवी ढग सबागतीनं
रानाची विचारपूस करायचे
हळुवार सोसेल तेवढंच
पाणी बरसायचे

जेव्हा वाहला झाड झाडोरा
रानाचा पाय झाला कापरा
रान बिलगले तालिला
पण निसटला दरडीचा कोपरा

रानही पुरात गेलं वाहत
त्याचं काहीच नव्हत चालत
याद फाटक्या धन्याची आली
टचकन रानाची पापणी गढूळली

आता रानात सारं मृतवत
आभाळही लख्ख निवळलयं
कसं काय डोकं फिरलं म्हणत
ढगही पुरतं पछतावलयं

© दत्तात्रय साळुंके

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

निकु.... खूप धन्यवाद
सबागतीनं म्हणजे हळुवार, गोडीगुलाबीने
ताल...उतारावर शेताची पावसाच्या पाण्याने धूप होऊ नये म्हणून गुडघ्या एवढ्या उंचीचा मातीचा बंधारा...याचा दुहेरी फायदा होतो. पावसाचे पाणी जमिनीत मुरते आणि ओल टिकते. जास्तीच्या पाण्याने ताल फुटू नये म्हणून कोप-यावर चर खणतात त्याला सांडवा म्हणतात .

पिकाला म्हणालं भिऊ नको
पडू देणार नाय एकलं >> वाह!!! क्या बात. हे माती आणि पिकाचे अबोल आणि घट्ट नाते ज्याला कळते तो खरा शेतकरी. बाकी पिकवणारे बरेच असतात...

पाऊसामुळे सध्या शेतकर्यांची जी दुरवस्था झालेली आहे त्याचं प्रतिबिंब उमटले आहे कवितेत. खुप खुप भिडली कविता.

आमच्याकडे दगडाची ताल असते.

सुंदर कविता...
कवितेचे शीर्षक आवडले.

आबा...
खूप धन्यवाद...
>>>आमच्याकडे दगडाची ताल असते.>>>
आमच्याकडे बहुदा मातीची असते...
जर वरच्या शेतातून एखादा प्रवाह येत असेल आणि त्यामुळे मध्ये खोलगट भाग असेल आणि पुढचं शेत अजून खालच्या उंचीवर असेल तर सांडवा मध्ये असतो त्यामुळे तिथे माती रहात नाही अशा ठिकाणी दगड रचतात ‌‌‌‌.

.

कुमार सर तुमचं मस्त झालीय वो खूप काही सांगून गेलं.
खूप धन्यवाद...
Barcelona तुमचेही खूप आभार...
खरंच माती आणि पीकांचे अबोल घटृ नातं बरोबर ओळखलंत...
माती पीकाची आई असते ती त्याचं भरणपोषण करते आणि वेळप्रसंगी जीवही देते अशीच कल्पना केलीय.

मॅगी... खूप धन्यवाद....
>>>>क्या बात है! बर्‍याच दिवसांनी इथे आले त्याचं सार्थक झालं.>>>
माझी कविता धन्य झाली....

रुपाली विशे-पाटील...
कविता आणि शीर्षकही आवडले. ... खूप धन्यवाद

अवल
भरत
मानव पृथ्वीवर
हरचंद पालव
साद
अनेकानेक धन्यवाद....

तुमचे प्रतिसादही कविता चांगली झालीय यावर शिक्कामोर्तब करुन गेले.

विनोद
सामो
लंपन
खूप खूप धन्यवाद....

आवडली तरी कशी म्हणावी? कारण मांडणी सुंदर आहे, पण जीवापाड मेहेनत करुनही अन्नदात्याच्या पदरी निराशा आली.

हो शीर्षक खूप सुरेख आहे.