कुंद

कुंद धुंदलं आभाळ

Submitted by दत्तात्रय साळुंके on 14 June, 2018 - 21:16

कुंद धुंदलं आभाळ

कुंद धुंदलं आभाळ
पावसाळी ही सकाळ
वाहवल्या पायवाटा
पाणथळ पाणथळ

मंत्रमुग्ध तरू तोही
पानोपान गाई गाणं
टप टप सुरातून
मेघमल्हाराची तान

चिंब झाले चराचर
ओली बाळंत धरणी
रोमरोमी हुंकारती
तृणांकुराचीच गाणी

सुर्यदेव गारठला
त्याला निवारा सोडेना
विज वेडावत म्हणे
म्हाताऱ्याला सोसवेना

मन झाले चिंब चिंब
उब घराची पाखरा
देही फुलोरा फुलोरा
गंध भार परीसरा

© दत्तात्रय साळुंके

Subscribe to RSS - कुंद