आभाळ आणि अंगण

Submitted by दाद on 13 October, 2013 - 23:57

गर्जुन कधी तडकुन-बिडकुन चालून येतं आभाळ
अनावरून अंगणात मग बरसुन जातं आभाळ
भरून आलं खूप की अन मनात येईल तेव्हा
भुळूभुळू गळत मुळूमुळू होतं आभाळ....

थेंब न थेंब झेलत तेव्हा भिजत रहातं अंगण
शांतपणे आभाळाचं ऐकुन घेतं अंगण
धारा झेलित पागोळ्यांनी वाहून जाता जाता
कोसळत्या आभाळासाठी खांदा होतं अंगण

थोपटून परत पाठवतं अंगण सावरलेलं आभाळ
अंगण मिठीत घेऊ कधी पहातं मग आभाळ
आभाळाच्या कवेत येईल असलं नसतं अंगण
आभाळ निव्वळ भाळ अस्तं... जमीन असतं अंगण

-- शलाका

Group content visibility: 
Public - accessible to all site users

.

छान .... वेगळीच आहे.

"धारा झेलित पागोळ्यांनी वाहून जाता जाता
कोसळत्या आभाळासाठी खांदा होतं अंगण" >>> हे सर्वात विशेष वाटलं.

दाद,
सर्व छानच आहे पण...........

गर्जुन कधी तडकुन-बिडकुन चालून येतं आभाळ
इथे बिलगून कसं वाटेल ?

गर्जुन कधी तडकुन-बिडकुन बिलगून येतं आभाळ
...................................................................................................................................................
आभाळ निव्वळ भाळ अस्तं... जमीन असतं अंगण
भाळ ऐवजी भास हवंय का ?

आभाळ निव्वळ भास अस्तं... जमीन असतं अंगण

शांतपणे आभाळाचं ऐकुन घेतं अंगण
धारा झेलित पागोळ्यांनी वाहून जाता जाता
कोसळत्या आभाळासाठी खांदा होतं अंगण<<<

उत्तम प्रतीक!

कविता आवडली शलाका! (तुमचे नांवही आवडते म्हणून 'दाद' असे लिहिण्याऐवजी मुद्दाम नांव लिहितो).

आभाळाच्या कवेत येईल असलं नसतं अंगण
आभाळ निव्वळ भाळ अस्तं... जमीन असतं अंगण<<< वा वा

(अवांतर - पहिला बंध नसताच तर आशयाच्यादृष्टीने नेमका काय फरक पडला असता असा फक्त एकदा विचार करून बघितला)

धन्यवाद!

-'बेफिकीर'!

खूपच छान दाद.
आवडली.

>> थोपटून परत पाठवतं अंगण सावरलेलं आभाळ
अंगण मिठीत घेऊ कधी पहातं मग आभाळ
आभाळाच्या कवेत येईल असलं नसतं अंगण
आभाळ निव्वळ भाळ अस्तं... जमीन असतं अंगण >>
हे मस्तच.