तु एकदा आली होतीस छतावर हळुच।
तुला चंद्राचं चांदणे लाजले कदाचित।।
ते यमदूत माझ्या समोरुन गले।
त्यांनी मला नाही ओळखले कदाचित।।
त्याला पाहुन डोळ्यांत आले पाणी।
शब्द फुटले नाहीत,रोडावले कदाचित।।
अंधारात या आशेचा दिवा लावून।
मी मुर्त क्षणांना शोधले कदाचित।।
'मेघ', गणगोत पकडून ठेव घट्ट ।
पहा लागेबांधे विस्कटले कदाचित।।
शुक्रवार, १२/९/२५ ,७:३५ PM
अजय सरदेसाई -मेघ
हृदयीच्या भावना या गुंफू कशा शब्दांत,
हृदयीची स्पंदने विरली पुन्हा हृदयात.
दुःख हृदयीचं गाते मुक गाणी,
आले तुझ्या स्मृतीने डोळ्यांत आज पाणी.
हे चांदणे कुणाचं पसरलं नभात,
जणू पुंजके आठवणींचे पसरले मनात.
ओघळलं डोळ्यात एका चांदण्याचं पाणी,
आले तुझ्या स्मृतीने डोळ्यांत आज पाणी.
हुळुवार भावना या जणू पाकळ्या फुलांच्या,
ठेवल्या सर्व जपून पुस्तकात आठवणींच्या.
सांगू कुणास मी ही हळवी जुनी गार्हाणी,
आले तुझ्या स्मृतीने डोळ्यांत आज पाणी.
डोळ्यांत तुझ्या एक स्वप्न आहे
ओठांत तुझ्या माझे गीत आहे
दिसते तू जशी चंद्रकोर नभात
प्रेमात तुझ्या तो ईश्वर ही आहे
डोळे मिटूनी मी चांदणे स्मरतो
चांदण्यात तुझीच ज्योत आहे
कुंद भावनांचा झरा वाहतो एक
स्त्रोत त्याचा तुझ्या हृदयांत आहे
ती रात्र सारी सरली मिठीत तुझ्या
मावळतीस पूर्वेला शुक्र तारा आहे
कोंडला श्वास अवचित, हुंदका फुटला
जाणतो सखे वेळ बिछडण्याची आहे
मंगळवार , २६/०३/२०२४ , ०५:०५ PM
अजय सरदेसाई (मेघ)
https://meghvalli.blogspot.com/
पुढे वाट काळोखी
चल ओंजळीत
उजेड घेऊन जाऊ
नसुदे निवारा कुठे
चल चांदण्यांचे
पांघरून करुन राहु
हा प्रवास आहे दुर्धर
चल वाटेसाठी
स्वप्नांची शिदोरी घेऊ
येतील वाटेत क्षण
चल गुंफून
आठवणी मनांत ठेऊ
अजय सरदेसाई (मेघ)
१६/३/२०२२ , ७:०० PM
meghvalli.blogspot.com
कधी वाटते मी कृष्ण मेघ व्हावे
पाऊस होऊनी बरसत रहावे
कधी कवीच्या त्या लेखणीतून
कविता होऊन बाहेर रिसावे
कधी वाटते मी वारा व्हावे
बेभान होऊन सुसाट वाहावे
मंद तुझा मी स्पर्शुन गंध
धुंद होऊन परत फिरावे
कधी वाटते मी स्वप्न बनावे
आणि अवचित मी तुला पडावे
स्वप्नातुन तुला येताच ग जाग
अंगावर तुझ्या रोमांच शहारावे
कधी वाटते मी चांदणे व्हावे
चकोर होऊन तु मला प्यावे
तृष्णेने न कोणत्या च उरावे
जे वांछीले ,ते कैवल्य मिळावे
शुक्रवार, २२/३/२०२४ , १२:५५ PM
अजय सरदेसाई (मेघ)
जुन्या स्मरणांचे चांदणे विरत आहे।
प्राची ला पहा तो नवसुर्य उगवतो आहे।।
तिमीर रात्र ती दुखांची सरली आता।
क्षितिजावर सुखाची लाली पसरत आहे।।
दिशा समृद्धी च्या तिष्ठत बघती वाट।
ध्रुवीय वारा मज हे आमंत्रण देत वाहे।।
मन घेई गरुड भरारी उंच आकाशात।
पंखात माझ्या निश्चयाचे बळ आहे।।
आकाशांत उडतो मी झुंज देत मेघांशी।
दृष्टीत तरी माझे ते इवले घरटे आहे।।
सोमवार, ११/०३/२०२४ , १२:२४ AM
अजय सरदेसाई (मेघ )
प्राची = पूर्व दशा
तिमीर =अंधार
ध्रुवीय वारा = पूर्वेकडून वाहणारे वारे
हे दु:ख ऊरी माझ्या; आसवे डोळ्यात तुझ्या कां?
मी असता दारी त्याच्या; मागणे शब्दात तुझ्या कां?
*
व्यक्त जाहलो कवितेतून; जाणले तुज गझलेतून
सांगत मी माझे असतांना, लाजणे गालात तुझ्या कां?
*
ऋतु आले गेले कितीही, चिंब होतो प्रेमातच तरीही
गात मल्हार मी असतांना; पैंजणे पायात तुझ्या कां?
*
नभ माझे माझ्यापुरते, क्षितिजाचे त्याला कुंपण
हा चंद्र ओंजळीत माझ्या, चांदणे ह्रूदयात तुझ्या कां?
*
-अशोक
दि २६-०५-२०१८
टपटप पडती धरणीवरती शुभ्रफुलांचे सडे
खुलून येते लख्ख चांदणे रिमझिम बरसते
हसू लागते फूल बहरते हिरव्या माळावरचे
जाहले इतकेच की, तिने आभाळ पाहिले ....१....
श्वासात दरवळते अत्तर मोहरत्या स्पर्शाचे
झुळूक गंधाची येते नंतर कळी उमलते
नदीत झरते जळात झुलतेे इंद्रधनु उमटते
जाहले इतकेच की, तिने आभाळ पाहिले ....२....
............... वैजयंती विंझे -आपटे
पेटला धृव क्षितिजाशी चांदणे बरसले होते
डोळ्यांनी बोलत काही ते दोघे बसले होते
शब्दांची ऊब जराशी स्पर्शांची रिमझिम थोडी
श्वासांतून वाहत गेले ते वादळ कसले होते
बोटांशी गुंफ़ून बोटे स्पंदने थबकली रमली
कैफ़ातिल धुंद शहारे ओठातुन हसले होते
आकाशी झुंजत गेले जोडपे धुंद पक्ष्यांचे
प्रेमातुर दोघे असूनी त्यांच्यात बिनसले होते
गहिवरल्या सागरलाटा थांबल्या किनारी जेव्हा
वाळुतून पाणी निर्मळ विरताना दिसले होते
चंद्रासम विरघळताना आभाळ उतरले खाली
कुणी चित्रकार रेखतो हे दृश्यंच तसले होते
खांद्यावर ठेवुन डोके ती निवांत वाटत होती
काहुर मनातील सारे बाहूत तरसले होते...
जिचे हास्य जणू चंद्राचे चांदणे,
पण पलटे कलाकलांनी,
तिला कसे कळावे,
किती होरपळून मेले,
दिवसा सूर्याच्या झळांनी !
जिचे आगमन जणू वळवाचा पाऊस,
पण बरसे आपल्याच लहरीत,
तिला कसे कळावे,
किती चातक आतुर,
पाण्याच्या पहिल्या थेंबास !
जिचे शब्द जणू अमृताचा प्याला,
पण सोबत असे विषकुंड,
तिला कसे कळावे,
किती नीळ्कंठ होऊन गेले,
प्राशाया अमृताचा एक थेंब !